तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वर हे चिन्ह असेल तर सावध व्हा

डेबिट - क्रेडिट कार्ड

आपण आपल्या मौल्यवान गोष्टी नेहमी जपत आलेलो आहोत. प्रवास करताना देखील अनेक ठिकाणी पाकीटमारा पासून सावधान अशा सूचनांचे बोर्ड टांगलेले आपण बघतो. रोख रक्कम देखील पाकिटात, ते पाकीट अत्यंत जपून खिशामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवतो. काही वेळेला काही रोख रक्कम चोर कप्प्यात ठेवलेली असते. एवढं करूनही बऱ्याचदा पाकीटमार हातचलाखीने पाकीट मारतातच त्यामुळे आपले नुकसान होते. रोख रक्कम तसेच इतर महत्वाची कागदपत्र अथवा लायसन्स किंवा इतर कार्ड्स त्यात असल्यामुळे ते नुकसान मोठे असते. ही झाली आजपर्यंतची गोष्ट, पण यापुढे तुम्हाला हात न लावता देखील पाकीटमार तुमचे पैसे चोरू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? नवीन आलेल्या डेबिट – क्रेडिट कार्ड मध्ये असलेल्या एका सुविधेमुळे तुमची फसवणूक देखील केली जाऊ शकते.

डेबिट कार्ड म्हणजे काय ?

डेबिट कार्ड म्हणजे आपल्या बँकेने दिलेले ए.टी.एम कार्ड. हे कार्ड वापरून आपण कोणत्याही एटीएममधून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतो अथवा काही ठिकाणी पैसे भरण्याची देखील सोय आहे. ह्याशिवाय डेबिट कार्डचा वापर खरेदी करण्यासाठी अथवा बिल भरण्यासाठी केला जातो. ऑनलाइन खरेदी करताना किंवा बिल भरताना देखील डेबिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो. ऑफलाईन म्हणजे दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये, पेट्रोल पंपावर किंवा दवाखान्यात जेव्हा आपण डेबिट कार्ड वापरून बिल भरतो तेव्हा आपल्याला डेबिट कार्ड त्यांच्या मशीन मध्ये टाकून आपलाच चार अंकी पिन क्रमांक टाकावा लागतो आणि त्यानंतर आपल्या खात्यातून बिलाचे पैसे समोरच्याच्या खात्यात वळवले जातात आणि बिल भरले जाते. अनेक खाजगी संस्था देखील डेबिट कार्ड सारखे कार्ड्स उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ – काही पेट्रोल पंप ग्राहकांना स्वतःचे कार्ड उपलब्ध करून देतात ज्यामध्ये ग्राहक त्या कार्ड मध्ये आधी पैसे भरून मग ते कार्ड वापरू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर डेबिट कार्ड ज्या खात्याशी जोडलेले आहे त्या खात्यामध्ये आधी पैसे भरावे लागतात मग त्यातले पैसे वापरता येतात.

सावधान, या १० चुकांमुळे इंटरनेटवर तुम्ही लुटले जाऊ शकता

हा लेख वाचला नसेल तर नक्की वाचा

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दिसायला सारखेच असतात पण त्या कार्ड वर ते डेबिट कार्ड आहे का क्रेडिट कार्ड हे लिहिलेले असते. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने किंवा इतर संस्थेने उपलब्ध करून दिलेले असे कार्ड यामध्ये आपल्याला सुरुवातीला पैसे भरावे लागत नाहीत. उदाहरणार्थ – तुम्हाला जर ५ हजार रुपयांची वस्तू विकत घ्यायची असेल तर आधी तुमच्या खात्यात तेवढे पैसे आवश्यक असणे आवश्यक होते पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ते कार्ड वापरून ती ५ हजार रुपयांची वस्तू विकत घेऊ शकता आणि नंतर ते पाच हजार रुपये या बँकेने किंवा संस्थेने तुम्हाला क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत त्यांना परत द्यावे लागतात. क्रेडिट कार्ड घेताना जसा करार झाला आहे त्या करारानुसार तुम्ही जर वेळेत पैसे दिले नाहीत तर बँक किंवा संबंधित संस्था तुमच्यावर दंड लावू शकते ज्यामुळे पाच हजार रुपये तर द्यावे लागतीलच वर व्याज आणि दंडाची जी काही रक्कम असेल ती द्यावी लागेल, तसे न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. क्रेडिट कार्ड कसे काम करते हे समजून न घेता जर क्रेडिट कार्डचा अमर्याद वापर केला तर त्याचा भयंकर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात तुम्ही बँक किंवा संबंधित संस्थेचे कर्जदार होता.

नवे डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड

आज-काल आलेल्या नवीन डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स वर तुम्हाला वाय-फाय सारखे चिन्ह दिसू शकेल. या चिन्हाचा अर्थ म्हणजे तुम्हाला कोणताही पिन न वापरता केवळ मशीन जवळ जरी हे कार्ड नेले तरीदेखील पैसे चुकते करता येतात. आपण आजपर्यंत वापरत असलेल्या कार्ड्सना मशीनमध्ये टाकून त्यावर आपला पिन क्रमांक टाकला तरच आपल्या खात्यातून पैसे वळते व्हायचे. नवीन आलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स मध्ये ही सुविधा आहेत पण याशिवाय देखील तुम्ही बऱ्याचदा मशीनच्या जवळ कार्ड येऊन पैसे भरू शकता, असे करताना पिन टाकण्याची आवश्यकता नसते. सध्यातरी बँकांनी ठरवलेली मर्यादा ही 2,000 रुपये आहे. म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्यावर तेवढे पैसे भरताना तुम्हाला पिन टाकण्याची आवश्यकता नाही पण २ हजार रुपयांच्यावर जर पैसे भरायचे असतील तर पिन क्रमांक टाकावा लागतो. अशा पद्धतीचे कार्ड वापरताना सावधगिरी बाळगली नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नवीन पद्धतीचे आहे हे कसे ओळखायचे ?

डेबिट - क्रेडिट कार्ड
छायाचित्र – Anastasiia Ostapovych

सध्या बहुतांश बँकांमधून ग्राहकांना नवीन पद्धतीचे कार्ड दिले जाते. तुमच्याकडे असलेले तुमच्या खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नवीन पद्धतीचे असल्यास त्याच्या दर्शनी भागावर (म्हणजे जिथे तुमचे नाव आणि डेबिट कार्डचा नंबर दिला आहे त्या बाजूला) वायफायच्या चिन्हा प्रमाणे खूण दिसेल. जर तुम्हाला हि खूण आढळली तर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हे नवीन पद्धतीचे आहे. (वर असलेला फोटो पहा).

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सुरक्षित कसे ठेवावे ?

खालील काही मार्गांचा वापर करून आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवू शकतो तसेच चोरी किंवा गहाळ झाल्यावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे.

१. नोंद ठेऊ नका

तुमच्याकडे असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा नंबर कुठेही लिहून ठेवू नका. अगदी ई-मेलमध्ये, फोनमध्ये, डायरीमध्ये किंवा कुठेही डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डची संवेदनशील माहिती लिहिल्याने त्या माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.

२. माहिती देऊ नका

अनेकदा तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फोन करून, इमेल अथवा व्हाट्सअप वरून तुमच्या डेबिट कार्डचा किंवा क्रेडिट कार्डचा नंबर मागितला जाईल. अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या घटना भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दर तासाला घडत आहेत. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा तुमची खासगी माहिती मागण्याचा अधिकार नाही त्यामुळे बँकेतून फोन करत आहोत किंवा अजून कुठून फोन करत आहोत, तुमच्या नंबरला लॉटरीची रक्कम पाठवायची आहे, तुम्हाला गोव्याला जाण्यासाठी विनामूल्य तिकिटे मिळत आहेत अशा प्रकारच्या कोणतेही भूलथापांना बळी पडू नका आणि तुमची खासगी माहिती इतरांना देऊ नका. तुम्ही नुसता ओटीपी नंबर जरी कोणाला दिलात तर तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याचा अधिकार त्याला मिळतो त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

डेबिट – क्रेडिट कार्डची माहिती चोरून फसवणूक करणाऱ्यांवर नेटफ्लिक्सने एक वेब सिरीज तयार केली आहे त्याबद्दल माहिती देणारा हा लघुपट पहा

३. डेबिट – क्रेडिट कार्ड नीट बाळगा

ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याची सूचना पण बघितले पण पण तुमचे कार्ड गहाळ झाले किंवा चोरीला गेले तर त्या कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि तुमच्या खात्यातून रक्कम लंपास केली जाऊ शकते. हे टाळण्यासाठी तुमचे कार्ड सुरक्षित ठेवा आणि जर काही कारणांमुळे ते गहाळ झालेच किंवा चोरीला गेले तर तात्काळ बँकेशी संपर्क साधून ते बंद करा ज्यामुळे चोराला त्या कार्डचा वापरच करता येणार नाही.

४. अतिरिक्त सुरक्षा

नवीन पद्धतीचे कार्ड नुसते जरी मशीन च्या जवळ आणले तरी देखील त्याने पैसे भरले जाऊ शकतात ज्यामध्ये पिन क्रमांक टाकण्याची आवश्यकता नसते. फसवणूक करणारे आधुनिक पाकीटमार, मशीन तुमच्या कार्ड जवळ म्हणजेच तुमच्या पाकिटाजवळ आणतात जिथे आपण नेहमी कार्ड ठेवतो. असे केल्यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम आपोआप कापली जाते आणि पाकीटमाराच्या मशीन वर असलेल्या खात्यामध्ये जाऊन पोहोचते, दोन हजार रुपयांपर्यंत व्यवहार करायचा असेल तर पीन टाकण्याची आवश्यकता नसल्यामुळे हा व्यवहार आपोआप पूर्ण होतो. पोलीस तपास आणि इतर गोष्टींमुळे जरी त्या चोराला पकडणे सोपे असले तरी असे काही होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणे कधीही चांगले.

आधुनिक पाकीटमार तुमचे पैसे तुम्हाला हात न लावता देखील असे चोरू शकतात

तुमचे जर नवीन पद्धतीचे कार्ड असेल तर Anti RFID कार्ड कव्हर किंवा Anti RFID पाकिटांचा वापर करा. इंटरनेटवर अशा कार्डचा बचाव करण्यासाठी कव्हर्स आणि पाकीटं उपलब्ध आहेत. ही खास पद्धतीची कव्हर्स आणि पाकीटं, मशीन आणि कार्ड मध्ये संपर्क होऊ देत नाहीत आणि सिग्नल मध्ये बाधा आणतात त्यामुळे व्यवहार पूर्ण होत नाही. आता अशा पद्धतीची कव्हर किंवा पाकिटं बनावट देखील असू शकतात त्यामुळे योग्य ठिकाणहून ती खरेदी करा. ऍमेझॉन वरून कव्हर किंवा पाकिट मागविण्यासाठी खालील बटनांवर क्लिक करा

तुम्हाला जेव्हा तुमचे कार्ड वापरायचे असेल तेव्हा ते पाकिटातून किंवा कव्हर मधून बाहेर काढून वापरायचे आणि पुन्हा पाकिटात किंवा या कव्हर मध्ये ठेवायचे ह्यामुळे तुम्हाला हवे तेव्हाच त्याकाळची सुविधा वापरली जाऊ शकते.

५. डेबिट – क्रेडिट कार्ड बदलून घेणे

नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपला वेळ वाचवणे हे जरी योग्य असले तरी कोणते तंत्रज्ञान कधी वापरायचे हा निर्णय ज्याचा त्याचा वैयक्तिक असायला हवा त्यामुळे तुम्हाला जर कार्ड मध्ये अशा पद्धतीची सुविधा नको असेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता आणि सध्या असलेले कार्ड बंद करून बँकेला सांगून RFID नसलेले साधे कार्ड मागू शकता ज्यात नेहमीप्रमाणे मशीन मध्ये कार्ड टाकून नंतर पिन क्रमांक टाकून व्यवहार करू शकता.

आपण काय पाहिलं ?

डेबिट कार्ड म्हणजे खात्यामध्ये आधीच असलेले पैसे वापरून व्यवहार करण्यासाठी बँक किंवा इतर संस्थेने दिलेले कार्ड एटीएम कार्ड ही म्हटले जाते. क्रेडिट कार्ड म्हणजे खात्यामध्ये पैसे नसतानादेखील बँक किंवा संबंधित संस्थेकडून लगेच कर्ज घेऊन बिल भरण्यासाठी असलेले कार्ड. क्रेडीट कार्डद्वारे खर्च केलेल्या रकमेची काही दिवसांमध्ये परतफेड करावी लागते. इंटरनेटवर वेगळ्या पद्धतीने फसवणूक केली जाते ज्यामध्ये सर्वाधिक फसवणूक ही आपण आपली खाजगी माहिती (उदाहरणार्थ – कार्डचा क्रमांक, पासवर्ड किंवा ओटीपी क्रमांक) इतरांना दिल्यामुळे होते.

RFID तंत्रज्ञान असलेले कार्ड म्हणजे जे कार्ड फक्त मशीनच्या (किंवा काही मोबाईलच्या) जवळ नेल्यामुळे खात्यातून पैसे वळते केले जाऊ शकतात. याचा एक फायदा असा म्हणजे दर वेळेला पिन क्रमांक टाकावा लागत नाही पण ह्याचा तोटा म्हणजे तुमच्या नकळत तुम्ही व्यवहार सुरु असलेल्या मशीन जवळ (किंवा ती सुविधा असलेल्या फोन जवळ) कार्ड नेले किंवा तुमच्या नकळत कोणी व्यवहार सुरू करून त्यांचे मशीन किंवा फोन तुमच्या कार्ड जवळ म्हणजेच पाकिटा जवळ आणला तरीदेखील व्यवहार केला जाऊ शकतो आणि तुमच्या खात्यातून पैसे लंपास होऊ शकतात. अशा पद्धतीचे फसवणूक टाळण्यासाठी Anti RFID कार्ड कव्हर किंवा Anti RFID पाकिटांचा वापर करावा. तुम्हाला जर अशा पद्धतीची सुविधा नको असेल तर बँकेला कळवून RFID नसलेले कार्ड मागून घ्यावे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच तुमच्या मित्र परिचितांना अशा पद्धतीच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांना ह्या लेखाची लिंक पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*