कोरोना विषाणूचा निसर्ग आणि वन्यजीवांवर काय परिणाम झाला ?

कोरोना विषाणूचा निसर्ग आणि वन्यजीवांवर काय परिणाम झाला ?

कोरोना व्हायरस मुळे जगाचा वेग निश्चितच मंदावला. आपण आपल्या हयातीत पाहिलेल्या या भयंकर महामारीचे परिणाम आपल्याला येणाऱ्या अनेक वर्षात जाणवणार आहेत. आर्थिक उलाढाल, मानवी संबंध, सामाजिक स्वरूप, तंत्रज्ञान आणि अर्थातच आरोग्य ह्या बाबतीत ह्या महामारीमुळे उलथापालथ झाली. जे बदल आपल्याला २०२५ किंवा २०३० मध्ये अपेक्षित होते तेच बदल एका रात्रीत स्वीकारावे लागले. माणसाच्या आयुष्यावर ह्याचा गंभीर परिणाम झाला असला तरी एका अर्थाने ज्या विषयांकडे दुर्लक्ष झाले, त्यातल्या काही बाबतीत कोरोना सकारात्मक ठरला आहे. ह्या लेखात आपण कोरोना विषाणूचा निसर्ग आणि वन्यजीवांवर काय परिणाम झाला हे पाहुयात.

आंतरराष्ट्रीय स्थिती

चीनच्या वूहान शहरातून कोविड विषाणू जगभर पसरला त्यामुळे सगळ्यात आधी ह्याचा फटका चीनलाच बसला. हा विषाणू प्रयोगशाळेत तयार करून पसरवल्याचे आरोप केले जातात, हे आरोप खरे का खोटे ह्याचा उलगडा येत्या काही काळात होईलच पण जी इतर माहिती समोर येते आहे ती लक्षात घेतली तर एक सकारात्मक चित्र उभं राहत आहे. ग्रीनहाऊस गॅस (हरितगृह वायू) चे सर्वाधिक उत्सर्जन ज्या देशांकडून केले जाते त्यात चीनचे नाव अगत्याने येते. लॉकडाऊन मध्ये अनेक कारखाने बंद ठेवावे लागले तसेच रस्त्यावर वाहने नसल्यामुळे एकूण प्रदूषणात जवळपास ४०% घट झाली. इटली, अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा कमी अधिक फरकाने हीच स्थिती बघायला मिळाली.

नव्याचे नऊ दिवस आणि निसर्ग

जरी प्रदूषणात घट झाली असली तरी हे काही आनंद होण्याचं कारण नाही. आपण कोणतेही दूरगामी परिणाम होणारे निर्णय घेतलेले नाहीत, तज्ज्ञांच्या मते सर्व काही सुरळीत झाल्यावर परत प्रदूषण आपली पूर्वीची पातळी गाठेल. भारतात देखील काही काळ प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती पण जसजसे अनलॉक सुरु झाले तसे प्रदूषण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाले. खरं तर चीनचे विस्तारवादी धोरण आपल्याला माहित आहेच पण चीनने मार्च २०२० मध्येच अनेक नवीन कारखान्यांना मान्यता दिली त्यामुळे प्रदूषण आधीपेक्षाही अधिक वाढण्याचा धोका आहे. अमेरिकेनेही ज्या कंपन्यांना महामारीमुळे नुकसान झाले आहे अशा कंपन्यांना पर्यावरणविषयक कायद्यांमधून काही काळ सूट दिली आहे.

प्राण्यांचा मुक्त संचारआणि निसर्ग

माणूस हा प्राणी जरी महामारीमुळे घरात बंद झाला असला तरी अनेक दुर्लभ प्राणी ह्या संधीचा फायदा घेऊन बाहेर पडले. जगातील अनेक शहरांमध्ये इतर वेळी न दिसणारे प्राणी बघायला मिळाले. नवी मुंबई मध्ये दर वर्षी जवळपास १.२ लाख फ्लेमिंगो पक्षी भेट देतात, ह्या वर्षी एप्रिल महिन्यातच १.५ लाख फ्लेमिंगो पक्षांनी भेट दिल्याची नोंद केली गेली आहे. नेपाळमध्ये सुद्धा अनेक गेंडे शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरताना आढळले. चंदीगड मध्ये बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला. निसर्ग सर्वांसाठी आहे हे ह्यावरून लक्षात आले.

महामारीचा वन्यजीवांवर विपरीत परिणाम

वरकरणी जरी हे चांगलं चित्र दिसत असलं तरीही काही बाबतीत कोरोना महामारीचा निसर्गावर विपरीत परिणाम झालेला आढळला. अनेक देशांमध्ये वन्यजीवांची लोकसंख्या कमी झाल्याचे बघायला मिळाली. त्या त्या देशांमधील सरकारला महामारी संबधित उपायोजना करण्यासाठी संसाधने कमी पडू लागली. कोलंबिया, आफ्रिका सारख्या देशांमध्ये वन्यजीवांची शिकार वाढली. जिथे माणसाला वाचवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही तिथे वन्यजीवांना प्राधान्य दिले गेले नाही.

कोरोना जाईल पण निसर्गाचे काय?

कोरोना विषाणू जरी लगेच जाईल असे चिन्ह नसले तरी काही काळाने लस उपलब्ध होईल आणि येणाऱ्या एक दोन वर्षात कोरोनाचे समूळ उच्चाटन करणे आपल्याला शक्य होईल. माणसाला जरी ह्यातून निसटणे शक्य असले तरी निसर्गावर होणारे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकास महत्वाचा आहेच पण त्याचबरोबरीने निसर्गाचे संवर्धन करणे देखील तितकेच आवश्यक आहे. येणाऱ्या काळात अधिकाधिक निसर्ग पूरक जीवनशैलीकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा निसर्गावर काय परिणाम झाला ह्याचे स्पष्ट चित्र येणाऱ्या काही दशकांमध्ये समोर येईल.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

आपली टिप्पणी द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.*