आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे कि पंथनिरपेक्ष ?

आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे कि पंथनिरपेक्ष ?

गेल्या अनेक वर्षांपासून आपण (Secular) सेक्युलर हा शब्द इंग्रजी ऐकत आलो आहोत पण अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर ह्या शब्दाचे हिंदी किंवा मराठी भाषांतर केले गेले तेव्हा धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला गेले. भारताच्या संविधानाच्या हिंदी आवृत्तीमध्ये मात्र धर्मनिपेक्षता हा शब्द नसून पंथनिरपेक्षता हा शब्द वापरला आहे. जेव्हा आपण धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला Secular असे जरी म्हणायचे असले तरी अचूक शब्द न वापरल्यामुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. गुगल वर देखील Secular ह्या शब्दाचे मराठी भाषांतर धर्मनिरपेक्ष असे दिसते. ह्या लेखात आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे कि पंथनिरपेक्ष ह्याचा आढावा घेऊ.

धर्मनिरपेक्षता आणि सेक्युलरीजम शब्दांचा अर्थ एकच आहे का?

हा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे का पंथनिरपेक्ष आहे हे बघणे. हिंदी प्रस्तावनेत तुम्हाला धर्मनिरपेक्ष शब्द सापडणार नाही मात्र मराठी आवृत्तीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला आहे. संविधानाच्या इंग्रजी आवृत्तीत तुम्हाला Secularism हा शब्द सापडेल. ह्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अजून खोलात शिरावे लागेल.

Secular (सेक्युलर) हा शब्द युरोपातून भारतात आला. काही काळापूर्वी राज्याला एक दैवी संस्था मानली जात असे आणि ख्रिश्चन मान्यतेनुसार चर्च हे पृथ्वीवर दैवी सत्तेचे केंद्र आहे त्यामुळे राज्याची निगडित जे काही निर्णय होत त्यात चर्चचा हस्तक्षेप होत असे. नंतर युरोपात ल्युथर, केल्विन ह्या मंडळींनी धर्म सुधार आंदोलन केले आणि नवा विचार मांडला.

धर्म आणि शासनव्यवस्था ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत

आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे कि पंथनिरपेक्ष ?

धर्म सुधार आंदोलनात आंदोलनकर्त्यांचे असे म्हणणे होते कि धर्म आपल्याला वेगळ्या कारणांसाठी मार्गदर्शक आहे. इतर बाबतीत प्रगती करण्यासाठी धर्म आपल्या उपयोगी पडेल पण राज्याशी संबंधित जे विषय असतील त्यांना धर्मापासून वेगळे केले जाणे आवश्यक आहे. जर राज्य हि स्वयंभू व्यवस्था आहे असे आपण मानतो तर ह्या संस्थेला चर्च किंवा इतर संस्थेकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही. युरोपातील विद्वानांनी हा फरक लक्षात आणून दिला तेव्हापासून राज्य (शासनव्यवस्था) सेक्युलर आहे आणि हि व्यवस्था ईश्वरशासित नाही असे मानले जाऊ लागले.

भारताचे संविधान आणि त्यातील उल्लेख

स्वतंत्र भारताचे संविधान तयार करताना तत्कालीन विद्वानांनी इंग्रजी आवृत्ती मध्ये Secular शब्द स्वीकारला. हिंदी भाषेतील संविधानाची आवृत्ती तयार करताना मात्र Secular ह्या शब्दावरून खूप चर्चा आणि वादविवाद झाले. Secular शब्दाचे भाषांतर करताना हिंदी भाषेमधील समानार्थी शब्द धर्मनिरपक्ष हा नसून पंथनिरपेक्ष आहे ह्या मतावर येऊन पोहोचले म्हणूनच संविधानात Secular शब्दाचे भाषांतर धर्मनिरपक्ष असे नाही तर पंथनिरपेक्ष असे दिसते मात्र मराठी आवृत्तीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला आहे.

धर्म आणि पंथ ह्यातला फरक काय?

भारतात धर्म म्हणजे एक जीवनपद्धत मानली गेली आहे, पूजा पद्धत नाही. रिलिजन (religion) ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ पूजा पद्धत असा होतो. धर्म हा मुळातच भारतीय शब्द आहे ह्याला इंग्रजीमध्ये प्रतिशब्द नाही. भारतीय मान्यतेनुसार धर्म म्हणजे जीवन जगण्याची एक पद्धत आहे.

पंथ म्हणजे पूजा करण्याची पद्धत. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ (पूजा करण्याच्या पद्धती) आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने पूजा करण्याचा अधिकार आहे.

पंथ किंवा पूजा पद्धत कशी ओळखायची?

पंथ किंवा पूजा पद्धतीमध्ये खालील महत्वाच्या बाबी असतात.

  • एक सर्वोच्च ईश्वर असतो. (उदाहरणार्थ – मोहोम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त)
  • एक सर्वोच्च पुस्तक असते. (उदाहरणार्थ – कुराण, बायबल)
  • एक पूजा / प्रार्थना पद्धत असते. (उदाहरणार्थ – नमाज, प्रेयर)
  • एक सर्वोच्च स्थान असते. (उदाहरणार्थ – मक्का, रोम)

हिंदू पंथ किंवा पूजा पद्धत नाही कारण

  • एक सर्वोच्च ईश्वर नाही (गणपती, हनुमान, विठ्ठल, कालीमाता इत्यादी असंख्य देवता आहेत)
  • एक सर्वोच्च पुस्तक नाही (भगवतगीता, महाभारत, हरिपाठ इत्यादी असंख्य पुस्तके आहेत)
  • एक पूजा / प्रार्थना पद्धत नाही (नमस्कार, अभिषेक, आरती इत्यादी असंख्य पद्धती आहेत)
  • एक सर्वोच्च स्थान नाही (अयोध्या, काशी, मथुरा, पंढरपूर इत्यादी असंख्य स्थळं आहेत)

सेक्युलरीजमचा भारतातील अर्थ

ज्याप्रमाणे युरोपात राज्य चालवण्यात चर्चचा हस्तक्षेप थांबवला गेला त्याचप्रमाणे भारतात देखील कोणत्याही पंथाने राज्य व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये असा अर्थ होतो. भारतात प्रत्येकाला हवा तो पंथ अंगिकारण्याचे स्वातंत्र्य आहे. संविधान कोणत्याही पंथाला सर्वोच्च मानत नाही त्यामुळे कोणत्याही एका पंथाला मानत नसले तरी नागरिकांना हव्या त्या पंथाचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य संविधान देते.

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

धर्म शब्दाचा अर्थ म्हणजे अशी बाब जी धारण करता येऊ शकते. आधी बघितल्याप्रमाणे धर्म हा शब्द भारतीय आहे आणि ह्याला इंग्रजी भाषेत प्रतिशब्द नाही. उदाहरण बघायचे झाले तर थंड तापमान असणे हा बर्फाचा मूळ धर्म आहे, तिखट चव असणे म्हणजे मिरचीचा मूळ धर्म आहे, आपल्या मुलाप्रती किंवा मुलीप्रती वात्सल्य असणे हा आईचा धर्म आहे. माणुसकी बाळगणे, खरे बोलणे, इतरांप्रती सहानुभूती बाळगणे, प्राण्यांप्रती भूतदया बाळगणे हा माणसाचा धर्म आहे.

धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे बर्फाने थंड हि असता कामा नये, गरम देखील असता कामा नये आणि मध्यम तापमानात सुद्धा असता कामा नये. मिरचीने तिखट असता कामा नये, गोड असता कामा नये किंवा खारट, आंबट, कडू सुद्धा असता काम नये.

वर बघितल्याप्रमाणे माणुसकी बाळगणे, खरे बोलणे, इतरांप्रती सहानुभूती बाळगणे, प्राण्यांप्रती भूतदया बाळगणे हा माणसाचा धर्म आहे आणि धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे माणसाने ह्या गोष्टींपासून वेगळे रहाणे. धर्म हि जीवन जगण्याची एक पद्धत आहे त्याचा आणि पूजा करण्याचा किंवा देव मानण्याचा काहीही संबंध नाही. स्वतंत्र भारतातील माणसाने हवा तो पंथ पाळावा किंवा पाळू नये पण मनुष्यधर्म अवश्य पाळावा हेच संविधान कर्त्यांना अपेक्षित होते.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*