जगाला कोब्रा परिणाम शिकवणारी हि गोष्ट आहे ब्रिटिश कालीन भारताची, भारतात ब्रिटिशांची सत्ता आहे, ब्रिटिश शासन व्यवस्था इंग्लंडच्या विकासासाठी भारत तसेच इतर देशांमधील मौल्यवान संसाधनांचा वापर करून घेत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे महत्वाचे स्थान कमी कमी होत केवळ ब्रिटिशांचे गुलाम म्हणून भारताची ओळख होत आहे असे असतानाच ब्रिटिश राज्यकर्त्यांना एक नवी समस्या भेडसावू लागते, दिल्ली शहराच्या काही भागांमध्ये विषारी नागांची (ज्याला इंग्रजीत कोब्रा म्हणून ओळखले जाते) संख्या वाढू लागते. ब्रिटिश शासकांना काही केल्या उपाय सापडत नाही अशा वेळी काहीतरी उपाय आवश्यक आहे म्हणून ते नवीन योजना घेऊन येतात आणि ह्यामुळेच ‘कोब्रा परिणाम’ जगाला माहिती होतो. ह्या लेखात ह्याच Cobra Effect म्हणजेच कोब्रा परिणामाबद्दल पाहुयात.
नाग आणा पैसे घ्या योजना
वाढत जाणाऱ्या विषारी नागांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिशांनी जी योजना आणली त्यात जो कोणी मेलेला नाग आणून देईल त्याला पैसे देण्याचे कबुल केले गेले. त्या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ब्रिटिश अधिकारी अत्यंत आनंदित झाले पण काही दिवसांनी माहिती घेतली असता नागांची संख्या कमी व्हायच्या ऐवजी वाढतंच गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. नागांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जी योजना अंमलात आणली होती त्या योजनेनुसार नागांची संख्या कमी होणे अपेक्षित होते पण इथे मात्र उलटे होत होते त्यामुळे असे का होत असावे ह्यासाठी चौकशी नेमली गेली.
भारतीयांनी केलेलं जुगाड आणि नवीन समस्या
नाग पकडून हजार केल्यावर ब्रिटिश सरकार त्या बदल्यात पैसे देत आहे हे कळल्यावर काही भारतीय मंडळींनी भयंकर जुगाड केले. त्यांनी चक्क नागांची पैदास आणि त्यांचे पालन करायला सुरुवात केली. अनेकांसाठी हे रोजगाराचे माध्यम बनले पण ब्रिटिशांनी ज्या समस्येवर उपाय म्हणून हि योजना लागू केली होती ती समस्या अजूनच गंभीर बनली. भारतीयांनी आपल्याला भरपूर चुना लावलाय हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी शेवटी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि हि योजना बंद केली. आता मात्र ज्या भारतीयांनी नागपालन सुरु केले होते त्या नागांना मोकळे सोडून द्यायला सुरु केले ह्यामुळे एकंदर नागांची संख्या अजून वाढायला कारण मिळाले.
हनोई मधली समस्या – कोब्रा परिणाम
फ्रेंच राजवट असताना अशीच एक घटना व्हिएतनामची राजधानी हनोई शहरात घडली. त्या वेळी त्या शहरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता त्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी जो कोणी उंदरांची शेपटी आणून देईल त्याला बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याचे ठरवले. तिथेही भारतीयांसारखी जुगाडू लोकं होतीच, त्यांनी भरमसाठ उंदरांच्या शेपट्या जमा केल्या आणि त्याबदल्यात बक्षिसाची रक्कम घ्यायचा उद्योग सुरु केला. भलीमोठी बक्षिसाची रक्कम देऊनही उंदरांची संख्या काही कमी होईना त्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि लोकं उंदीर पकडून त्यांची शेपटी तोडायचे आणि उंदरांना परत मोकळं सोडायचे त्यामुळे उंदीर पुढे गटारात जाऊन त्यांचा वंश वाढवायचे आणि काही काळाने उंदीर पकडणाऱ्यांना अजून शेपट्या मिळवायची सोया व्हायची. शेवटी फ्रेंच राज्यकर्त्यांनी हि योजना बंद केली.
कोब्रा परिणामाचा मतितार्थ काय?

काही हुशार मंडळींनी समस्येवर तोडगा नक्कीच काढला होता आणि कागदावरील योजना नक्कीच परिणामकारक होती पण योजना आखणाऱ्यांनी त्या योजनेचा फक्त पहिला परिणाम लक्षात घेतला होता. एखाद्या घटनेचे पडसाद दुसऱ्या किंवा तिसऱ्या पातळीवर देखील होऊ शकतात त्यामुळे वेगवेगळ्या अंगाने विचार करणे आवश्यक आहे. आपणही दैनंदिन जीवनात एकापेक्षा अधिक समस्यांचा सामना करत असतो अशा वेळी कोब्रा परिणामाचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते अन्यथा समस्या दूर होणे बाजूलाच राहते आणि त्या समस्येमध्ये आणखी भर पडते. वरील दोन्ही उदाहरणांमध्ये राज्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतले पण त्या निर्णयांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला नाही. त्या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी तजवीज केली नसल्यामुळे संपूर्ण योजना बंद करावी लागली. अशा वेळी त्यांची भावना जरी योग्य असली तरीही त्यांची पद्धत चुकल्यामुळे नुकसान सहन करावे लागले आणि समस्या देखील आहे त्यापेक्षा अजून वाढली. इतिहासाने शिकवलेला हा कोब्रा परिणाम नक्कीच आज कोणतेही धोरण ठरवताना उपयोगी पडतो.