इंग्रजी भाषा शिकण्याचे ७ सर्वोत्तम मार्ग

इंग्रजी

एखादे बाळ जन्माला आल्यावर इशाऱ्यांची भाषा शिकतं, त्याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागत नाही. इशाऱ्याची भाषा शिकून झाल्यानंतर त्याच्या अवतीभवती जी भाषा बोलली जाते ती भाषा ते बाळ सहज आत्मसात करतं, याचाही वेगळा असा अभ्यास आपल्याला करावा लागत नाही. कोणती भाषा शिकणे आणि त्या आत्मसात करणे यात आमूलाग्र फरक आहे. आज आपण मराठी लिहू, बोलू, वाचू आणि समजू शकतो याचे मुख्य कारण म्हणजे मराठी भाषा आपण आत्मसात केलेली आहे. या लेखामध्ये आपण इंग्रजी भाषा शिकण्याचे सर्वोत्तम सात मार्ग पाहुयात.

भाषा आणि भाषेचा आत्मा

कोणतीही भाषा ही केवळ अक्षरं किंवा शब्दांनी तयार झालेली नियमावली नसते, त्यात एक संस्कृती, एक इतिहास, साहित्याची परंपरा आणि ती भाषा बोलणाऱ्यांची जीवनशैली त्यात सामावलेली असते त्यामुळे कोणती भाषा शिकताना ह्या गोष्टींचा विचार देखील केला जायला हवा.  उदाहरणार्थ एखाद्याला जर मराठी भाषा शिकायची असेल तर त्याला गुढीपाडवा, गणेशोत्सव, दहीहंडी असे सण त्याचबरोबर संत तुकाराम ह्यांचे साहित्य, शिवकालीन दस्तऐवज अशांचा अभ्यास करून विविध अंगांनी माहिती घेतली तर मराठी भाषा आपोआप आत्मसात करता येईल. केव्हा मराठीच नाहीतर इंग्रजी किंवा इतर भाषांना देखील ही गोष्ट लागू पडते.

इंग्रजी भाषाच का ?

कोणती गोष्ट आपल्या मातृभाषेतून समजून घेतल्यास ती जास्त लवकर समजते आणि ते फार काळ पर्यंत लक्षात राहते असे वैज्ञानिक अभ्यासाअंतर्गत सिद्ध झाले आहे. मराठी प्लसच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मातृभाषेविषयी अभिमान असणे हा एक भाग झाला पण आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ करण्यासाठी ज्या पद्धतीने ज्ञान मिळवता येते त्यापद्धतीने मिळवताना कोणती हयगय करता कामा नये. आज वस्तुस्थिती लक्षात घेतली तर इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे त्यापासून वंचित राहू नये यासाठी इंग्रजी भाषा  प्रत्येकाने समजून घेणे उपयुक्त ठरते. एका म्हणीनुसार, एक माणूस जितक्या वेगवेगळ्या भाषा समजतो किंवा बोलतो तितकी वेगवेगळे आयुष्य त्याला जगता येतात. अमेरिकेची कोणतीही अधिकृत भाषा नाही. अमेरिकेमध्ये ४ करोड पेक्षा जास्त स्पॅनिश भाषा बोलणारे लोक राहतात. तुम्ही इतर भाषा देखील नक्कीच शिकू शकता.

इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे का ?

सर्वसामान्य जीवन जगताना मातृभाषा सोडून कोणतीही भाषा शिकणे आवश्यक नाही पण आपण आधी बघितल्याप्रमाणे नवनवीन संधी आणि ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या भाषा आत्मसात करणे उपयुक्त ठरते. उदाहरण द्यायचे झाले तर, आज फक्त मराठी बोलणारा माणूस स्वतःच्या कौशल्य, ज्ञान, अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर निश्चितच उद्योगधंद्यांमध्ये प्रगती करू शकतो आणि इंग्रजी किंवा इतर भाषा बोलणाऱ्या लोकांना कामावर ठेवू शकतो. आता ह्याच माणसाला जर एखाद्या इंग्रजी चित्रपटाचा किंवा साहित्याचा १००% रसस्वाद घ्यायचा असेल तर त्याला इंग्लिश भाषा शिकणे आवश्यक आहे. मराठी भाषेमध्ये जरी त्या चित्रपटाचा किंवा साहित्याचा अनुवाद केला गेला तरी त्या चित्रपटाचा किंवा साहित्याचा आत्मा पूर्णपणे अनुवादित केला जाऊ शकत नाही. नुकतेच इंग्लंड या देशाने युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही प्रमाणात युरोपियन युनियन वर अवलंबून असल्यामुळे त्यातून बाहेर पडल्यावर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतात आणि जागतिक पातळीवर त्याचा फायदा भारतातील पदवीधरांना जास्त आहे कारण चीन देशातील पदवीधर अपेक्षा भारतातील पदवीधरांना जास्त चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता येते. कोणतीही नवीन भाषा ही संधी आणि वेगळ्या अवकाश घेऊन तयार असते, ती शिकायची का नाही हा निर्णय ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे.

इंग्रजी भाषा शिकण्याचे मार्ग

ह्या लेखामध्ये आपण इंग्रजी भाषा शिकण्याचे सर्वोत्तम ७ मार्ग कोणते आहेत त्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात. तुम्हाला जर इंग्लिश भाषा शिकायची असेल किंवा तुम्हाला येत असलेली भाषा अजून चांगल्या पद्धतीने विकसित करायची असेल तर हे मार्ग नक्कीच तुमची मदत करतील.

१. इंग्रजी भाषेतून विचार करा

भारतामध्ये इंग्रज येऊन राज्य करून गेले आहेत त्यामुळे इथल्या जनमानसावर इंग्रजीचा प्रभाव आहे. आपण वर बघितल्याप्रमाणे कोणती भाषा शिकण्यासाठी ती आत्मसात करणे आवश्यक आहे आणि आत्मसात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या भाषेतून विचार करणे. अनेकांना शाळेतून किंवा इतर मार्गाने थोड्याफार प्रमाणात इंग्रजी भाषा समजत असते पण नेहमी विचार करताना मराठी भाषेत किंवा ज्याच्या त्याच्या मातृभाषेत केला जातो. मराठी किंवा आपल्या मातृभाषेतून विचार करणे वाईट नाही पण इतर भाषा आत्मसात करताना जर त्या भाषेतून विचार केला तर नक्कीच ती भाषा लवकर आत्मसात करता येते. इंग्रजी भाषेतून विचार करताना अनेकदा शब्द किंवा वाक्य सुचणार नाहीत त्यावेळी अडलेले शब्द किंवा वाक्य तुम्ही शब्दकोशात किंवा इंटरनेटवर शोधू शकता. इंग्रजी भाषेतून विचार करणेही इंग्रजी शिकण्याची पहिली पायरी आहे. मराठी भाषेतून विचार करणे हा आपल्या डीएनएचा भाग आहे, इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठीचा अपमान नक्कीच नाही हे लक्षात घ्या. कितीही झाले तरी आई ही आईच राहणार आणि मावशी ही मावशीच राहणार.

२. इंग्रजी भाषेतून वाचन करा

दैनंदिन कामांमध्ये थोडा वेळ काढून तुम्ही जर इंग्लिश वृत्तपत्र, पुस्तके किंवा इंटरनेटवरील लेख जरी वाचलेत तरी  वेगवेगळे शब्द तुमच्या मेंदूमध्ये आपोआप जोडले जातील. तुमचे शब्दभंडार जितके चांगले आणि मोठे असेल तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकाल आणि इतरांचे विचार समजून घेऊ शकाल. इंग्रजी वाचताना जर काही शब्द तुम्हाला अडले तर तुम्ही लगेच त्या शब्दांचे अर्थ शोधून ते लिहून घेऊन पुढील वाचन सुरू करू शकता यामुळे पुढच्या वेळेला जर तो शब्दाला तर तुम्हाला त्याचा अर्थ आधीच माहिती असेल.

३. इंग्रजी भाषेतून श्रवण करा

श्रवण करणे म्हणजे ऐकणे. यूट्यूब वरील व्हिडिओज, पॉडकास्ट किंवा रेडिओ तुम्ही ऐकू शकता. मराठी भाषा जशी दर दहा मैलांवर बदलत जाते तसेच इंग्रजीचे देखील उच्चार हे जगभर वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. अमेरिका आणि इंग्लंडमधील इंग्रजीचे उच्चार काही प्रमाणात वेगवेगळे आहेत. तुम्ही जीतकी जास्त इंग्लिश भाषा ऐकून ती समजून घ्याल तितके तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे विचार जाणून घेणे सोपे पडेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला शब्द समजून घेण्यात अडचण येऊ शकेल पण तरीदेखील लक्ष देऊन जर सातत्याने तुम्ही ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे इंग्रजी सहजपणे समजू शकाल.

पानिपत मधील जानव्ही ८ वेगवेगळ्या उच्चारांमध्ये इंग्रजी बोलू शकते

४. इंग्रजी भाषेतून संवाद साधा

इंग्रजी भाषेतून विचार करून, वाचन करून, श्रवण करून तुमच्याकडे बऱ्यापैकी शब्दभांडार जमा होईल. तुम्ही आता इंग्लिश भाषेतून संवाद साधायला सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ तुमच्या शिक्षकांबरोबर, मित्रांबरोबर अथवा सहकाऱ्यांबरोबर एक एक दोन दोन वाक्य बोलून तुम्ही सुरुवात करू शकता आणि हळूहळू वेगवेगळे शब्दाने वाक्य वापरू शकता. इंग्रजी भाषेतून केवळ बोलणे म्हणजे इंग्रजी समजणे असे नाही समोरच्या व्यक्तीचे म्हणणे समजून त्यानुसार त्यावर प्रतिसाद देणे म्हणजे संवाद साधणे होय. संवाद साधण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात आधी तुमच्या मनात असलेली अनावश्यक भीती काढून टाका कारण अमेरिकेतील, इंग्लंडमधील इंग्रजी लोकांना देखील मराठी किंवा हिंदी बोलताना तेवढ्याच अडचणी जाणवतात. तुम्ही जेव्हा इंग्रजी भाषेतून बोलण्याचा सराव सुरू कराल तेव्हा तुमच्याकडून भरपूर चुका होतील, इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी त्या चुका आवश्यकच आहेत. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितक्या जास्त चुका कराल आणि त्याच चुका सुधारून तुम्ही चांगले इंग्रजी बोलू शकाल.

आजोबांचे इंग्रजी बघा

तुम्हाला भारत तसेच जगभरातील लोकांची जर इंग्लिश भाषेतून संवाद साधण्याचा सराव करायचा असेल तर बडीटॉक नावाचे एक एप्लिकेशन वापरून तुम्ही सराव करू शकता. या एप्लीकेशन मध्ये अनोळखी लोकांशी थेट संपर्क करता येतो आणि इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा विनामूल्य सराव करता येतो.

५. इंग्रजी भाषेतून लिखाण करा

कोणत्याही व्यक्तीला एक किंवा अनेक विषयांबद्दल अधिक माहिती किंवा  त्याबद्दल रस असतो. तुमच्या आवडत्या विषयांबद्दल तुम्ही इंग्लिश भाषेतून लेखन करू शकता. याची छोटीशी सुरुवात करण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप किंवा इतर मेसेज इंग्रजीतून पाठवायला सुरुवात करू शकता. हळूहळू यामध्ये वाढ करून तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्या विषयाबद्दल फेसबुक किंवा कोरा सारख्या या संकेतस्थळांवर छोटे लेख लिहू शकता. तुमच्याकडे जितके जास्त शब्द भंडार असेल तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि तितक्या स्पष्टपणे तुम्ही लेखन करू शकता. इंग्रजी भाषेतून इंटरनेटवर लिखाण करण्याचा महत्त्वाचा फायदा असा की जगभर तुमचे लेखन पोहोचू शकते.

६. इंग्रजी भाषेतून भाषांतर करा

एखाद्या उपयुक्त माहिती तुम्ही इंग्रजीमधून भाषांतर करू शकता. नेहमी तुम्हाला ते लिहून काढणे किंवा बोलण्याची आवश्यकता नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी किंवा हिंदीतील एखादी सूचना वाचली तर त्याचे भाषांतर करून तुम्ही भाषांतराचा सराव करू शकता पण इंग्लिश भाषा शिकण्याच्या प्रक्रिये दरम्यान एखादा विचार करताना तो इंग्रजीतूनच करण्याचा प्रयत्न करा कारण तसे केले तर भाषा शिकताना तुम्हाला कमी वेळ लागेल.

७. इंग्रजीशी एकरूप व्हा

आपण वर बघितल्याप्रमाणे मराठी भाषा आपल्या नसानसात भिनलेली आहे त्यामुळे मराठी समजण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. माणसाची क्षमता लक्षात घेतली तर एकच नाहीतर अनेक भाषा तो समजू शकतो आणि त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो. इतर राज्यांमधून अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलेले लोक आज मराठीशी एकरूप झालेले आहेत पण आजही ते लोक त्यांची मूळ भाषा आणि संस्कृतीशी नाळ जोडून आहेत. आज ते त्यांच्या भाषेतील एखाद्या विनोदावर जितके दिलखुलासपणे हसतात तितकेच ते मराठी विनोदांवर देखील असतात कारण मराठीतील वेगवेगळ्या अंगांशी ते एकरूप झालेले आहेत. कोणती नवीन भाषण शिकण्याचा आणि आत्मसात करण्याचा हा एक फायदा होतो त्यामुळे इंग्लिश सिनेमा, साहित्य, जीवनशैली यांच्याशी जितके एकरुप होऊ शकाल तितका इंग्लिश भाषा शिकण्याचा प्रवास सुलभ होईल.

इंटरनेटवरून कौशल्य आत्मसात करण्याचे १२ प्रभावी पर्याय

हा लेख वाचला का ?

आपण काय पाहिलं ?

इंग्रजीच नव्हे तर कोणतीही नवीन भाषा शिकणे म्हणजे आपल्या भाषेला विसरणे असा त्याचा अर्थ होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषांमध्ये इंग्रजीचा समावेश होतो, सहाजिकच माहितीची जास्तीत जास्त निर्मिती ती इंग्रजी भाषेत होते. इतर भाषांमधील चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या भाषेमध्ये आणायचे असतील तर वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ती आत्मसात केली पाहिजे. ह्याचे ७ सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंग्रजी भाषेमधून विचार करणे, बोलणे, ऐकणे, भाषांतर करणे आणि इंग्रजी जीवनशैली, संस्कृती, आणि भाषेशी एकरूप होणे. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवूनही आपण इतर भाषांशी एकरूप होऊ शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. इंग्रजी भाषा जाणणारा मराठी माणूस किंवा मराठी भाषा जाणारा इंग्रजी माणूस इंग्रजी भाषेतून मराठी मध्ये किंवा मराठी भाषेतून इंग्रजी मध्ये वेगवेगळे विचार आणि कल्पनांचे आदान-प्रदान करू शकतो ज्याचा दोन्ही भाषांना फायदा होऊ शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा याशिवाय तुमच्या मित्रपरिवार किंवा आप्तेष्टांना पैकी ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे त्यांना ह्या लेखाची लिंक देखील नक्की पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*