काहींना सन्यास घेऊन हिमालयात जाण्याची इच्छा असते किंवा काहींना पॅरिसमध्ये जाऊन आयफेल टॉवरसमोर थांबून सेल्फी काढण्याची इच्छा असते. तुम्हाला कधी घरदार सोडून निघून हिंडायला जावंस वाटतं का? नाही वाटतं असलं तरीही जबाबदाऱ्या आणि कोरोना महामारीमुळे मनासारखा मोठ्या कालावधीचा प्रवास घडेल अशी काही चिन्ह नाहीत पण काही लोकं आजही जगभर फिरत आहेत. हिचहायकिंग म्हणजे काय ह्या बद्दल आणि अनेक वर्ष जग भ्रमण आणि प्रवास करायला निघालेले भटक्यांविषयी माहिती घेऊ.
हिचहायकिंग म्हणजे काय रे भाऊ?
हिचहायकिंग म्हणजे प्रवासाचा असा प्रकार ज्यात मिळेल त्या वाहनाने जग फिरायचे. एका देशातून सुरु करून ठरवल्याप्रमाणे वेगवेगळे देश फिरायचे आणि जमेल त्या वाहनाने प्रवास करत वेगवेगळ्या देशातील माणसं, तिथली संस्कृती जाणून घ्यायची. अशा प्रवासात काही वेळा विमानाचा वापर करावा लागतो तर काही वेळा सायकल वर सुद्धा कोणीतरी तुम्हाला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी लिफ्ट देतं. एखाद्या देशात फक्त प्राण्यांवर बसून प्रवास करावा लागू शकतो तर काही ठिकाणी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. हिचहायकिंगची सुरुवात जरी अमेरिकेत झाली असली तरीही हा प्रकार नंतर युरोपात आणि आता जगभर पसरतोय. जे भटके लोक हिचहायकिंग करतात त्यांना हीचहायकर्स म्हंटल जाते.
हिचहायकिंगचे उद्योग कशासाठी? (जग भ्रमण आणि प्रवास का ?)
जग भ्रमण करणाऱ्यांचे वेगवेगळे विचार लक्षात घेतले तर अनेक प्रश्नांना एक उत्तर नसते पण तरी सगळ्या उत्तरातून एक ल.सा.वी काढायचा झालाच तर साहस म्हणून अनेक जण हिचहायकिंग करतात. काही लोकांना बंधनात प्रवास करायला आवडत नाही त्यामुळे ते हिचहायकिंगचा पर्याय निवडतात. हिचहायकिंगमध्ये खरं तर खूप पैसे लागतात असंही नाही कारण अनेकदा अनोळखी लोकांच्या चांगुलपणावर हीचहायकर्सचे काम भागतं. प्रवासात बऱ्याचदा लोकं लिफ्ट देतात त्यामुळे अगदीच विनामूल्य नसला तरी कमी पैशात जास्त प्रवास करता येतो. ह्याशिवाय स्वतः कुठून कुठे जायचे आणि तिथे किती वेळ, दिवस, आठवडे किंवा महिने तिथे थांबायचे ह्याचा निर्णय हीचहायकर्स स्वतः घेतात त्यामुळे त्यांना हवे तसे स्वातंत्र्य मिळते. बऱ्याच देशात सार्वजनिक वाहतूक देखील तशी स्वस्त असते. काही ठिकाणी राजा सारखा पाय पसरून प्रवास करता येतो तर काही ठिकाणी प्रजेसारखं लोकल ट्रेन मध्ये लटकून जावं लागतं. दर वेळी लिफ्ट मागण्याची वेळ येत नाही.

हिचहायकिंगसाठी आवश्यक सामान (जग भ्रमण आणि प्रवास)
खरं तर जितके कमी सामान तितका जलद प्रवास हे आपल्याला माहिती आहेच पण अनेक देशातून हिचहायकिंग करायचे असल्यामुळे सगळा विचार करून सामान निवडणे आवश्यक असते. आता नक्की कोणते सामान न्यायचे हे प्रत्येक हीचहायकर त्याच्या गरजेप्रमाणे ठरवतो पण सामान्यतः हिचहायकिंग करताना खालील सामान बाळगतात.
१. दणकट बॅग
आता सगळ्याच गोष्टी हातात घेऊन फिरणे शक्य नाही शिवाय अनेक देशांतून प्रवास करायचा असल्यामुळे पासपोर्ट, व्हिसा सारख्या महत्वाच्या गोष्टी सांभाळण्यासाठी एक दणकट बॅग असणे आवश्यक आहे. सगळं सामान एकदा त्या बॅगेत ठेवलं कि ‘हम तो फकीर है जी, झोला उठाके निकल पडे’ हा डायलॉग मारायला हिचहायकर मोकळे. वस्तू सांभाळायला सुरक्षित आणि भरपूर चालायची वेळ आली तरी खूप जाड होणार नाही अशी ती बॅग असते. जग भ्रमण करताना अशी आधुनिक झोळी असायलाच हवी.
२. हायकिंग बूट
सहसा हिचहायकर्स मानवी वस्ती असलेल्या भागातूनच प्रवास करतात पण काही वेळा आडवाटेवरून जायची वेळ आली तर कित्येक किलोमीटर पायी चालत जाण्याची वेळ येऊ शकते अशा वेळी पॅरेगौण ऑफिस चप्पल अजिबात चालणार नाहीत म्हणून हायकिंग साठी वापरण्यात येणारे चांगल्या प्रतीचे बूट असणे आवश्यक आहे. खरं सांगायचं तर कुठे काही गडबड झाली तर उसेन बोल्टच्या वेगात पळून जाता आलं पाहिजे कारण प्रवासात चांगली लोकं भेटतात तशी वाईट लोकं पण हमखास भेटतात.
३. रेनकोट आणि कव्हर
हिचहायकर्स अनेक दिवस, आठवडे, महिने, वर्ष एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात त्यामुळे सतत बदलत्या वातावरणात स्वतःचे शरीर आणि मौल्यवान वस्तू जपणे आवश्यक असते. त्यामुळे पावसापासून वाचवतील असा चांगला रेनकोट आणि बॅग वैगेरे सुरक्षित राहील असे कव्हर ते बाळगतात.
४. खाणं-पिणं
आता पुढचा थांबा कधी येईल आणि तिथे काही खाण्या-पिण्याची सोय वैगेरे असेल कि नाही हे ठामपणे सांगणे कठीण असते. मानवाच्या तीन मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्यापैकी निवारा आणि वस्त्र सहज उपलब्ध होऊ शकतात पण शरीराला पचेल असे अन्न उपलब्ध होईलच ह्याची खात्री नसते म्हणूनच त्यामुळे हिचहायकर थोडं खाणं आणि पाणी स्वतःबरोबर नेहेमी ठेवतात.
५. इतर वस्तू
इतर वस्तूंमध्ये पासपोर्ट, व्हिसा, काही वेळा फोन आणि कॅमेरा, डायरी, नकाशे आणि ‘मी हिचहायकर आहे, मला जरा लिफ्ट देता का?’ असा इंग्रजीत किंवा ज्या देशात आहेत त्या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषेत मजकूर लिहिलेला बोर्ड सोबत ठेवतात. पासपोर्ट आणि व्हिसा सोडून इतर गोष्टी कुठेही विकत घेता येतात त्यामुळे फारशी काळजी करण्याचे कारण नसते. जग भ्रमण करायला निघालेले असले तरीही मूळ कुठले आहात ह्याचे पुरावे जवळ ठेवायलाच हवेत.
हिचहायकिंगसाठी किती पैसे लागतात आणि ते पैसे कुठून येतात?
आपण आधी बघितल्याप्रमाणे हिचहायकर्स मुख्यतः लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून असतात. प्रवासात सगळ्यात जास्त येणारा खर्च म्हणजे प्रवास हाच आहे. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फुकट जाण्याचा मार्ग निवडला तर खूप मोठी बचत होते. ह्याशिवाय डॉरमेटरी मध्ये इतर हिचहायकर्स बरोबर राहिल्यास खर्च अजून कमी येतो आणि सामान कमीत कमी असावे म्हणून हिचहायकर्स उगाच नको असलेल्या वस्तूंची खरेदी करत नाहीत त्यामुळे त्याचाही खर्च वाचतो आता उरतो तो खाण्यापिण्याचा खर्च. लोकांचा चांगुलपणा इथेही कामाला येत असला तरी स्वतः विकत घेऊन खाण्याचा खर्च देखील फार येत नाही. साधारण टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्या ज्या खर्चात काही आठवड्यांची सहल घडवून आणतात तेवढ्या पैशात हिचहायकर्स काही महिने काटकसर करून काढू शकतात. थोडक्यात काय तर किती पैसे लागतील हे ज्याच्या त्याच्या खर्च करण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. काहींना महिना १५-२० हजार रुपये सुद्धा खूप होतात तर काहींना महिना १-२ लाख रुपये सुद्धा कमी पडतात. थोडक्यात जग भ्रमण करणारे स्वतःच किती खर्च होईल हे नियंत्रित करू शकतात.
हिचहायकर्स स्वतःच्या बचतीतून हा सगळं खर्च करतात किंवा प्रवासात काही छोटी मोठी कामं करून पैसे कमावतात ह्याशिवाय काही हिचहायकर्स ब्लॉग लिहून किंवा युट्युब चॅनेल चालवून पैसे कमावतात. काही हिचहायकर्सच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यामुळे ते घरून पैसे मागवतात. खरं तर हिचहायकिंगसाठी पैसे महत्वाचे नसून साहस, आवड आणि जिद्द असणे आवश्यक आहे.
Hitchhiking Crash Course: How to Travel the World and Meet Cool People
हिचहायकींगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल
हिचहायकिंगचेचे फायदे काय आहेत? (जग भ्रमण आणि प्रवास)
नेहेमीच्या प्रवासापेक्षा हिचहायकिंगचे फायदे जरा वेगळे आहेत आणि हे फायदे प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार वेगवेगळे असू शकतात पण अनेक हिचहायकर्सना जे सामान्यपणे फायदे जाणवतात ते खालीलप्रमाणे
१. नवीन लोकांना भेटणे
जगातील प्रत्येक माणूस वेगळं अस्तित्व घेऊन जन्माला आलेला आहे. तुम्हाला जगात कुठेही एकसारखी दोन माणसं आढळणार नाहीत त्यामुळे जितक्या जास्त माणसांना आपण भेटतो तेवढे नवीन आचार, विचार आणि सवयी आपल्याला बघायला मिळतात. हिचहायकर्सना जगभरातील वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी मिळते.
२. स्वस्त प्रवास आणि जग भ्रमण
प्रवास करणे म्हणजे सामान्यतः खर्चिक काम असा गैरसमज आहे आणि त्याही अनेक महिन्यांचा किंवा वर्षांचा प्रवास म्हणजे लाखो करोडो रुपये लागणार असा गैरसमज असतो पण हिचहायकिंगची गम्मत ह्यातच आहे. लोकांच्या सहकार्याने स्वस्तात अधिक अंतराचा प्रवास करता येतो.
३. व्यक्तिमत्व विकास
प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे हिचहायकिंग करणाऱ्या माणसाचे व्यक्तिमत्व विकसित होते. नवनवीन प्रदेश, तिथली भाषा, संस्कृती ह्याबद्दल शिकायला मिळते.
हिचहायकिंगचे तोटे काय आहेत? (जग भ्रमण आणि प्रवास)
प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू असते तसेच हिचहायकिंग मध्ये सुद्धा काही तोटे आहेत, अर्थात हिचहायकरचे कौशल्य आणि अनुभव वापरून ह्या तोट्यांचा परिणाम कमी केला जाऊ शकतो.
१. अनिश्चितता
काही जणांसाठी साहसी असली तरी अनेक जणांसाठी अनिश्चितता हि अवघड असू शकते. कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल, कोणत्या दिवशी कुठे आणि कुठल्या परिस्थितीत असणार आहोत हे माहिती नसते.
२. संभाव्य धोके
प्रत्येक देश वेगळा असतो आणि तिथली लोकं तिथले राहणीमान वेगळे असते हिचहायकरच्या नकळत एखादी चूक घडली तर तिथल्या धोक्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते.
३. आरोग्यावरील परिणाम
प्रत्येक ठिकाणचे हवामान, पाणी, अन्न थोड्याफार प्रमाणात वेगळे असते आणि शरीर जर हे १२ गावचे पाणी पचवू शकले नाही तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
थोडक्यात काय तर (जग भ्रमण आणि प्रवास)
हिचहायकींग म्हणजे मनस्वी भटकेगिरी करणे आणि वेगवेगळ्या मुलखात जाऊन तिथली माणसं, जागा, जीवनशैली, भाषा आणि संस्कृती जाणून घेणे. आजकालची जीवनशैली बघता आपले आयुष्य फार तर फार ७०-८० वर्षाचे आहे आणि त्यातही उमेदीची वर्ष ३०-४० पण हि गोष्ट लक्षात येईपर्यंत आपण तिशी ओलांडलेली असते. हिचहायकिंग हा आयुष्यात एकदातरी नक्की घ्यावा असा अनुभव आहे. अनेक हिचहायकर्स काही आठवडे सुद्धा हिचहायकिंग करतात त्यामुळे एकदा हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. तुम्हाला ‘हिचहायकर्स : घरदार सोडून अनेक वर्ष जग फिरायला निघालेले भटके’ हा लेख आवडला असेल तर मराठी प्लस वरील ह्या लेखाची लिंक आपल्या परिचितांना नक्की पाठवा.
एयर बीएनबी म्हणजे काय ? | Marathi.Plus
सप्टेंबर 28, 2020 at 10:30 pm[…] […]
नामदेव बडगुजर,
जून 23, 2021 at 11:16 amज्या कोणी व्यक्तीने ही संपूर्ण माहिती टाकली त्या व्यक्तीला खुप खुप धन्यवाद… जगाचा मुक्त व कमी खर्चात प्रवास करणाऱ्यांसाठी हा लेख दिपस्तंभ आहे. अंत्यत महत्वाची माहिती इथं आपण मांडली ती खुप कामी व लक्षात ठेवण्याजोगी आहे.
मला अजून माहिती मिळवायची असेल तर कृपया कोणाशी संपर्क करावा लागेल, तसे कळवावे.
माझीही खुप इच्छा आहे जग फिरण्याची. जगातल्या चालीरीती, परंपरा, माणसं, संस्कृती बघण्याचे मलाही खुप वेड आहे. कृपया मला संपर्क साठी माहिती द्या.
धन्यवाद…
नामदेव बडगुजर, जळगांव महाराष्ट्र.
मो. 8459934116.
सरपंच
ऑगस्ट 28, 2021 at 3:13 pmतुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद. तुम्हाला लेख आवडला हे वाचून आनंद झाला. तुम्हाला हिचहायकिंग करायचे असेल तर प्रत्यक्ष हिचहायकर्सशी संपर्क करून अधिक माहिती मिळवता येईल.
Nomad Shubham सारख्या अनेक लोकांच्या युट्युब चॅनेल वर तुम्हाला हिचहायकिंग बद्दल अधिक माहिती मिळू शकेल ह्याशिवाय काही फेसबुक, टेलिग्राम वर ग्रुप्स पण तुम्ही जॉईन करू शकता..
तुमच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.