घरगुती लॉज शोधण्यासाठी हक्काची वेबसाईट म्हणजे एयर बीएनबी

एयर बीएनबी

आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपण जिथे जाणार आहोत तिथे राहण्याची सोय आहे का नाही हे आधी पाहतो. बहुतेक वेळा जर कोणी ओळखीचा मित्र किंवा नातेवाईक त्या शहरात राहणारे असतील तर आपण त्यांना फोन करून तुमच्या इथे राहता येईल का याविषयी चौकशी करतो. जर कोणीच ओळखीचे नसतील किंवा कुठेच राहण्याची सोय होत नसेल तर नाईलाजाने हॉटेल किंवा लॉज हा पर्याय आपल्याला निवडावा लागतो. ह्याच समस्येवर उपाय म्हणून एयर बीएनबी सुरु झाली. तुम्हा आम्हाला स्वतःच्या घरातच एक लॉज सुरु करण्यासाठी एक नवा पर्याय देखील समोर आला.

पर्यटकांची गोष्ट

आता कितीही झालं तरी हॉटेल आणि लॉज म्हणजे व्यावसायिक सेवा आहे, किंमत आणि इतर गोष्टी बाजूला ठेवल्या तरी या शहरांमध्ये लोक कसे राहतात याबद्दल आपल्याला कुतूहल असते त्यामुळे पर्यटक शक्यतो कोणाच्या तरी घरी राहणे पसंत करतात. एखाद्या नवीन शहरात गेल्यावर तिथले लोकांची जीवनशैली आणि त्यांचे राहणीमान पर्यटकांसाठी नवीन असते आणि हाच अनुभव घेण्याचा पर्यटकांचा कल असतो. प्रत्येक वेळी कोणाच्यातरी घरी राहणे शक्य होतेच असे नाही त्यामुळे समोर आली एयर बीएनबी हि संकल्पना. घरगुती लॉज शोधून देणारी सेवा म्हणजे आज एयर बीएनबी कडे पहिले जाते.

मित्रांनी थाटलेला लॉज

ही 2007 मधली गोष्ट आहे जेव्हा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये एकाच घरात राहणाऱ्या 2 मित्रांना जागेचे भाडे भरण्यासाठी पैसे कमी पडत होते. आता भाडे भरण्यासाठी पैसे मिळवावेत म्हणून काहीतरी जुगाड करायचे ठरवले. या जोडगोळीने त्यांचा पोटमाळा भाड्याने द्यायची कल्पना आखली. रात्री ज्या लोकांना झोपण्यासाठी ओसरी नाही त्यांच्यासाठी पोटमाळ्यावर तीन गाद्या टाकल्या, एवढेच नाही तर रात्री जे कोणी झोपण्याची जागा भाड्याने घेतील त्यांना सकाळी न्याहारी देण्याची सुद्धा सोय केली, थोडक्यात सांगायचे तर एक घरगुती लॉज सुरु केला..  लोकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी airbedandbreakfast.com (एअर बेड अँड ब्रेकफास्ट) नावाची वेबसाईट देखील सुरू केली. सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये डिझाईन संदर्भात एक मोठी परिषद भरणार होती त्यामुळे येणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये खोली मिळण्याची पंचायत झाली तेव्हा अशा लोकांसाठी गाइड म्हणून काम करण्याचे देखील या दोघांनी ठरवले कारण यातूनच भाडे देण्यासाठी आणि वर खर्चासाठी पैसे सुटणार होते.

मराठी माणूस एयर बीएनबीचा लॉज वापरणारा पहिला ग्राहक

घरगुती लॉज शोधण्यासाठी हक्काची वेबसाईट म्हणजे एयर बीएनबी
अमोल सुर्वे – एयर बीएनबी चे पहिले ग्राहक

अमोल सुर्वे हे नुकतेच ऍरिझोना राज्याच्या विद्यापीठातून डिझाईनची पदवी घेऊन बाहेर पडले होते आता या क्षेत्राबद्दल अजून माहिती मिळावी यासाठी सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये होणाऱ्या डिझाईन संबंधित परिषदेला हजेरी लावण्याचे त्यांनी ठरवले. सगळे काही ठरल्याप्रमाणे घडत होते, त्यांनी जवळपास १ हजार अमेरिकन डॉलर म्हणजे साठ-सत्तर हजार रुपयांच्या आसपास असलेले परिषदेचे तिकीट पण काढले होते. जेव्हा अमोल सॅन फ्रान्सिस्को शहरात पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की इथे जवळपास सगळेच हॉटेल्स भरलेले आहेत आणि राहण्यासाठी जिथे खोल्या शिल्लक आहेत त्या चिक्कार महागड्या आहेत. अशातच त्यांनी airbedandbreakfast.com या वेबसाईटवर राहण्यासाठी जागा असल्याची जाहिरात पाहिली. तेव्हा त्यांना त्या दोन मित्रांनी केलेल्या जागे बद्दल माहिती मिळाली पण एक अडचण अशी होती की त्या वेबसाईटवर कोणताही संपर्क क्रमांक नव्हता. अमोल भाऊंनी तोदेखील इंटरनेटवरून शोधून काढला आणि त्यांना संपर्क केला आणि राहण्यासाठी जागा नक्की केली. अमोल यांच्या बरोबरच अजून दोघांनी देखील तिथे राहायचे नक्की केले. मित्रांच्या घरगुती लॉज मध्ये आलेले हे पहिले ग्राहक आहेत.

एयर बीएनबी ची आजची स्थिती

घरगुती लॉज शोधण्यासाठी हक्काची वेबसाईट म्हणजे एयर बीएनबी
ब्रायन चेस्की (Brian Chesky) नेथन ब्लेकहारर्चीक (Nathan Blecharczyk) आणि जोए गेब्बीया (Joe Gebbia)

अशा पद्धतीने एअर बीएनबी ला पहिले ग्राहक मिळाले आणि त्यानंतर एअर बीएनबी ने मागे वळून पाहिलेच नाही.  जोए गेब्बीया (Joe Gebbia) आणि ब्रायन चेस्की  (Brian Chesky) हि त्या दोघांची नावं आणि हे मुळातले डिझायनर. तंत्रज्ञानाची मदत म्हणून त्यांना नेथन ब्लेकहारर्चीक (Nathan Blecharczyk) सामील झाला. आज एयर बीएनबीशी 191 पेक्षा जास्त देशांमधील 81 हजार पेक्षा जास्त शहरांमध्ये 50 लाखांहून अधिक जागा जोडलेल्या आहेत. आजतागायत जगभरात 60 लाखांहून अधिक लोकांनी एयर बीएनबीचा वापर करून जागा निवडल्या आहेत. लोकांना देखील हे घरगुती लॉज आवडत आहेत.

एयर बीएनबी म्हणजे नक्की काय ?

एयर बीएनबी म्हणजे हॉटेल प्रमाणेच लोकांच्या घरातील एखादी खोली किंवा संपूर्ण घर काही काळासाठी भाड्याने देण्याची किंवा घेण्याची सुविधा असलेले संकेतस्थळ. आपण आधी बघितल्याप्रमाणे पर्यटक जेव्हा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात तेव्हा त्यांना त्या शहरातील लोक कसे राहतात आणि त्यांची जीवनशैली कशी आहे हे जाणून घेण्यात रस असतो. काही वेळेला हॉटेल किंवा लॉजचे भाडे परवडत नाही अशा लोकांना देखील एयर बीएनबी या माध्यमातून स्वस्तात राहण्यासाठी जागा शोधता येते.

एयर बीएनबी ग्राहकांसाठी कसे काम करते ?

तुम्ही जर एयर बीएनबीच्या माध्यमातून राहण्यासाठी जागा सोडणार असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही राहण्यासाठी कॉट बेसिस वर देखील खोली घेऊ शकता, संपूर्ण खोली देखील घेऊ शकता किंवा संपूर्ण घर देखील घेण्याची सोय आहे. तुम्ही जर घराची एखादी खोली घेतली तर पेयिंग गेस्ट प्रमाणे तुम्ही ठरलेल्या कालावधी प्रमाणे राहू शकता. त्या खोलीचे एका रात्री चे भाडे जर ५०० रुपये असेल तर एयर बीएनबी तुमच्याकडून सहा ते बारा टक्के कमिशन घेते. दरम्यान काही अडचण आली तर तुम्ही एयर बीएनबीशी संपर्क करून ती सोडू शकता. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार सुविधा निवडण्याची सोय आहे म्हणजे तुम्हाला जर वायफाय हवे असेल, खोलीला जोडलेली बालकनी हवी असेल तर तशा पद्धतीच्या जागा तुम्ही शोधू शकता.

एयर बीएनबी विक्रेत्यांसाठी कसे काम करते ?

तुम्हाला जर तुमची जागा जर एयर बीएनबी द्वारे उपलब्ध करून द्यायचे असेल तर तुम्ही ठराविक औपचारिकता पूर्ण करून तसे करू शकता. विक्रेते म्हणून तुमच्याकडे देखील वेगवेगळे पर्याय आहेत, तुम्हाला जर तुमच्या संपूर्ण घर उपलब्ध करून द्यायचे असेल, घरातील एखादी खोली उपलब्ध करून द्यायची असेल किंवा एखादी कॉट उपलब्ध करून द्यायची असेल तर तुम्ही ती नक्कीच देऊ शकता. याशिवाय तुम्हाला पाहुण्यांना बरोबर जर पाळीव प्राणी आलेले चालणार नसतील, पाहुण्यांनी व्यसन केलेले चालणार नसेल तर तुम्ही स्पष्टपणे तसे एयर बीएनबी मध्ये जागा उपलब्ध करून देताना लिहू शकता. एयर बीएनबी विक्रेत्यांकडून देखील काही प्रमाणात कमिशन घेते.

एयर बीएनबीचे फायदे काय आहेत ?

एयर बीएनबी नक्कीच ज्यांना स्वस्तात आणि ज्या शहरात राहत आहेत त्या शहरातील लोकांमध्ये जाऊन राहण्याची इच्छा आहे अशांसाठी एक चांगला पर्याय आहे. त्याचे इतर फायदे काय आहेत हे पाहूयात.

१. घरगुती लॉज मुळे आतल्या गोष्टी कळतात

आता एखाद्या शहरात नवीन काय आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या सहसा इंटरनेट किंवा इतर ठिकाणी उपलब्ध नाहीत अशा माहिती थोरामोठ्यांना माहिती असतात किंवा त्या शहरात जे राहतात त्यांना याबाबत माहिती असते. तुम्ही जर हॉटेलमध्ये राहिलात तर रिसेप्शन वरील लोकं तुम्हाला ठराविक माहितीच देऊ शकतात. तुम्ही जर कोणाच्या घरी राहत असाल तर तुम्हाला त्या शहराविषयी चांगल्या-वाईट गोष्टी जाणून घेता येतील आणि त्या शहराचा खरा आनंद घेता येईल.

२. घरगुती लॉज मधेच स्वयंपाकाची सोय

आता कितीही झालं तरी हॉटेल आणि लॉज म्हणजे व्यावसायिक सेवा आहे, किंमत आणि इतर गोष्टी बाजूला ठेवल्या तरी या शहरांमध्ये लोक कसे राहतात याबद्दल आपल्याला कुतूहल असते त्यामुळे पर्यटक शक्यतो कोणाच्या तरी घरी राहणे पसंत करतात. एखाद्या नवीन शहरात गेल्यावर तिथले लोकांची जीवनशैली आणि त्यांचे राहणीमान पर्यटकांसाठी नवीन असते आणि हाच अनुभव घेण्याचा पर्यटकांचा कल असतो. प्रत्येक वेळी कोणाच्यातरी घरी राहणे शक्य होतेच असे नाही त्यामुळे समोर आली एयर बीएनबी हि संकल्पना.

३. घरगुती लॉज म्हणजे कमी पैसे

एखाद्या शहरातील एखाद्या हॉटेलच्या खोलीची किंमत जर हजार रुपये असेल तर एअर बीएनबी वर तुम्हाला कमी किमतीत त्याच पद्धतीची खोली मिळू शकते. पर्यटक नेहमी कमी खर्च करून जास्तीत जास्त आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात एअर बीएनबी नक्कीच कमी खर्चात एक चांगला अनुभव उपलब्ध करून देऊ शकते.

https://www.airbnb.co.in/

हि एयर बीएनबी ची भारतीय वेबसाईट आहे.

एयर बीएनबीचे तोटे काय आहेत ?

कोणत्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच काही तोटे देखील असतात आणि एयर बीएनबीचे काय तोटे आहेत हे आपण पाहूयात.

१. मर्यादित खासगीपणा

जर तुम्ही ग्राहक किंवा विक्रेते म्हणून जरी एयर बीएनबी वापरत असाल तर तुम्हाला संपूर्ण खाजगीपणा मिळत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या घराची एक खोली एयर बीएनबी वापरून येणाऱ्या ग्राहकांसाठी दिली तर त्यांना तुम्हाला तुमच्या घरात प्रवेश द्यावा लागतो आणि पाहुण्यांना काही लागलं तर ते माहिती घेण्यासाठी तुम्हाला संपर्क करतात. ग्राहकांना देखील अशा पद्धतीने संपूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही. काही वेळेला संपूर्ण घर जर उपलब्ध करून दिली असेल तर मात्र खाजगीपणा जपला जातो.

२. चुकीच्या घटना

तुम्ही अनोळखी लोकांना तुमच्या घरात राहायला जागा दिली तर ते काय बनवाबनवी करतील हे सांगता येत नाही. आता हा फक्त एयर बीएनबीचा तोटा आहे की नाही हे तुम्ही ठरवा पण एयर बीएनबी वापरून आलेल्या ग्राहकांना जर पारखल्याशिवाय प्रवेश दिला तर कोणतेही संकट येण्याची शक्यता आहे. तसेच पाहुणे म्हणून जाताना तुम्ही जर योग्य तपास केल्याशिवाय एखादी खोली किंवा जागा नक्की केली तर तुम्हाला कुठे राहावे लागेल याचा नेम नाही. रेटिंग आणि आधी ज्यांनी विक्रेत्यांचे सेवा किंवा ग्राहकांचा अनुभव घेतला आहे अशांनी दिलेले अभिप्राय वाचून घेणे महत्त्वाचे आहे.

३. जाचक नियम आणि अटी

हॉटेलमधे राहताना नियम आणि अटी वेगळे असतात पण जर एखाद्याच्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून राहत असाल तर तिथले नियम आणि अटी वेगळे असतात. एखादा शांत घर मालक असेल आणि तुम्ही तिथे जाऊन धांगडधिंगा केला तर त्याला ते निश्चितच आवडणार नाही आणि व तुमच्या प्रोफाईलवर नकारात्मक अभिप्राय लिहिण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढच्या वेळेला तुम्हाला कोणताही घर मालक जागा देताना दहा वेळा विचार करेल. काही वेळेला नियम आणि अटी जाचक वाटू शकतील त्यामुळे एखादी जागा नक्की करायच्या आधी नियम आणि अटी अवश्य वाचाव्यात.

हिचहायकर्स : घरदार सोडून अनेक वर्ष जग फिरायला निघालेले भटके

हा लेख वाचला नसेल तर अवश्य वाचा.

आपण काय पाहिलं ?

थोडक्यात सांगायचे तर एयर बीएनबी म्हणजे पोटभाडेकरू ठेवण्याची किंवा राहण्याची सोय. जगातील 191 देशांमध्ये एयर बीएनबी पसरले आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही कुठेही गेलात तरी सापडले नाही असे होणार नाही. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे काही मित्रांनी ही कल्पना मांडली आणि बघता बघता अब्जावधी रुपयांचा व्यवसाय करणारी कंपनी उभी राहिली. प्रवाशांना, पर्यटकांना कमी पैशांमध्ये राहण्यासाठी जागा मिळू लागल्या तर घरमालकांना त्यांच्या जागेचा काही भाग भाड्याने घेऊन त्या बदल्यात पैसे मिळू लागले. स्वयंपाकाची सोय आणि शहराबद्दल आणि त्याच जागेबद्दल आतली माहिती मिळवण्यासाठी पर्यटक देखील एयर बीएनबीचा वापर करू लागले पण त्याच बरोबरीने इथे मर्यादित खाजगीपणा, काही चुकीच्या घटना घडण्याची शक्यता आणि जाचक वाटतील असे नियम आणि अटी ह्या नकारात्मक बाजू देखील आहेत.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*