३३ वर्षाचे पाकीरप्पा हुनागुंडी ह्यांना खाण्याशी संबंधित असलेला (Pica नावाचा) एक आजार आहे म्हणूनच ह्यांची ‘दगड, विटा आणि चिखल खाणारा माणूस’ अशी ओळख बनली. पिका ह्या आजारात माणसाला खाण्यालायक नसलेल्या वस्तू देखील खाण्याची चटक लागते. ह्या लेखात पाकीरप्पांच्या सवयीविषयी पाहुयात आणि त्यांना ही सवय कशी लागली त्यामागची गोष्ट काय आहे हे जाणून घेऊयात.
शाळेची गोष्ट
तुम्हाला शाळेत मातीची पेन्सिल खाणारे मित्र मैत्रिणी आठवत असतील. ‘लेखणीला उदरनिर्वाहाचे साधन बनवा’ हा विचार ऐकून काही महाभाग थेट मातीच्या पेन्सिलीचे तुकडे खायचे. आम्ही तो सुविचार थोडा वेगळ्या पद्धतीने अंमलात आणला, आमच्या शाळेशेजारी एका वडापाव आणि इतर पदार्थ विकणाऱ्याचे दुकान होते आणि आमच्या वर्गाच्या खिडकीतून त्या दुकानाच्या स्वयंपाकघराची खिडकी जवळच होती, काही मुलं मातीच्या पेन्सिल्सचे तुकडे, खडूंचे तुकडे खिडकीतून त्या दुकानाच्या स्वयंपाकघरातील वडे बनवणाऱ्या कामगारांना फेकून मारत आणि त्या बदल्यात ते कामगार सुद्धा किसलेले बटाट्याचे काप मुलांना फेकून मारत. आता त्या पेन्सिल्सच्या आणि खडूंच्या तुकड्यांचा त्यांना फारसा काही उपयोग व्हायचा नाही पण त्यांनी फेकून मारलेले बटाट्याचे काप आमच्या वर्गातील मुले आनंदाने खायची. थोडक्यात, वर्गातल्या ज्या मुलांना पेन्सिल्स किंवा खडू खाण्याची सवय होती ती मुलं थेट पेन्सिल्स किंवा खडू खायची पण ज्यांना हि सवय नव्हती ती मुलं अशा पद्धतीने पेन्सिल्स किंवा खडूंच्या बदल्यात बटाट्यांचे काप मिळवून खायची.
घटनेची पार्श्वभूमी
आता सगळेच मोठे झाले त्यामुळे लहानपणीच्या सवयी सुद्धा राहिल्या नाहीत पण कर्नाटकातील एक माणूस आजही अन्न म्हणून दगड, विटा आणि चिखल खातो हे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? हे ऐकायला जरी भयंकर वाटत असले तरी माती खाऊन विश्वाचे दर्शन घडवणारा बाळकृष्ण आपल्याला माहिती आहेच. पाकीरप्पा ह्यांना खाण्यासाठी रोज किमान ३ किलो दगड, विटा आणि चिखल लागतो. दगड, माती खाण्याची हि सवय पाकीरप्पांना १० व्या वर्षांपासून लागली आणि तेव्हापासून ते दररोज अव्याहतपणे ह्या गोष्टी खात आहेत आणि ते खाऊनही शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचा दावा ते करतात. अशा आजारामध्ये रुग्णाला विचित्र गोष्टी खाण्याची भूक लागते पण त्यातून कोणत्याही प्रकारची पौष्टिक तत्व खाणार्याच्या शरीराला मिळत नाहीत. जवळपास २३ वर्षांनंतरही पाकीरप्पा निरोगी आहेत पण तरीही आजूबाजूचे सतत त्यांना हि सवय सोडण्याविषयी सांगत असतात.
पाकीरप्पांची गोष्ट
सगळ्यांना आश्यर्यचकित करणाऱ्या पाकीरप्पांवर अनेक बातम्या झाल्या, आता हीच बातमी बघा.
पाकीरप्पांचे म्हणणे
“मी साधारण २० वर्षांपासून दगड विटा खातो आहे कारण मला ते खायला आवडतं. आता हे माझ्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. मला ह्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत, एवढंच काय तर माझे दातही अजून शाबूत आहेत. मी कितीही कठीण दगड सहजपणे चावू शकतो. माझी आई मला नेहेमी हे न खाण्याविषयी सांगत असते, तिचा आग्रहच असतो पण तिने जरी मला चिकन फ्राय बनवून दिलं तरी मी ते खात नाही. मला तर ते अजिबात आवडत नाही, मला खाण्यासाठी विटा, चिखल पुरे आहे. मी स्वतः माझ्या ह्या सवयीचे काही करू शकत नाही. दगड, विटा, चिखल हे सोडून मला काहीच आवडत नाही. तुम्ही मला अमृत आणून दिलं तरी मी ते घेणार नाही.”
घरी प्रयत्न करू नका
आता पाकीरप्पांना हा आजार असल्यामुळे ते ह्या गोष्टी खातात, तुम्ही मात्र घरी असा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचे शरीर, पिंड, प्रकृती एकसारखी नसते कदाचित आज नसले तरी भविष्यात ह्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरचे पौष्टिक अन्न खाऊन सुदृढ व्हा आणि निरोगी राहा.