जर एखाद्या दिवशी पृथ्वीवरच्या सगळ्या पाणी आटून गेले तर काय होईल? एखाद्या दिवशी तुम्हाला जर असं लक्षात आलं की तुम्हाला प्यायला पाणीच शिल्लक नाहीये तेव्हा तुमची अवस्था काय असेल? एखाद्या दिवशी जात, पात, धर्म, राजकारण, क्रीडा, बॉलिवूड अशा सगळ्या विषयांना बाजूला ठेवून जर वाहिन्यांवर पृथ्वीवरील संपून गेलेले पाणी हा प्रमुख चर्चेचा विषय असेल तेव्हा काय होईल? एखाद्या दिवशी जर समुद्र नाहीसा झाला आणि पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव पाण्याच्या एकेका थेंबासाठी वणवण भटकत असेल तेव्हा काय होईल? तेव्हा काय होईल जेव्हा समाज माध्यमांवर पाण्याशिवाय दुसरा कुठलाही विषय ट्रेंडिंग नसेल?
खरंतर हा दुर्दैवी दिवस कधीही येऊ नये पण सरकार, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर पाण्याच्या बचती विषयी असलेली उदासीनता लक्षात घेतली तर तो दिवस येणारच नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. आजची गोष्ट आहे कधीकाळी जगातल्या सगळ्यात मोठ्या चौथ्या आणि २४ हजार वर्ष जुन्या सरोवराच्या मृत्यूची जिथे आता फक्त वाळू, गंजलेल्या बोटी आणि आठवणी शिल्लक आहेत.
पर्यावरणाबद्दलचा हा लेख वाचला नसेल तर नक्की वाचा.
अरल समुद्र
मध्य आशियामध्ये हे दोन देश आहेत कजाकिस्तान आणि उझबेकिस्तान. या दोन देशांच्या मधोमध असलेला अरल समुद्र 1960 च्या दशकात 68 हजार वर्ग किलोमीटर एवढा पाण्याने भरलेला होता. एक काळ होता जेव्हा 1,534 बेटांना वेढणारा हा समुद्र बेटांचा समुद्र म्हणून ओळखला जात होता. त्यानंतरच्या दशकात हळूहळू तो इतका वाळत गेला आता त्यातला फक्त दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खरंतर उझबेकिस्तानचा ८०% भाग वाळवंटच आहे पण सततच्या दुष्काळामुळे परिस्थिती अजून हाताबाहेर जाते आहे. अरल समुद्र वाळून गेल्यामुळे आता तिथे भरपूर वाळू आणि मीठ उरले आहे. जेव्हा जोरदार वारा सुटतो तेव्हा ही मीठ असलेली वाळू त्या वाऱ्याच्या वेगामुळे आशियामध्ये जपान पर्यंत जाऊन पडते तर तिकडे युरोपात फिनलँड, स्वीडन पर्यंत पोहोचते. ह्याशिवाय स्थानिक लोकांना या वाळूमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आता वृक्षारोपण करून या ठिकाणचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पर्यावरणाबद्दलचा हा लेख वाचला नसेल तर नक्की वाचा.
अरल समुद्र का वाळला ?

सोवियत युनियनच्या काळात अमु दरिया आणि सीर दरिया ह्या ज्या २ नद्या अरल समुद्राला येऊन मिळायच्या त्यांची दिशा वळवून त्यांना ओसाड आणि नापीक जमीन असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. कापसाच्या शेतीसाठी हा सगळा घाट घालण्यात आला. हा प्रयोगाचा त्यावेळी जरी फायदा झाला असला तरी आज त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसतायत. १९६० नंतर हळूहळू अरल समुद्र वाळायला लागला, एका बाजूला याचे आर्थिक परिणाम तर झालेच याशिवाय लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचे परिणाम झाले. त्यामुळे त्याच्या आसपास राहणारी लोकसुद्धा तिथून स्थलांतरित होऊन दुसरीकडे जाऊ लागली. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अभ्यासानुसार, अरल समुद्रात १९६० मध्ये आणि बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे ५० घन किलोमीटर एवढे ताजे पाणी येत होते पण १९८० साल उगवेपर्यंत हा आकडा शून्यावर आला.
आता काय करायचं ?
अरल समुद्र संवर्धन आंतरराष्ट्रीय निधी समितीचे प्रतिनिधी वादीम सोकोलोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या मिठाचा आणि जमा झालेल्या रसायनांचा दुष्परिणाम टाळायचा असेल तर वृक्ष लागवड करायला हवी. समुद्राचा तळ वाळून गेल्यामुळे जी वाळू वर येण्याची समस्या निर्माण झाली आहे हिचा सामना करायला हवा.
सध्याची परिस्थिती काय आहे ?
अरल समुद्र झपाट्याने वाळून गेल्यामुळे समुद्राचा किनारा आता मोयनाक शहरापासून अनेक किलोमीटर दूर गेला आहे. अजूनही अरल समुद्राचा काही भाग शिल्लक आहे, पण एकीकडे जसजसा हा समुद्र वाळत आहे दुसरीकडे तसतसे वाळवंट वाढत आहे. वादीम सोकोलोव्ह म्हणतात आम्ही ५ लाख टनांपेक्षा जास्त बिया गोळा केल्या आहेत. ह्या बिया वापरून पाच लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात झाडं लावता येऊ शकतात, समुद्र वाळल्यामुळे जी जागा तयार झाली आहे त्याचा हा एक तृतीयांश भाग आहे. आम्ही पानगळीच्या मोसमात झाडांची लागवड करण्याची योजना आखली आहे. पूर्वी असलेला अरल समुद्र पुन्हा पाण्याने भरणे शक्य नाही पण निदान त्या जागेवर झाडे लावून पर्यावरणाची झीज तरी आपण रोखू शकतो.
पर्यावरणाचे संकट
ही गोष्ट फक्त समुद्राच्या वाळून जाण्याचापुरती मर्यादीत नाही आहे. ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग, मुंबईमध्ये दरवर्षी पावसाने तुंबणारे रस्ते, चेन्नई मध्ये असणारे भीषण पाणीसंकट, जागतिक तापमान वाढीमुळे अनेक देश पाण्याखाली जाण्याची शक्यता अशी पाण्याशी, पर्यावरणाशी संबंधित मोठमोठी संकट आपल्या समोर उभी ठाकली आहेत. पाणी व्यवस्थापनाशी निगडित आपण जर आज काही उपाययोजना अमलात आणल्या नाहीत तर अरबी समुद्राचा देखील अरल समुद्र व्हायला फार शतकं लागणार नाहीत.
पर्यावरण संवर्धन लघुपट
तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी सर्वोत्तम उपाय काय आहेत? कमेंट्स मध्ये आपले मत नक्की कळवा आणि ह्या लेखाची लिंक तुमच्या मित्रपरिवाराला पाठवायला विसरू नका.
मुख्य छायाचित्र सौजन्य – Dan Senior