मिनिमलिझम : कमी म्हणजेच जास्त मानणारी जीवन शैली

तुमच्याकडे नवीन फोन, नवीन गाडी आणि तुमच्या मित्र मंडळीकडे असलेल्या इतर वस्तू आहेत का नाही? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे आपण आजकाल आपला आनंद वस्तूंमध्ये शोधत आहोत. एखाद्याकडे महागडा किंवा नुकताच बाजारात आलेला फोन नसेल तर ती व्यक्ती अश्मयुगातील वाटू लागते. आधुनिक बाजाराने देखील हे ओळखले आहे, आणि याच मानसिकतेचा फायदा घेऊन आपल्यावर दिवस-रात्र वस्तूंच्या जाहिरातींचा वर्षाव केला जात आहे. एक छोटा प्रयोग करून पाहू, तुमच्या फोन वर आलेले पहिले दहा मेसेजेस किंवा तुमच्या जीमेल मध्ये आलेले पहिले दहा ई-मेल काढून वाचा. तुमचे तुम्हाला लक्षात येईल ही वस्तू खरेदी करण्यासाठी मानसिकता तयार केली जात आहे. ह्या सगळ्या पाशातून एक अर्थपूर्ण जीवन जगता यावे ह्यासाठी मिनिमलिझम कडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

वस्तू विकत घेणे वाईट आहे का ?

कोणती वस्तू विकत घेणे अथवा वस्तूचा उपभोग घेणे अजिबातच वाईट नाही. माणसाचा वेळ वाचवणारी किंवा माणसाला आनंद देणारी किंवा इतर पद्धतीने उपयुक्त ठरणारी वस्तू विकत अवश्य अथवा त्या वस्तूंचा उपभोग अवश्य घ्यावा. मुख्य आक्षेप हा गरज नसताना, कोणती उपयुक्तता नसताना, कोणताही आनंद देत नसताना वस्तू गोळा करून ठेवणे ह्याला घेतला जातो. आपण भरपूर वस्तू गोळा करून अनावश्यकपणे वेळ, पैसा आणि जागा वाया घालवत असतो यातून मानसिक समाधान अजिबात मिळत नाही. एखादी वस्तू असेल तर दुसरी वस्तू नाही याचे दुःख जास्त असते. आपल्या आयुष्यात ठराविक वस्तू नाहीत त्यामुळे आपले आयुष्य सुखी होऊ शकणार नाही अशा गैरसमजाला छेद देत पुढे आलेली कल्पना म्हणजेच ‘मिनिमलिसम’

मिनिमलिझम पाश्चात्य देशांत लोकप्रिय होत आहे.

मिनिमलिझम (जीवन शैली) म्हणजे नेमकं काय ?

मिनिमलिझम म्हणजे अनेक गोष्टींचा संचय करण्याच्या मागे वेळ न घालवता आवश्यक वस्तूंद्वारे जीवन व्यतीत करणे होय. कमी गोष्टी वापरायची सवय असल्यामुळे अनावश्यकपणे अजून गोष्टी खरेदी करण्याची इच्छा राहत नाही, ज्यामुळे अधिक पैसेसुद्धा वाया जात नाहीत. आर्थिक बचत झाल्यामुळे मानसिक दडपण येत नाही आणि मग आपल्याला हवे असलेले आयुष्य आपल्या पद्धतीने जगता येण्याचे स्वातंत्र्य वाढते. उदाहरणच द्यायचे झाले तर मिनिमलिझम पाळणारा व्यक्ती त्याच्याकडे जो फोन आहे, किंवा त्याला ज्या फोनची गरज आहे त्या फोनचाच वापर करतो. त्याला बाजारात आलेले फोनचे नवीन मॉडेल घ्यायची इच्छा होत नाही, त्यामुळे त्याची आर्थिक बचत होतेच याशिवाय अजून पैसे कमावण्याचे दडपण नसल्यामुळे वेळेची बचत देखील होते. अशा पद्धतीचे जीवन तुम्हाला आवडेल का ?

मिनिमलिझम - जीवन शैली
छायाचित्र – Maksim

मिनिमलिझम हा जरी पाश्‍चात्त्य शब्द असला तरीही सन्यास घेऊन सुखी जीवन जगणाऱ्या ऋषीमुनींची भारताला ओळख आहेच. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे सूत्र पाळणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, रतन टाटा अनेक दिग्गज आपण पाहिले आणि अजूनही पाहतो. अनावश्यक गोष्टींचा त्याग करून आपली सर्व ऊर्जा आणि वेळ सत्कारणी लावणे म्हणजेच मिनिमलिझम होय. साधारण जीवन आणि असाधारण कर्तृत्व हे अनेकांनी कृतीतून दाखवले आहे.

मिनिमलिझम - जीवन शैली
छायाचित्र – Fares Nimri

मिनिमलिझम (जीवन शैली) मध्ये महत्वाची गोष्ट कोणती ?

माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती हा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे येतील पण एक सर्वसमावेशक असे उत्तर द्यायचे झाल्यास ‘वेळ’ हीच जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे सर्वजण कबूल करतील. पृथ्वीतलावर दररोज प्रत्येकाला 23 तास 56 मिनिटे मिळतात, त्यातला बहुतांश वेळ हा सत्कारणी लागावा ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दररोज सारखेच कपडे घालतो याचे कारण म्हणजे ‘आज कुठले कपडे घालू?’ हा प्रश्न रोज पडू नये आणि वेळ वाचावा हा त्यामागचा उद्देश असतो. तुमच्या सभोवताली तुमच्या मालकीच्या ५०० वस्तू असतील तर त्या सांभाळण्यासाठी तुमचा दररोज किती वेळ जातो याचा तुम्ही विचार केला आहे का? मिनिमलिझम ही संकल्पना याच वस्तूंची संख्या कमी करून उपलब्ध वेळ वाढवण्यासाठी पाळली जाते. आपले जीवन कसे असावे हे आपण ठरवायचे.

वस्तूंनी वेढलेली जीवन शैली

अमेरिकेतील लोकांना ऊठसूट कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्याची सवय असते. मध्यंतरी केलेल्या एका अभ्यासानुसार असे लक्षात आले की, अमेरिकेतील एका घरात सर्वसाधारणपणे ३ लाख वस्तू असतात. आता अभ्यासाचा हा आकडा लक्षात घेतला आणि समीकरण मांडले तर असे लक्षात येते, एखाद्याच्या घरात जर तीन लाख वस्तू असतील आणि त्यातल्या एक टक्का वस्तू जरी त्या घरातील प्रत्येक सदस्य रोज वापरत असला तरी वस्तूंची ही संख्या ३,००० होते. एका दिवसात १,४३६ मिनिटं असतात म्हणजे वस्तूंच्या वापराचा अंदाज बांधला तर एका मिनिटात २ वस्तू वापरल्या जातात. आता ह्यातून झोपेचे आठ तास वगळले तर दर मिनिटाला तीन वस्तू म्हणजेच दर 20 सेकंदाला एक वस्तू वापरली जाते. आता यातून बाहेरच्या कामाचा आणि इतर वेळ वगळला तर एका मिनिटात वापरणाऱ्या वस्तूंची संख्या अजूनच वाढते. आनंदापेक्षा वस्तूंनी भरलेले जीवन कोणाला आवडेल ?

मिनिमलिझम - जीवन शैली
छायाचित्र – Wonderlane

हा झाला अमेरिकेतील व्यक्तीच्या दृष्टीने केलेला विचार. तुम्ही तुमच्या घरात असाल तर फक्त आजूबाजूला एक नजर फिरवा. गेले कित्येक महिने किंवा वर्ष वापरात नसलेल्या कितीतरी वस्तू तुम्हाला दिसतील. केवळ फेकायला नको असा भावनिक बंध असल्यामुळे आपण कितीतरी वस्तू आवश्यक नसतानादेखील गोळा करून ठेवतो. उदाहरणच द्यायचे झाले तर, एक तरी बंद पडलेला फोन तुमच्या घरात पडलेला असेल. एखादी मोडलेली वस्तू दुरुस्त करू असे तुम्ही वर्षभरापूर्वी ठरवलेले असूनही ती अजूनही धूळ खात तशीच पडलेली असेल. अनावश्यक वस्तू संचय केल्यामुळे जागा तर अडतेच पण वेळ आणि पैसे देखील वाया जातात.

मिनिमलिझम (जीवन शैली) म्हणते कमी म्हणजेच जास्त, असे कसे ?

मिनिमलिझम ही जीवनशैली पाळणारे नेहमी ‘Less is more‘ (कमी म्हणजेच जास्त) असे म्हणतात पण हे कसं शक्य आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तो योग्यच आहे. आपण वरील उदाहरणामध्ये भावनिक कारणांमुळे किती अनावश्यक गोष्टी गोळा करून ठेवतो हे बघितले, आता कल्पना करा तुम्ही काय अशा एका खोलीत बसलेले आहात जिथे तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करता येत आहे. पुन्हा एक उदाहरण घ्यायचे झाले तर, तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण खोलीमध्ये चित्रकलेविषयी सामान ठेऊ शकता ज्याची तुम्हाला सर्वाधिक आवश्यकता भासते. अनावश्यक सामान गोळा केले नसल्यामुळे तुम्हाला चित्रकलेविषयी हवे असलेले सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळेल तसेच तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते त्यासाठी तुम्हाला तेच सामान उपयोगी पडेल आणि दिवसातील सर्वाधिक वेळ तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही देऊ शकता. अनावश्यक सामान काढून टाकून त्या जागी जर चित्रकलेचे सामान ठेवले तर अशावेळी खोलीतले एकूण सामान जरी कमी झाले असले तरी त्यातून मिळणारा आनंद हा वाढलेला असतो म्हणूनच  ‘Less is more’ (कमी म्हणजेच जास्त) ही संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

मिनिमलिझम (जीवन शैली) स्वीकारताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे,

आपण केवळ इतरांचे अनुकरण न करता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित केले तर आपले आयुष्य अधिक सुखकर होते. आपल्या जीवन शैली विषयी काही लक्षात घेण्यासारखे मुद्दे खालील प्रमाणे

१. पैसे आणि आनंद ह्यांचा संबंध नाही

तुम्ही किती आनंदी आहात याचा संबंध तुमच्याकडे किती पैसे आहे त्याच्याशी लावता कामा नये. कळतं तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील तर त्याच्या तुलनेत चिंता देखील अधिक असतात. १० रुपये खिशात घेऊन फिरणारा माणूस जितक्या सहजपणे हिंडू फिरू शकतो तितक्याच सहजपणे १० हजार रुपये बाळगणारा माणूस फिरू शकत नाही हे सत्य आहे.

२. जाहिराती पाहून सुख विकत घेता येत नाही

दिवस-रात्र आपल्यावर जाहिरातींचा मारा होत असतो आणि बहुतांश जाहिराती या तुम्ही सुखी आणि आनंदी व्हाल अशा आशयाच्या असतात. कोणती जाहिरात पाहून सुख विकत घेता येत नाही, सुख हे मानण्यावर असते.

३. कमी म्हणजेच जास्त

आपण आधी वाचल्याप्रमाणे, आयुष्यात जितक्या कमी वस्तू असतील तितक्यात जास्त एकाग्रपणे आपण काम करू शकतो म्हणजेच कमीत कमी वस्तूंमधून जास्तीत जास्त आनंद, वेळ आणि समाधान मिळवता येते.

त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ।।

मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें ते ।।

अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ।।

तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ।।

— संत तुकाराम

मिनिमलिझमचे फायदे काय आहेत ?

प्रत्येक विचारसरणीचे, जीवनशैलीचे आणि तत्वज्ञानाचे आपापले फायदे आणि तोटे असतात. आपण आधी मिनिमलिझमचे फायदे पाहुयात

१. आर्थिक बचत

मिनिमलिझममुळे सगळ्यात जास्त आर्थिक बचत होते आणि हा याचा अनेक महत्त्वाच्या फायद्यांपैकी एक महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही जर कमी वस्तू वापरत असाल तर आपसूकच तुम्ही कमी वस्तू खरेदी कराल. तुम्ही जर कमी वस्तू खरेदी केल्या तर वस्तूंच्या खरेदीसाठी तसेच देखभालीसाठी लागणारी रक्कम देखील कमी खर्च होईल आणि तुमच्या बचतीत वाढ होईल.

२. अधिक स्वातंत्र्य (जीवन शैली)

कमी वस्तू असल्यामुळे तुम्हाला त्या वस्तूंची देखभाल करावी लागणार नाहीच पण वेळेप्रसंगी जर एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे असेल किंवा मोहमाया सोडून संन्यास घ्यायचा असेल तर तात्काळ तुम्ही शिदोरी घेऊन निघू शकता. तुम्ही तुमच्या सगळ्या वस्तू एकाच बोचक्यात कोंबून इकडे तिकडे हलवू शकता म्हणजे तुम्हाला अधिक स्वातंत्र्य असेल. तुम्हाला एक स्वतंत्र जीवन जगता येईल.

३. सर्जनशीलता

तुमच्याकडे कमी वस्तू असतील तर सहाजिकच तुम्ही तुम्हाला सर्वाधिक आनंद देणाऱ्या आणि सर्वाधिक उपयुक्त वस्तू तुमच्याजवळ बाळगाल. आपण आधी बघितलेल्या चित्रकलेच्या उदाहरणाकडे परत येऊ. तुम्हाला जर चित्रकला आवडत असेल तर तुमच्याकडे सर्वात जास्त वस्तू या चित्रकलेशी संबंधित असतील आणि तुम्हाला दिवसेंदिवस अधिकाधिक चित्र काढण्यासाठी वेळ मिळेल तसेच तुमचे लक्ष वळवण्यासाठी इतर वस्तू नसल्यामुळे तुम्ही रोज नवनवीन चित्र काढायला आणि त्यातून तुमचे चित्र काढण्याचे कौशल्य वाढत जाईल, तुम्ही अधिकाधिक सर्जनशील म्हणजेच Creative व्हाल. हीच गोष्ट इतर बाबींमध्ये देखील लागू होते.

https://www.theminimalists.com

मिनिमलिझमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हि वेबसाईट पहा.

४. भूतकाळाचे जीवन दडपण देत नाही

माणूस हा भावनाप्रधान असतो आणि त्याला गतवैभवात रममाण होण्याची हौस असते. मिनिमलिझममुळे जुन्या वस्तूंची असलेले बरेवाईट संबंध तुटतात आणि नवीन आठवणी आणि अनुभव मिळण्यासाठी तुम्ही सज्ज होता. अनेक वस्तूंची भावनिक बंद असल्यामुळे त्या वस्तू दूर करणे थोडे अवघड असते पण पुढच्या स्टेशन वर जाण्यासाठी गाडीला मागचे स्टेशन सोडावेच लागते.

५. कमी ताण तणाव

निकोप स्पर्धा ही प्रगतीसाठी आवश्यक आहेच पण कोणत्या स्पर्धेत धावायचे हे तुम्ही ठरवायला हवे. तुम्हाला जर चित्रकला आवडत असेल तर जगातील सर्वोत्कृष्ट चित्रकार होण्यासाठी दिवसेंदिवस स्वतःमध्ये प्रगती करणे आणि इतर चित्रकारांची निकोप स्पर्धा करणे म्हणजे प्रगती होय. तुम्हाला चित्रकला आवडत असून केवळ शेजाऱ्याने घेतलेल्या चार चाकी गाडी पेक्षा चांगली आणि महागडी चार चाकी गाडी घ्यायची आहे म्हणून आवडत नसलेल्या कामाची नोकरी करणे आणि चित्रकलेला वेळ न देणे म्हणजे ताण-तणावाला देणे. मिनिमलिझम पाळताना तुमच्याकडे मुळातच कमी वस्तू असल्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी अथवा दुरुस्तीसाठी येणारा ताण तणाव आणि खर्च कमी होतो. तुम्ही अनावश्यक बाजारू स्पर्धेचे घटक नसल्यामुळे तुम्हाला दोन चाकी गाडी पुरेशी असताना तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याने मोठी चार चाकी गाडी घेतली तरी ईर्षा वाटत नाही.

मिनिमलिझम पाळणार्यांचे घर साधारण असे दिसते

हा व्हिडियो पाहून तुम्हाला मिनिमलिझमचा अंदाज येईल

मिनिमलिझमचे तोटे काय आहेत ?

आपण आधी बघितला प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात त्यामुळे कोणतीही गोष्ट अमलात आणण्याच्या आधी फायदे आणि तोटे या दोघांचा सारासार विचार करून मगच निर्णय घेणे योग्य आहे. मिनिमलिझमचे तोटे काय आहेत हे पाहुयात.

१. मिनिमलिझम स्वीकारणे अवघड आहे

मिनिमलिझम म्हणजे जीवनशैलीमध्ये मोठा आमूलाग्र बदल करणे होय. तुम्ही वर्षानुवर्ष गोळा केलेल्या वस्तूंचा त्याग करून ठेवत उपयुक्त वस्तू ठेवताना जुन्या वस्तूंपासून दूर जाणे हे हे निश्चितच कठीण आहे. जीवनशैलीमध्ये अचानक इतका मोठा बदल करणे हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. बर आणि प्रत्येकाला हा बदल ज्याच्या त्याच्या जीवनशैलीमध्ये रुजवताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

२. एकदाच जास्त वेळ जातो

मिनिमलिझम पाळताना जरी वेळेची मोठी बचत होत असली तरी जेव्हा जीवनशैलीमध्ये आपण मिनिमलिझम पाळण्याची सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला खूप मोठा वेळ द्यावा लागतो करण बरेचदा आपल्याला मिनिमलिझम म्हणजे काय हे माहिती नसते त्यामुळे एखादी गोष्ट किती उपयोगाची आहे किंवा किती टाकाऊ आहे हे तपासण्यामध्येच खूप मोठा वेळ जातो आणि आपण वर बघितल्याप्रमाणे अमेरिकेतील एका घरात तीन लाख वस्तू असतात, भावनाप्रधान भारतामध्ये एका घरात किती वस्तू आढळतील याचा अंदाजच न लावलेला बरा.

३. मोह वाढण्याची शक्यता असते

एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर त्याची आपल्याला किंमत नसते पण ती वस्तू जर नसेल तर त्याबद्दल मोह नक्कीच जाणवतो. मिनिमलिझम पाळताना जो मुख्य संकेत आहे तो असा की या वस्तूंमधून सर्वाधिक उपयुक्तता आणि आनंद घेता येतो तीच वस्तू बाळगणे. अशावेळी, केवळ पैसे आहेत म्हणून खरेदीला जाण्याचा मोह अनेकांना वाटू शकतो. मिनिमलिझम जीवनशैली जोपर्यंत विचारसरणी म्हणून अमलात येत नाही तोपर्यंत मोहा मध्ये वाढ होऊ शकते कारण आपल्या आसपासच्या वस्तूंची संख्या कमी कमी करत जात असतो.

४. मिनिमलिझम पाळणारे विचित्र म्हणून ओळखले जातात

आपण जाहिरातींच्या काळात राहतो जिथे एखादी नवीन आणि सगळेजण वापरत आहेत अशी वस्तू नसेल तर समाजात विचित्र म्हणून गणना होते. आता हेच बघा, जर एखादा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा मी स्मार्ट फोन वापरत नाही असे म्हणाला तर तुम्हाला ते किती विचित्र वाटेल ? मिनिमलिझम पाळताना सुद्धा, बऱ्याचदा तुम्ही अनावश्यक गोष्टी बाळगत नाहीत त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या तुम्हाला विचित्र समजतात. मिनिमलिझम जीवनशैली पाळणारे आज अल्पसंख्यांक आहेत.

इंटरनेटवरून कौशल्य आत्मसात करण्याचे १२ प्रभावी पर्याय

हा लेख वाचला नसेल तर अवश्य वाचा

मिनिमलिझम बद्दल आपण काय पाहिलं ?

मिनिमलिझम हा शब्द जरी पाश्‍चात्त्य असला तरी त्याग ही संकल्पना भारतीयांना नवीन नाही पण कलियुगात आपण त्यागाची भावना मनात तरी आणतो का ? एखादी गोष्ट फुकट किंवा स्वस्त मिळत असेल तर गरजेपेक्षा जास्त घेऊन समाधान मानतो पण त्या वस्तूची उपयुक्तता आपल्याला आहे का किंवा आपण त्या वस्तूसाठी किती वेळ अथवा पैसे खर्च करत आहोत याचे गणित मांडणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अनावश्यक वस्तूंचा त्याग करून ज्या वस्तू खर्च आपल्याला आनंद, समाधान आणि नवीन काहीतरी करण्यासाठी ऊर्जा देतात अशा वस्तू बाळगणे म्हणजेच मिनिमलिझम होय. याचे फायदे म्हणजे अधिक स्वातंत्र्य, सर्जनशीलता, गतकाळातील बंधनांपासून मुक्ती, आर्थिक बचत आणि कमी ताण तणाव हे आहेत तर तोट्यांचा विचार केला तर हा बदल अमलात आणणे तसे कठीण आहे, अमलात आणण्याचे ठरवले तरी सुरुवातीला जास्त वेळ द्यावा लागतो, याशिवाय अनेक गोष्टी नसल्यामुळे त्या गोष्टींबद्दल मोह वाढू शकतो आणि समाजामध्ये तुम्हाला विचित्र म्हणून ओळखले जाऊ शकते.

मिनिमलिझम आणि मी

मिनिमलिझम पाळताना आलेले अनुभव सांगणारा शर्मिला फडके ह्यांचा हा मराठी ब्लॉग अवश्य वाचा

भारतासारख्या देशात जिथे भावनेला अधिक महत्त्व दिले जाते तिथे मिनिमलिझम अमलात आणणे शक्य आहे का? आणि मिनिमलिझम बद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये अवश्य कळवा तसेच तुमच्या मित्र परिचितांना या लेखाची लिंक पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*