अध्यात्म म्हणजे काय ?

अध्यात्म

अध्यात्म हा शब्द ऐकला की आपण आजवरच्या अनुभवानुसार त्याला धर्म, पूजा पाठ आणि कर्मकांडांशी जोडून मोकळे होतो पण अध्यात्म म्हणजे खरंच ह्या गोष्टी आहेत का हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे? अध्यात्म जाणून घेण्यासाठी आपल्याला याबद्दलचे अनेक पदर सविस्तर समजून घ्यावे लागतील आणि याबद्दलची अधिक माहिती घेऊयात ह्या लेखात.

माणसाचा स्वभाव

कोणत्याही माणसाचा मूळ स्वभाव हा त्याच्या अनुभवांवरून ठरत असतो आणि तेच अनुभव त्याला समृद्ध करत असतात. कोणतीही गोष्ट जाणून घेणे त्याचा अनुभव घेणे आणि त्यावरून जगण्याचा अर्थ लावणे ही क्रिया माणूस सतत करत असतो. कुतूहल हे माणसाला नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी उद्युक्त करत असते. एखादी गोष्ट जर समजण्या पलीकडे असेल तर ती समजून घेण्याकडे आपला कल असतो. कोणत्याही पद्धतीने कुतूहल शमवणे ह्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो.

अध्यात्म आणि अर्थ काय ?

आपण वर बघितल्याप्रमाणे कोणती गोष्ट जाणून घेणे हा माणसाचा स्थायीभाव आहे, अध्यात्म या शब्दाची फोड केली तर आपल्याला असे लक्षात येते की अधि आणि आत्म म्हणजेच स्वतःला जाणून घेणे आणि स्वतःचा शोध घेणे. आपण जगातील सर्व व गोष्टी जाणून घेतल्या तरी स्वतःला जाणून घेतल्याशिवाय प्रगती करणे अशक्य आहे. राजकुमार सिद्धार्थने देखील सर्व साधन संपत्ती, मोहमाया आणि नश्वर गोष्टींचा त्याग करून स्वतःला जाणून घेण्यासाठी अध्यात्मावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे परिवर्तन तथागत गौतम बुद्धा मध्ये झाले. स्वतः बद्दल संपूर्ण माहिती घेणे आणि ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच अध्यात्म होय.

अध्यात्माची आवश्यकता काय आहे ?

अध्यात्म
छायाचित्र – Jonatan Pie

स्वतःबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आत्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, हत्तीला आपण हत्ती म्हणतो, त्याला स्वतःला आपण हत्ती आहोत हे माहिती नसते. माणसाने स्वतःच्या सोयीसाठी त्या प्राण्याला हत्ती हे नाव दिले आहे. इतर भाषांचे देखील हेच कारण आहे. एक अजस्त्र प्राणी असणे म्हणजे काय हे माणूस समजून घेऊ शकत नाही कारण ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. हत्तीला जर इतर सजीवांप्रमाणे अधिकाधिक चांगले खायला मिळावे, आरोग्य चांगले रहावे, धोक्यापासून बचाव व्हावा असे वाटत असेल तर त्याच्या शरीरासाठी कोणत्या प्रकारचे अन्न योग्य आहे, इतर हत्तींच्या तुलनेत स्वतःला कोणत्या समस्या येतात, कोणत्या वेदना जाणवतात हे समजून घेण्यासाठी स्वतः ते जाणून घेणे आवश्यक आहे. जी गोष्ट हत्तीची आहेत तीच माणसाची देखील आहे. अध्यात्म ही एक अनुभूती आहे जिथे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभव येतात आणि हे जाणून प्रगती करणे यासाठी अध्यात्म आवश्यक आहे.

बुद्ध म्हणजे कोण ?

छायाचित्र – Chris Petrow

राजकुमार सिद्धार्थने अध्यात्मिक मार्गाचा वापर करून आत्मज्ञान मिळवले आणि त्याचे गौतम बुध्दांमध्ये मध्ये परिवर्तन झाले. गौतम बुद्धाच्या म्हणण्यानुसार, बुद्धत्व प्राप्त करणारा मी पहिला नाही माझ्याआधी अनेक बुद्ध होऊन गेले आणि माझ्यानंतर देखील अनेक बुद्ध होतील. बुद्ध या शब्दाचा अर्थ म्हणजे, अशी कोणतीही व्यक्ती जिला जीवनाच्या शाश्वत सत्याचा शोध लागला आहे. अनेक वर्षांच्या योग्य आणि नियमित साधनेनंतर, तपस्येनंतर कोणालाही बुद्धत्व प्राप्त करता येऊ शकते.

विपश्यना ध्यान म्हणजे काय ?

कर्मकांड, धर्म यांच्या पलीकडे जाऊन स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे विपश्यना याबद्दल अधिक माहिती तुम्हाला वरील लेखात मिळू शकेल.

जाणून घेणे

इंद्रियांचा विचार केला तर, आपले डोळे सतत काही ना काहीतरी पाहत असतात, आपले कान नेहमी काहीतरी ऐकत असतात, आपले मन नेहमी मी इंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवर विचार करत असते. थोडक्यात सजीव म्हणून आपण सतत काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जर एखाद्या दगडाला जाणून घ्यायचे असेल तर त्या दगडाला दगड म्हणून पाहणे आवश्यक आहे. एखादा शेतकरी त्या दगडाकडे गोफणीत घालायचे साधन म्हणून पाहत असेल, एखादा मानसिक संतुलन बिघडलला मनुष्य त्या दगडाकडे अन्न म्हणून पाहत असेल. दगडाचा मूळ स्वभाव आणि दगड काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दगडाकडे दगड म्हणून पाहणे. एकंदर हे सगळे समजून घ्यायला सोपे किंवा अवघड वाटत असले तरीदेखील हे समजून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचा वेग प्रत्येक माणसागणिक वेगळा आहे.

जाणून घेण्याची प्रक्रिया

ज्याच्याकडे कोणतीही माहिती नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. जरी इतरांकडे जाऊन माहिती घेतली नाही तरी प्रत्येकाकडे कोणती ना कोणती माहिती उपलब्ध आहे याचे कारण म्हणजे आपल्या कळत नकळत आपले इंद्रिय माहिती गोळा करण्याचे काम करत असतात. एक जागृत आणि प्रगल्भ मन संबंधित विषयाविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते. विज्ञान हा विषय प्रत्येक जण शाळेत शिकतो पण प्रत्येक जण वैज्ञानिक होतोच असे नाही, विज्ञान शिकणारे खूप कमी जण असे असतात ज्यांना त्या विषयाच्या शेवटापर्यंत जाऊन अधिकाधिक जाणून घेण्यात मध्ये रस असतो.

अध्यात्म आणि धर्म

अध्यात्मिक असणे आणि धार्मिक असणे यात फरक आहे. एखादा नास्तिक व्यक्तीदेखील अध्यात्मिक असू शकतो कारण अध्यात्माचा मुख्य अर्थ जाणून घेणे हाच आहे. एखादी व्यक्ती स्वतःविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती आध्यात्मिक आहे असे म्हणता येईल पण अध्यात्मिक असण्याची पातळी ही दर व्यक्तीप्रमाणे बदलत जाईल. धार्मिक व्यक्ती अध्यात्मिक असेलच किंवा अध्यात्मिक व्यक्तीही धार्मिक असेलच असे समीकरण मांडणे चुकीचे आहे. एखादा धर्म, धर्मगुरू किंवा धर्मग्रंथ अध्यात्म विषयी माहिती देऊ शकतो पण अध्यात्माचे आचरण आणि त्यातून मिळणारे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची साधना करणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती धर्माचा आधार घेऊन की साधना करू शकतो किंवा इतर पद्धतीने देखील हा शोध घेतला जाऊ शकतो.

अध्यात्म समजून घेताना

अध्यात्म हा विषय समजवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मोठा आहे त्यामुळे तो एकाच लेखात मांडणे अवघड आहे आपण येणाऱ्या लेखांमध्ये अध्यात्म आणि त्याचे विविध पैलू यांविषयी माहिती घेऊयात.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

 • Abhay Marutrao Jadhav
  फेब्रुवारी 22, 2021 at 2:29 pm

  खूप खूप धन्यवाद..मी अध्यामत्मिक पद्धती / मार्ग आणि त्यांची मानवी उपयुक्तता या विषयावर संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहे..यासाठी ही माहिती मला उपयोगी पडेल .
  या विषयावर अधिक माहिती करिता मी आपला आभारी राहीन..

  [email protected]

  • सरपंच
   ऑगस्ट 28, 2021 at 3:18 pm

   तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद. तुम्हाला लेख उपयोगी पडला हे वाचून आनंद झाला. भविष्यात अधिक माहिती नक्कीच जोडली जाईल.

Leave Your Comment

Your email address will not be published.*