भारतीय खाद्य पदार्थांबद्दल १० रंजक गोष्टी

खाद्यपदार्थ

‘खाण्याने होत आहे रे आधी खाल्लेची पाहिजे’ असे म्हणत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारणारा भारतीय माणूस हा जन्मापासून खवय्या आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगातील प्रत्येक घडामोड ही दोन वेळच्या घासासाठीच होत असते. माणसाच्या मूलभूत गरजा नुसार अन्न, वस्त्र आणि निवारा यामध्ये अन्नाचा नंबर प्रथम लागतो. खायला आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही, त्यात जर खाणे भारतीय असेल तर बातच न्यारी. तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल तर तुमच्या आजूबाजूला उपलब्ध होणारा कोणताही खाद्य पदार्थ पदार्थ उचलून तो खात-खात ह्या लेखाचा आस्वाद घेतला तरी चालेल.

लोकप्रिय खाद्य पदार्थ

भारतीय खाद्य पदार्थांबद्दल १० रंजक गोष्टी
महाराष्ट्राचा मिसळपाव (छायाचित्र – आदित्य जोशी)

बंगालचा कोशा मांगशो असेल, गुजरातचा ढोकळा असेल, तामिळनाडूमधला पोंगल असेल, आसाममधील पपाया खीर असेल, बिहार मधला लिट्टी चोखा असेल, हैदराबाद तेलंगणाची बिर्याणी असेल, उत्तराखंड मधली काफूली असेल, केरळमधील आप्पम असतील, राजस्थान मधील दाल बाटी चुरमा असेल, हरियाणा मधली बाजरीची खिचडी असेल, सिक्कीम मधले मोमोज असतील, कर्नाटकचा भिशीबेळी भात असेल किंवा महाराष्ट्राचा मिसळ पाव असेल. भारतीय पदार्थांची चव म्हणजे वेगवेगळ्या सुखांचा अनुभव आहे. तुम्ही जर प्रत्येक राज्यातील अशा लोकप्रिय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नसेल तर तो अवश्य घ्या. आजच्या लेखामध्ये आपण भारतीय पदार्थांविषयी काही रंजक तथ्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

१. खाद्य पदार्थांची वर्गवारी

भारतीय पदार्थांची त्यांच्या गुणधर्मानुसार मुख्यतः तीन भागात वर्गवारी केलेली आहे. सर्वात आधी येणारा वर्ग म्हणजे सात्विक पदार्थ ज्यात ताजी फळे आणि फळांचा रस समाविष्ट होतो. त्यानंतर येणारा वर्ग म्हणजे राजसिक पदार्थ ज्यात तेलकट आणि तिखट पदार्थांचा समावेश होतो. गुणधर्मानुसार तिसरा वर्ग म्हणजे तामसिक पदार्थ ज्यामध्ये मांसल खाद्यपदार्थ तसेच मदिरेचा समावेश होतो. प्रत्येक वर्गवारी मधील खाद्यपदार्थांचे काही गुण आणि दोष आहेत, त्यामुळे कोणते खाद्यपदार्थांचे सेवन करताना तोल सांभाळणे आवश्यक आहे नाहीतर पचनशक्ती तसेच शरीरावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.

२. मसाल्यांची राणी

मिरी किंवा मिरपूड ही मसाल्यांमधली राणी म्हणून ओळखले जाते कारण आपण मिरपूडचा वापर अगदी कशाबरोबरही करू शकतो. तुम्ही मिठामध्ये टाकून एखाद्या पदार्थांमध्ये मिरपूड मिसळली त्या त्या खाद्यपदार्थांना एक वेगळीच चव येते. आपण एखादा खाद्यपदार्थ खाताना त्यात मिरपूड असेल तर कदाचित ओळखू शकणार नाही पण जर त्यात मिरपूड नसेल तर मात्र तिची कमतरता नक्की जाणवेल.

३. मिठाई आणा

‘कुछ तो मीठा हो जाये’ असे म्हणून अमिताभ आजोबांनी गोड पदार्थाचे महत्व आपल्याला पटवून दिले. एखादा गोड पदार्थ नसेल तरी जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. काही मंगल प्रसंगी, सणावाराच्या दिवशी काहीतरी गोड-धोड नक्की केले जाते. पुरणपोळी, श्रीखंड, आम्रखंड, खीर, बासुंदी हे तर मराठी माणसाच्या ताटातले हक्काचे गोड शिलेदार. संपूर्ण भारताचा विचार केला तर दक्षिण भारतात पायसम, बंगाल मध्ये रसगुल्ला, गुजरातमध्ये जिलेबी असे पदार्थ मिठाई म्हणून खाल्ले जातात. ताटात एक तरी गोड पदार्थ असल्याशिवाय जेवण सर्वार्थाने पूर्ण होत नाही.

४. चवींचे प्रकार (खाद्य पदार्थ)

भारतीय खाद्य पदार्थांबद्दल १० रंजक गोष्टी
छायाचित्र : Tiard Schulz

भारतीय खाद्य पदार्थांचा विचार केला तर चवींचे साधारणपणे गोड, खारट, कडू, आंबट, तुरट आणि तिखट असे सहा प्रकार आढळतात. तुम्ही जर महाराष्ट्रीयन थाळीचे नीट निरीक्षण केले तर तुम्हाला या सर्व प्रकारच्या चवींचे खाद्यपदार्थ आढळतील. तुम्हाला कुठल्या चवीचे खाद्यपदार्थ खायला आवडतात हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

५. विलायती चाहते

भारतीय खाद्यपदार्थ केवळ भारतातच नाही जगात बहुतांश देशात लोकप्रिय आहेत. उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेतील पहिले भारतीय भोजनालय इसवी सन 1960 च्या मध्यात उघडले होते. आता फक्त अमेरिकेचा विचार केला तर फक्त अमेरिकेमध्ये आज जवळपास 80 हजार भारतीय भोजनालये आहेत. यातही मराठी मराठी उद्योजकांचा उल्लेख करायचा झाला तर, विठ्ठल कामत, विष्णू मनोहर आणि जयंती कठाळे अशा दिग्गज नावांचा समावेश होतो. थोडक्यात, तुम्हाला अमेरिकेत भारतीयच नव्हे तर अस्सल मराठी खाद्यपदार्थ सुद्धा खायला मिळतील.

६. चिकन टिक्का मसाला खाद्य पदार्थ

भारतीय पदार्थ जसे परदेशांमध्ये लोकप्रिय झाले तसे अनेक परदेशी खाद्य पदार्थ देखील भारतात इतके लोकप्रिय झाले की ते पदार्थ मूळचे भारतीयच आहे असे अनेकांना वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर चिकन टिक्का मसाला हा पदार्थ भारतीय नाही हे अनेकांना माहिती नाही. चिकन टिक्का मसाला स्कॉटलंड देशातील ग्लासगो शहरातुन भारतासह अनेक ठिकाणी पसरला. आज मात्र चिकन टिक्का मसाला हा पदार्थ भारतीय मातीमध्ये एकदम रुळलेला आहे. ढाब्यापासून ते सेव्हन स्टार हॉटेल पर्यंत तुम्हाला कुठे ह्या पदार्थ उपलब्ध होऊ शकतो. तुम्हाला कुठल्या पद्धतीचे चिकन खायला आवडते हे कमेंट्स मध्ये कळवा.

७. साखर भारतीय खाद्य पदार्थ नाही ?

पश्चिम महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने असले तरी प्रक्रिया केलेली साखर ही मुळात भारतीय नाही हे तुम्हाला माहिती होते का? पोर्तुगीजांनी आपल्याला साखरेची ओळख करून दिली. त्यापूर्वी भारतीय लोक गुळ, गोड फळं किंवा मधाचा वापर खाद्यपदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी करत असत. आजची परिस्थिती अशी आहे कि अनेक भारतीयांच्या फक्त खाद्यपदार्थातच नव्हे तर रक्तात देखील तुम्हाला शुगर आढळून येईल.

८. मसाल्यांचा राजा

जगातील सर्वाधिक मसाला उत्पादकांचा देश म्हणजे भारत आहे. भारतात सर्वात जास्त मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते आणि जगभरात त्याची निर्यात केली जाते. इंग्रज देखील मसाल्यांच्या व्यापारासाठी भारतात आले आणि त्यांनी सत्ता काबीज केली. भारताच्या इतिहासात मसाल्यांचे स्थान हे जीवनमान तसेच राजकारण ढवळून निघेल एवढे आहे हे सिद्ध झाले आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, नुसत्या शब्दांना देखील मीठ-मसाला लावल्यामुळे इतिहासात मोठ-मोठ्या घटना घडल्याचे दाखले उपलब्ध आहेत.

९. दम बिर्याणीची गोष्ट

एकदा अवध संस्थानांमध्ये अन्नाची टंचाई जाणवायला लागली तेव्हा अवधच्या नवाबाने गरिबांसाठी मोठ्या हंड्यांमध्ये अन्न शिजवण्याचे फर्मान काढले. मोठ्या हंड्यांमध्ये अन्न शिजवताना त्यावर झाकण लावावे आणि कणकेचा वापर करून ते झाकण पूर्णपणे बंद करावे असा देखील आदेश दिला. यामुळे झाले काय तर अन्नाची नासाडी कमी झाली आणि आपण आज वापरत असलेली अन्न  शिजवण्याची एक पद्धत अस्तित्वात आली, आणि यातूनच पुढे आला दम बिर्याणी हा पदार्थ. तुम्हाला दम बिर्याणी आवडते का?

भारतीय खाद्य पदार्थांबद्दल १० रंजक गोष्टी
छायाचित्र : श्रेयक सिंग

१०. भारतीय खवय्ये

भारतात खवय्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाला एकसारखे खाणे आवडेलच असे नाही. मोठमोठाल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यादेखील भारतीय खवय्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणच द्यायचे झाले तर, संपूर्ण अमेरिकेमध्ये मॅक्डोनल्ड ही बर्गर बनवणारी कंपनी एक सारखेच पदार्थ देते. भारताच्या विविधतेचा विचार करून भारतात पदार्थांची वेगवेगळी यादी आहे. पूर्व आणि उत्तर भारतासाठी खाद्यपदार्थांची एक यादी तर दक्षिण आणि पश्चिम भारतासाठी दुसरी यादी आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतासाठी तयार केलेल्या यादीमध्ये पहिल्या यादी पेक्षामसाले जास्त पदार्थ उपलब्ध आहेत.

आपण काय पाहिले ?

खाद्यपदार्थ आणि मसाले हे भारतीय इतिहासाचे अभिन्न भाग आहेत. भारतात अनेक शतकं जपली गेलेली खाद्यसंस्कृती ही निश्चितच गौरवास्पद आहे. अनेक पदार्थ भारतीयांनी जगाला दिले तसेच खुल्या मनाने अनेक आंतरराष्ट्रीय पदार्थांना देखील सामावून घेतले. एकतेत विविधता हे तत्व खाद्य संस्कृतीला देखील लागू होते. आज आपण भारतीय खाद्यपदार्थांबद्दल उपलब्ध असलेल्या काही रंजक गोष्टी बघितल्या, तुम्हाला यापेक्षा अजून रंजक तथ्य माहिती असल्यास कमेंटमध्ये आम्हाला तसेच इतर वाचकांना अवश्य कळवा. तुमच्या सुगरण आई वडिलांना आणि खादाड मित्र-मैत्रिणींना या लेखाची लिंक अवश्य पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*