संस्कृती ही माणसाच्या जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्म घेतो त्याच संस्कृतीचे आपल्यावर बहुतांश प्रभाव पडतो. आपले आचार विचार आणि जीवनशैली ही आपल्या संस्कृतीतून तयार झालेली असते. काही वेळेला आपण एका संस्कृतीमधून बाहेर पडून दुसऱ्या संस्कृती मध्ये राहायचे ठरवतो. उदाहरणार्थ भारतातील माणूस उद्योग किंवा नोकरीसाठी सहकुटुंब दुसऱ्या देशात स्थलांतर करतो तेव्हा त्या देशातील संस्कृती त्याला आत्मसात करावी लागते. ही झाली दुसरी संस्कृती पण तिसर्या संस्कृती मधली मुलं म्हणजे नक्की कोण? त्याबद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर माहिती घेऊयात.
संस्कृती म्हणजे काय ?
माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला माहिती आहेच. समाजामध्ये राहताना तसेच स्वतःच्या ज्ञानामध्ये, अनुभवांमध्ये आणि एकंदर जीवनशैलीच्या स्तरामध्ये सतत वाढ होत राहावी म्हणून सामाजिक पातळीवर काही गोष्टी असणे गरजेचे बनले ज्यामुळे ह्या गोष्टी साध्य करता येतीलच पण याशिवाय पुढील पिढीला देखील आपल्याकडे असलेले ज्ञान आणि अनुभवांचा फायदा होऊ शकेल. उदाहरणच द्यायचे झाले तर ठराविक कालांतराने देव-देवतांच्या नावाने किंवा दिवसांनी उपास केल्यामुळे देव प्रसन्न होतो आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभते हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. देव मानणे किंवा न मानणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असला तरीही ठराविक कालांतराने उपास केल्याने आपली पचनशक्ती सुधारून शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात आणि आपले आरोग्य सुदृढ राहते हे त्यामागचे वैज्ञानिक कारण आहे. अनेक शतकांपासून भारत हा धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्यांचा देश असल्यामुळे उपास करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग झाला. सामाजिक पातळीवर उपास करण्याची परिसीमा गाठून आत्मक्लेश करणे म्हणजेच उपोषण करून सामाजिक बदल घडवण्याचे प्रयत्न करणे ही प्रथा मानणारा देखील भारतच आहे.
सेंटिनेलीज जमातीविषयीचा हा लेख नक्की वाचा
संस्कृती म्हणजे काय याचा ढोबळमानाने अंदाज करायचा झाला तर एखाद्या समाजाच्या किंवा देशाच्या किंवा गटाच्या स्वतःच्या चालीरीती, प्रथा आणि परंपरा होय. यामध्ये कला, भाषा, साहित्य तसेच संगीत इत्यादीचा समावेश होतो. ह्या गोष्टी परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जातात. सण, उत्सव इत्यादी गोष्टी देखील संस्कृतीचाच भाग आहेत. जगाच्या पाठीवर संस्कृती काही ठिकाणी एक सारखी तर काही ठिकाणी पूर्णपणे भिन्न अशी असू शकते. माणसाच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी संस्कृतीचा मोठा वाटा आहे.
पु.लं देशपांडे ह्यांच्या शब्दात संस्कृती

“शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत… गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी… दुसऱ्याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार… दिव्या दिव्या दिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…
.
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी… दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने… पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे… सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…
.
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा…”
पु.लं देशपांडे
दुसरी संस्कृती म्हणजे काय ?
आपण आधी बघितल्याप्रमाणे दुसरी संस्कृती म्हणजे जेव्हा काही कारणामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायमचे स्थलांतरित व्हावे लागते आणि ती संस्कृती आपलीशी करावी लागते अशा संस्कृतीला दुसरे संस्कृती असे म्हणतात. उदाहरणार्थ – काश्मीरमधून जर कोणी महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आणि आणि इथली भाषा आणि संस्कृती आपलीशी केली तरीदेखील त्यांच्यासाठी पहिली संस्कृती म्हणजे काश्मीरी असणार आणि दुसरी म्हणजे मराठी अर्थात महाराष्ट्रीयन असेल. एखाद्या ठिकाणाहून, समाजातून, देशातून दुसऱ्या ठिकाणी, समाजात किंवा देशांमध्ये स्थलांतर करून तिथली संस्कृती स्वीकारणे म्हणजे ती दुसरी संस्कृती होय.
तिसरी संस्कृती म्हणजे काय ?
एखादा माणूस ठराविक काळासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दोन पेक्षा जास्त ठिकाणी जातो आणि तिथल्या संस्कृतींचा त्याच्यावर प्रभाव पडतो ह्याला तिसरी संस्कृती असे म्हणतात. दुसऱ्या संस्कृतीमध्ये माणूस पहिल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायमचे स्थलांतर होतो पण तिसऱ्या संस्कृतीमध्ये मात्र असे घडत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, नागपूर मध्ये राहणारा एक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतो, तिथून उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेमध्ये जातो आणि तिथून नोकरीसाठी जर्मनी मध्ये जातो आणि नोकरीमध्ये बढती मिळाली कि दुबई मध्ये जातो आणि काही काळाने परत नागपूर मध्ये त्याच्या मूळ ठिकाणी परततो. मूळचा नागपूरचा असला तरीही त्याच्यावर पुण्याच्या संस्कृतीचा, अमेरिकेतील संस्कृतीचा आणि जर्मनीमधील संस्कृतीचा, दुबई मधील संस्कृतीचा काही ना काहीतरी प्रभाव पडतो. या सगळ्याचा एकत्रित प्रभाव म्हणजेच तिसरी संस्कृती आहे.
तिसऱ्या संस्कृती मधील मुलं

तिसऱ्या संस्कृती मधली मुलं म्हणजे अशी मुलं जी आपल्या जडणघडणीच्या काळामध्ये दोन पेक्षा अधिक संस्कृतीमध्ये राहतात. तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांविषयी कल्पना यावी यासाठी आपण आधीचेच उदाहरण परत पाहूयात, आता असे समजा कि पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना त्या व्यक्तीचे लग्न होऊन त्याला मुलं देखील झाली. आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन ती व्यक्ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाते तेव्हा त्याची मुलं अमेरिकेतील शाळेत शिक्षण घेतात, नोकरी मिळाली की ती व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन जर्मनी मध्ये जाते आणि त्या मुलांचे पुढील शिक्षण जर्मनी मधल्या शाळेत होते, काही वर्षांनी त्या व्यक्तीला नोकरीमध्ये बढती मिळते आणि ती व्यक्ती दुबईमध्ये जाते तेव्हा त्या मुलांचे शिक्षण दुबई मधल्या महाविद्यालयामध्ये होते आणि काही वर्षांनी ती व्यक्ती सहकुटुंब पुन्हा नागपूरमध्ये परत येते. आता अशी मुलं तिसऱ्या संस्कृती मधली मुलं म्हणून ओळखले जातात कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर संस्कार होताना ती मुलं वेगवेगळ्या संस्कृती मधील वेगवेगळे आयुष्य जगलेली आहेत.
तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांना काय फायदा होतो
तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांना नवीन गोष्टी जुळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही कारण माणूस म्हणून आपण ज्या संस्कृतीच्या सगळ्यात जवळ असतो आणि जी आयुष्यभर पाळत असतो ती संस्कृती तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांची अनेक वेळा बदलून झालेली असते. कोणत्याही नवीन बदलाला समोर जाणे यासाठी ती मुलं नेहेमी तयार असतात. तिसऱ्या संस्कृती मधील मुलं हि खुल्या मनाची म्हणजेच ओपन माईंडेड असतात. अशा मुलांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात आणि त्या समजतात त्यामुळे वेगवेगळ्या देशांमधील लोकांची संवाद साधण्याची त्यांना संधी मिळते. संवाद साधण्यासाठी वेगवेगळे विषय तसेच भाषा ज्ञात असल्यामुळे संवाद साधण्यामध्ये देखील अशी मुलं निपुण असतात.
तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांना काय तोटा होतो
खूप कमी काळामध्ये दोनपेक्षा अधिक संस्कृतींमध्ये मिसळणे हे सोपे काम नाही. अनेकदा अशा मुलांना सांस्कृतिक धक्के सहन करावे लागतात. उदाहरणार्थ – आजतागायत तीर्थ आणि शिरा हा प्रसाद खाणाऱ्या मुलांना दुसऱ्या देशांमध्ये आदिवासी भागात राहावे लागले आणि तिथल्या देवाचा प्रसाद म्हणून जर साप खावा लागला तर तो किती मोठा धक्का असेल? वेगवेगळ्या टप्प्यांवर असे अनेक धक्के तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांना सतत सहन करावे लागतात. आपले काही खास मित्र असतात ज्यांच्याशी आपली मैत्री वर्षानुवर्ष असते, त्यांच्या सुखदुःखात आपण सामील होतो तसेच आपल्या सुखदुःखात ते देखील सामील होतात. वर्षानुवर्ष जोपासलेले नात्यांचे असे हे भावनिक बंध तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांना जोपासता येत नाहीत कारण नेहेमी एका संस्कृतीमधून किंवा एका ठिकाणी आणून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागते.
आपण काय पाहिलं ?
संस्कृती म्हणजे सामाजिक जीवन जगण्यासाठी तयार झालेले नियम, परंपरा, कला, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा परिपाक होय. आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्म घेतो ती आपली पहिली संस्कृती असते. आपण आपल्या पेक्षा भिन्न असलेल्या संस्कृतीमध्ये स्थलांतर करतो तेव्हा तिला दुसरी संस्कृती असे म्हणतात. तिसरी संस्कृती म्हणजे जिथे आपण कायम राहण्यासाठी स्थलांतर करत नाही , केवळ नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी रहातो अशी संस्कृती. मुलं जर आपल्या जडणघडणीच्या काळामध्ये जर अशा तिसऱ्या संस्कृतीमध्ये राहिली तर त्याच्यावर तिसऱ्या संस्कृतीचा प्रभाव पडतो आणि म्हणूनच अशा मुलांना तिसर्या संस्कृती मधली मुलं असे म्हणतात. या मुलांना अनेक संस्कृतींची माहिती, जाण आणि अनेक भाषा बोलता येण्याची हातोटी असण्यासारखे फायदे आहेतच पण भावनिक बंध जोपासण्यासाठी आवश्यक असलेला काळ, तसेच वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये करावे लागणारे स्थित्यंतर आणि त्यामुळे पावलोपावली बसणारे सांस्कृतिक धक्के हे तिसर्या संस्कृतीमधील मुलांना असलेले तोटे आहेत.
तुम्हाला तिसऱ्या संस्कृतीमधील मुलांबद्दल काय वाटते हे कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच या लेखाची लिंक तुमच्या मित्रपरिवाराला तसेच आप्तेष्टांना देखील पाठवायला विसरू नका.
मुख्य छायाचित्र – Ilse Orsel