आपण प्रदूषण व त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबद्दल दिवसेंदिवस बातम्या वाचत असतो. आपण जर आज योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात स्थिती आणखीनच बिकट होऊ शकते. आपली जीवनशैली जसजशी निसर्गापासून दूर होत गेली त्याप्रमाणात निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या बाबतीत होणाऱ्या समस्या वाढू लागल्या. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीची समस्या गंभीर वळणावर आहे. मुंबईसारखी शहरं पावसाळ्यात पाण्याखाली जाणे हे आपल्याला नवीन नाही आणि हेच चित्र जर बहुतांश शहरांमध्ये वर्षभर दिसायला लागले तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. आपण पर्यावरणाची सुसंगत अशी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे आणि पर्यावरण पूरक घर म्हणजे याचीच एक सुरुवात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज पर्यावरण संबंधित कोणती संकटं आहेत ?
आजच्या घडीला पर्यावरण संदर्भात असलेल्या संकटांचा विचार केला तर कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमान वाढ, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ऊर्जेच्या अपारंपरिक स्त्रोतांचा ह्रास, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई अशा पद्धतीची अनेक संकटं आहेत. केवळ माणूसच नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला या संकटांचा परिणाम भोगावा लागणार आहे. यातील बहुतांश समस्यांचे समाधान हे दीर्घकालीन धोरणांवर अवलंबून आहे. आपली जीवनशैली जितकी निसर्ग पूरक करता येईल तितका आपल्याला या समस्यांचा सामना करण्यासाठी उपयोग होईल. इको-होम्स म्हणजेच पर्यावरण पूरक घरं हा निसर्गाशी एकरूप होण्याचा असाच एक प्रयत्न आहे.
इको-होम्स म्हणजेच पर्यावरण पूरक घर म्हणजे काय ?
थोडक्यात सांगायचे झाले तर पर्यावरण पूरक घर म्हणजे अशा पद्धतीचे घर किंवा इमारत ज्यामध्ये केवळ नैसर्गिक संसाधनांचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीचे घर बांधताना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन हाच मूळ हेतू आहे. असे असले तरी, पर्यावरण पूरक घरांमुळे उर्जेवर होणारा खर्च देखील टाळला जाऊ शकतो याशिवाय काही ठिकाणी सरकार द्वारे मिळणाऱ्या अनुदानामुळे पर्यावरण पूरक घर बांधण्याची किंमत देखील कमी होऊ शकते.
२० व्या शतकात वीज न वापरता जगता येऊ शकते का ?
पर्यावरण पूरक घराच्या मुख्य बाबी
पर्यावरण पूरक घरांमध्ये कोणकोणत्या मुख्य बाबींचा समावेश होतो याबद्दल माहिती घेऊयात
१. हरित घटक (पर्यावरण पूरक घर)
पर्यावरण पूरक घरांचे बांधकाम करताना हरित घटकांना अधिक प्राधान्य दिले जाते. हरित घटक म्हणजे असे घटक त्यांचे विघटन करायचे झाल्यास सहजासहजी नैसर्गिक पद्धतीने करता येऊ शकते. अशा पद्धतीचे घटक तयार करताना इतर उत्पादनांपेक्षा कमी प्रदूषण होते याशिवाय हे घटक विघटन झाल्यावर प्रदूषण करत नाहीत. अशा पद्धतीचे घटक हे आधी वापरलेले लाकूड, काच, धातु किंवा प्लास्टिक पासून तयार केले जातात. थोडक्यात टाकाऊ पासून टिकाऊ तयार होऊ शकणारे घटक.
२. ऊर्जेची निर्मिती (पर्यावरण पूरक घर)
लाईट बिल अधिक आल्यामुळे आपले आर्थिक गणित बिघडते याशिवाय अपारंपरिक ऊर्जेचा वापर होतो. पर्यावरण पूरक घरांमध्ये ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी व्यवस्था असल्यामुळे लाईटच्या बिलावर होणारा खर्च टाळता येतो. उदाहरणार्थ – सोलर पॅनल बसवल्यामुळे फक्त पाणी तापवणे नाही तर घराला आवश्यक असणारी वीज निर्माण केली जाऊ शकते. आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असू शकते.
सौरऊर्जेसाठी अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) शी संपर्क साधा
३. प्रकाशाची सोय (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नैसर्गिक)
पर्यावरण पूरक घरांमध्ये प्रकाशाची देखील योग्य सोय केलेली असते. नैसर्गिक उजेड योग्य प्रमाणात संपूर्ण घरात वापरता येईल असा विचार असतोच पण त्याचबरोबरीने LED बल्ब, LED ट्यूबलाईट अशा कमी ऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जातो ज्यामुळे ऊर्जेच्या एकूण वापरात घट होते.
४. पर्यावरण पूरक उपकरणे
घरात वापरणारी उपकरणे देखील पर्यावरण पूरक असतात. आजकाल बाजारात मिळणार्या उपकरणांवर स्टार पद्धतीने पर्यावरण संबंधित दर्जा दाखवण्याची सोय केलेली असते. उदाहरणार्थ एखाद्या फ्रिजवर जर पाच पैकी चार स्टार दिलेले असतील तर ते फ्रिज कमी ऊर्जेचा वापर करून पर्यावरणासाठी ८०% उपयुक्त आहे.
भविष्यातील गरज

आज जरी आपल्याला अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापरून आपली काम करता येत असली तरीही कधी ना कधीतरी अपारंपरिक ऊर्जेचा स्त्रोत हा संपणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने पाऊलं टाकणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी आपण फक्त एक चांगले जग देऊ शकतो आणि त्याची सुरुवात हे आपल्या घरापासूनच होते. निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या विपरीत जाऊन माणूस कधीही यशस्वी होऊ शकणार नाही ही गोष्ट वेळीच ध्यानात घेऊन पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारणे हीच भविष्यातील गरज असणार आहे.
हा लेख देखील अवश्य वाचा
आपण काय पाहिलं ?
पर्यावरणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत जात आहे कारण माणसाने आपली जीवनशैली ही पर्यावरणाच्या विपरीत जाऊन निर्माण केली आहे. पर्यावरणाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी माणसाला पर्यावरणाचा भाग होऊन जगावे लागेल आणि याची सुरुवात पर्यावरण पूरक घरांपासून करणे आवश्यक आहे. पर्यावरण पूरक घरे म्हणजे जिथे दैनंदिन वापरासाठी ऊर्जेची निर्मिती केली जाते, जिथे उजेडाची योग्य सोय असते, विद्युत उपकरणे देखील पर्यावरण पूरक अशीच असतात आणि अशा घरांची निर्मिती ही पर्यावरणपूरक घटक वापरून केलेली असते. भविष्यात हे संकट अजून वाढत जाईल त्यामुळे काळाची गरज ओळखून आपण आजच पर्यावरण पूरक घरांचा गांभीर्याने विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे.