सिंगापूर मध्ये ग्राफिटी काढणार्यांना वेताच्या छडीने फटक्यांची शिक्षा

ग्राफिटी

कोणत्याही प्रकारची कला हि एक संदेश देण्याचे माध्यम असते, संदेश योग्य आहे किंवा अयोग्य हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो पण एक कलाकार नेहमी आपली कला सर्वोच्च दर्जाच्या एकाग्रतेने सादर करत असतो. जगाचा इतिहास लक्षात घेतला तर अनेकदा कलाकार आपल्याला सत्तेच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आलेले आहेत. निरंकुश सत्तेला विरोध म्हणून कलाकार आपले बंड कलेच्या माध्यमातून सादर करत असतात आणि आपला विरोध आपल्या कलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. ग्राफिटी किंवा कुठलीही कला सादर करणे म्हणजे कलाकाराने रसिकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम असते. सिंगापूरमध्ये ग्राफिटी काढणाऱ्याला आठ वेताच्या छडीच्या फटक्यांची शिक्षा ठोठावली जाते.

भारत आणि कलाकार

कलाकारांनी आपली कला सादर करणे आणि त्यात सत्तेच्या विरोधात काही संदेश देणे हे सत्ताधिशांना आवडत नाही. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, कलाकार हा समाजाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करत असतो त्यामुळे सत्तेला आव्हान निर्माण होत असते त्यामुळे सहसा कलाकारांना राजाश्रय मिळत नाही. पूर्वीच्या काळी  शाहू महाराजांनी अनेक कलाकारांना मदतीसह प्रोत्साहन दिल्याचे दाखले आहेत. इंग्रजांच्या काळात देखील अनेक कलाकारांनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी आपल्या कलेचा वापर केला. स्वातंत्र्योत्तर काळानंतर मात्र अनेक कलाकारांना कलेच्या माध्यमातून जरी प्रोत्साहन मिळाले नाही तरी निवडणुकीसाठी तिकीट जरूर मिळाले हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. भारतातील कलाकार आणि वाद लक्षात घेतले तर, पु.ल देशपांडे यांनी काही बाबतीत आपली असहमती दाखवली होती, पंढरपुरात जन्म झालेले एम.एफ.हुसेन हे जागतिक दर्जाचे चित्रकार देखील जनक्षोभाचा सामना करावा लागल्यामुळे भारत देश सोडून कतार या देशात स्थायिक झाले होते. आजचे चित्र लक्षात घेतले तर सरकारच्या बाजूने तसेच सरकारच्या विरोधात देखील मतप्रदर्शन करणारे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांना स्वतःचे मत व्यक्त करता येणे हे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.

ग्राफिटी म्हणजे काय?

ग्राफिटी म्हणजे भिंतीवर काढलेल्या चित्रांचा किंवा लिहिलेलं वाक्यांचा असं नमुना ज्याद्वारे काहीतरी संदेश दिला जातो. सहसा, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मालमत्तेवर ही ग्राफिटी काढली जाते (उदाहरणार्थ, चौकातल्या मुख्य भिंतीवर किंवा सार्वजनिक शौचालयांमध्ये काढलेली चित्र किंवा लिहिलेली वाक्य). सार्वजनिक मालमत्तेवर प्रशासनाच्या परवानगीशिवाय अशा पद्धतीने ग्राफिटी काढणे म्हणजे काही देशांमध्ये गुन्हा आहे असे मानले जाते. पुणेरी पाटी ही सहसा स्वतःच्या घरात किंवा दुकानात म्हणजेच स्वतःच्या मालमत्तेमध्ये लावली जाते त्यामुळे पुणेरी पाटीला ग्राफिटी म्हणता येणार नाही पण एखाद्या ठिकाणी किंवा रस्त्यावर एखादी कार खूप काळ धूळ खात पडली असेल आणि तुम्ही जर धुळीने माखलेल्या कारच्या काचेवर बोटाने एखादे चित्र काढून ‘ओ गाडीवाले, आता तरी गाडी धुवा‘ असे लिहिले तर नक्कीच त्याला ग्राफिटी असे म्हणता येईल. समजा दिल्ली मध्ये एखादे आंदोलन किंवा सभा असल्यास आसपासच्या अनेक शहरांमध्ये भिंतींवर ‘चलो दिल्ली’ असे लिहिले जाते याला देखील ग्राफिटी म्हणता येईल कारण परवानगी शिवाय सार्वजनिक मालमत्तेचा वापर करून संदेश दिला जात असतो.

गल्ली बॉय चित्रपटातील ‘आजादी’ गाण्याच्या सुरुवातीला ग्राफिटी काढतानाची काही दृश्य चित्रीत केली आहेत यावरून आपल्याला ग्राफिटी म्हणजे काय याचा अंदाज येऊ शकतो.

ह्या गाण्याची सुरुवातीची १८ सेकंद बघा

सिंगापूर मधल्या ग्राफिटीची स्थिती काय?

सिंगापूरमध्ये काही परवानगी घेऊन ग्राफिटी करणारे जे कलाकार आहेत आपली कला जगासमोर मांडतात. समाजामध्ये एक वर्ग असा देखील आहे जो व्यवस्थेशी सहमत नाही कारण व्यवस्थेकडून त्यांना त्रास दिला गेला आहे असे त्या वर्गाचे म्हणणे आहे. जागा मालकाची परवानगी न घेता ग्राफिटी काढणे किंवा सार्वजनिक मालमत्तेवर ग्राफिटी काढणे हे सिंगापूरमध्ये Vandalism Act म्हणजेच ‘विध्वंसक कृती कायद्याच्या अंतर्गत’ प्रतिबंधित आहे. एखादा कलाकार जर या कायद्याचा भंग करताना आढळला तर अशा कलाकाराला वेताच्या काठीने ८ फटके देण्याची शिक्षा आहे.

अधिकृत मार्गाने कला सादर करणाऱ्यांचे म्हणणे,

ग्राफिटी
ग्राफिटी

सिंगापूरमध्ये अधिकृत मार्गाने ग्राफिटी काढणाऱ्यांचे म्हणणे लक्षात घेतले तर ते म्हणतात “आम्ही आमची कला सादर करतो आणि दरवेळेला त्यात काही संदेश असतोच असे नाही आणि बऱ्याचदा त्या कलाकृतीचा अर्थ लावण्याची जबाबदारी रसिकांवर सोडतो कारण प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने त्या कलाकृतीचा अर्थ लावू शकतो असे आम्हाला वाटते. दर वेळी एखाद्या कलाकृतींमधून राजकीय किंवा इतर कुठलाही संदेश द्यायचा किंवा द्यायचा नाही हे त्या कलाकारावर आहे, याचा अर्थ प्रत्येक वेळी राजकीय संदेश असतोच असे नाही. कलाकृती रसिकांना आनंद देण्यासाठी सुद्धा तयार केलेली असू शकते.”

अनधिकृत मार्गाने ग्राफिटी काढणार्यांचे म्हणणे,

ग्राफिटी

अनधिकृत मार्गाने सिंगापूरमध्ये जे ग्राफिटी काढतात त्यांच्या म्हणण्यानुसार “रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा इतर कुठल्या ठिकाणी जर कचरा किंवा भंगार ठेवलं असेल तर आम्ही त्याच्या आसपास ग्राफिटी काढून लोकांचे त्याकडे लक्ष वेधतो आणि इथे हे भंगार आहे हे दाखवून देतो. या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या मुलांना मात्र फारशी माहिती नसते त्यामुळे ते बागेत किंवा इतर ठिकाणी काढतात आणि प्रशासनाकडून त्यांना अटक केली जाते”.

तुमचे मत काय ?

ग्राफिटी काढणे म्हणजे सामाजिक मालमत्तेची नासधूस आहे का कलेचा एक मुक्त आविष्कार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करुन अवश्य कळवा आणि आपल्या मित्र परिचितांना या लेखाची लिंक देखील पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*