साम्राज्यवादी ब्रिटिशांना जगातील सगळ्या देशांवर राज्य करायचे होते अशावेळी ते जिथल्या ठिकाणी राज्य करत होते तिथल्या लोकांची पिळवणूक करून स्वतःचे जागतिक महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत होते. साधारण सन अठराशेच्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. संपूर्ण जगावर आपले राज्य प्रस्थापित करायचे असल्यामुळे ब्रिटिशांना जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती तयार करणे महत्त्वाचे वाटू लागले आणि ह्याच अट्टाहासामुळे उदयास आली गिरमिट प्रथा आणि गिरमिटिया.
गिरमिटिया म्हणजे कोण ?
आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी ब्रिटिशांचे वसाहतवादाचे धोरण सुरू झाले. एखाद्या नवीन शहर वसवायचे असेल किंवा नवीन वसाहत तयार करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची साधन संपत्ती म्हणजे आपला घाम गाळून ते शहर उभं करणारे मजूर हे आहेत हे ब्रिटिशांनी ओळखले. भारतीय लोक मेहनती आणि इमानदार असल्यामुळे त्यांना मजूर म्हणून तेव्हाच्या जुलुमी कायद्यांचा आधार घेऊन नव्या वसाहती उभ्या करण्यासाठी नेण्यात आले. नवी वसाहत उभी करायची असल्यामुळे आम्ही स्वखुशीने मजूर म्हणून येत आहोत असा करार अर्थात एग्रीमेंट त्या लोकांशी केले जायचे आणि याच एग्रीमेंट शब्दाचा अपभ्रंश होऊन गिरीमेंट आणि असा एग्रीमेंट करणारा ‘गिरमिटिया’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
गिरमिटियांची पिळवणूक
वरवर पाहता हा जरी सर्वसामान्य करार वाटत असला तरी केवळ एकदा एग्रीमेंट करून अनेक वर्ष मजुरांची पिळवणूक केली जात असे. सुरुवातीलाच जेवढे पैसे घेतले आहेत ते पैसे परत दिले तरी गिरमिटिया लोक गुलामीतून मुक्त होऊ शकत नव्हते. कायद्याचा खेळ असा होता की कागदोपत्री केवळ पाच वर्षांचा करार होता त्यामुळे ज्या ठेकेदाराने गिरमिटिया म्हणून मजुरांना आणले आहे त्याच्याकडे काम करण्याचे बंधन करारानुसार केवळ पाच वर्षे होते पण पाच वर्षांनंतर मजूर करारातून मुक्त जरी झाले तरी भारतात येण्याइतके पैसे त्यांच्याकडे नसायचे त्यामुळे त्यांना आधीच मालकाकडे जाऊन पुन्हा अग्रीमेंट करावे लागायचे किंवा नवीन मालकाशी अग्रीमेंट करण्याची सोय होती पण नवीन अग्रीमेंट म्हणजे पुन्हा पाच वर्षाची गुलामगिरी. कुठल्याही मालकाकडे काम करताना काम केले नाही किंवा कामात काही गडबड झाली तर त्यांचे शोषण होत असे.
कौटुंबिक पार्श्वभूमी

गिरमिटियांना लग्न करण्याची परवानगी होती पण लग्न जरी केले तरीदेखील ते गुलाम म्हणूनच वागवले जायचे याचा अर्थ त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. त्यांच्या बायकापोरांना कोणालाही विकण्याची मुभा मालकाला होती. पुरुषांच्या तुलनेत साधारणपणे 40 टक्के बायका गिरमिटिया म्हणून जायच्या, त्यातल्या तरुण मुलींना मालकांच्या वासनापूर्तीसाठी ठेवले जात असे ज्यात त्यांचे शोषण केले जात असे. त्या मुलींचे वय वाढल्यानंतर त्यांना मजुरांकडे परत पाठवले जात असे. गिरमिट यांची मुलंबाळं मालकांची संपत्ती असे त्यामुळे ती मुले मोठी झाली की त्यांना स्वतःकडे मजुरी करायला ठेवून घेतले जात असे किंवा इतरांना विकले जात असे. मजुरांना शिक्षण, मनोरंजन इत्यादी गोष्टी तर दूरच पण माणूस जगेल एवढे अन्न आणि काही कपडे एवढंच दिला जात असे. दिवसातल्या 24 तासातले 12 ते 18 तास त्यांच्याकडून मेहनत करून घेतली जात असे. माणसाला काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या परिस्थितीत यांच्याकडून काम करून घेतले जात असल्यामुळे अनेक मजदूर दर वर्षी अकाली मरण पावत.
गिरमिटिया प्रथेविरोधात आंदोलन
वरकरणी कायदेशीर भासणाऱ्या या प्रत्येकाच्या तळाशी मानवी मूल्य वर्षानुवर्ष पायदळी तुडवली जात होती. महात्मा गांधींनी या प्रथेविरोधात दक्षिण आफ्रिकेतून मोहीम छेडली. भारतात देखील गोपाळकृष्ण गोखले यांनी इंपीरियल लेजिस्लेटिव काउंसिल मध्ये मार्च 1912 मध्ये गिरमिटिया प्रथा संपवण्याचा प्रस्ताव ठेवला. जोपर्यंत ही अमानवी प्रथा संपवली जात नाही तोपर्यंत दरवर्षी आम्ही हा प्रस्ताव मांडत राहू ही भूमिका कौन्सिल मधल्या बावीस सदस्यांनी भूमिका घेतली. डिसेंबर 1916 मधल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत सुरक्षा आणि गिरमिट प्रथा अधिनियम नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर एका महिन्यातच फेब्रुवारी 1917 मध्ये अहमदाबाद शहरात गिरमिट प्रथेच्या विरोधात एका विशाल सभेचे आयोजन केलं गेलं. या सभेमध्ये सीएफ एंड्रयूज, हेनरी पोलाक यांनी सदर प्रथेविरोधात आपले मत मांडलेच याशिवाय सरोजनी नायडू, पंडित मदन मोहन मालवीय, जिन्ना या भारतीय नेत्यांनी देखील गिरमिट प्रथा संपवण्याच्या मोहिमेमध्ये भरीव योगदान दिले. पुढील काळात गिरमिट विरोधी मोहीम वेग पकडू लागली आणि सन 1917 मध्ये गिरमिट प्रथेच्या विरोधातील मंडळींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. प्रथेच्या विरोधात वाढता असंतोष बघता ब्रिटिश सरकारने १२ मार्च १९१७ मध्ये गिरमिट प्रथेला स्थगिती दिली.
गिरमिटियांचे वंशज

गिरमिट प्रथा संपल्यानंतर भारतातून मजूर पाठवणे थांबले तरी अनेक मजुरांनी तिथे थांबणे पसंत केले किंवा इतर उपाय नसल्यामुळे त्यांना तिथे थांबणे भाग होते. आज त्याच गिरमिट यांचे वंशज त्या त्या देशातील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण मॉरिशस मधील बहुतांश राष्ट्राध्यक्ष आहे बिहारी मुळ असलेले आहेत. अनेक देशातील राष्ट्राध्यक्ष हे भारतीय मूळ असलेले आहेत ज्यांच्या पूर्वजांना गिरमिटिया म्हणून भारताबाहेर नेण्यात आले होते. 2013 साली जेव्हा मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष श्री.राजकेश्वर पुरियांग जेव्हा बिहार मध्ये त्यांच्या मूळ गावी आले होते तेव्हा ते अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले.