आज आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा शोध १९९० साली लागला. सुरुवातीला फक्त काही जणांना उपयुक्त असणाऱ्या या शोधाची महती पसरत गेली आणि आज जगभरात जवळपास साडेचार अब्जांहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करतात. सुरुवातीला सध्या वाटणाऱ्या ह्या यंत्रणेने सगळे जग एका रेषेत बांधले आहे आणि जगातील कोणतीही व्यक्ती जगातील कोणत्याही कोपऱ्यातील इतर व्यक्तीबरोबर संवाद साधू शकते याशिवाय नवनवीन तंत्रज्ञानामुळे एका देशातून दुसऱ्या देशातील रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासारख्या अनेक क्लिष्ट गोष्टी आज सहज शक्य आहेत. इंटरनेटचा वापर वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात भरपूर प्रमाणात केला जातो, असे असले तरीही इंटरनेट वर गुन्हेगारांची संख्या देखील कमी नाही आणि रोज आपल्यातले असंख्य लोकं ह्या गुन्ह्यांना बळी पडून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. सावधान, या १० चुकांमुळे इंटरनेटवर तुम्ही लुटले जाऊ शकता.
आकडे काय सांगतात ?
इंटरनेटचे फायदे जितके जास्त तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. केवळ भारतासारख्या विकसनशील देशातच नव्हे तर अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये देखील इंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार सर्रास होताना दिसतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या अभ्यासानुसार २०१९ साली भारतात सायबर गुन्हेगारांकडून १ लाख २४ हजार करोड रुपयांची लूट झाली.एकूण १३ करोड अधिक भारतीय सायबर गुन्ह्यांना बळी पडले आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतले. जगात २०१९ मध्ये सायबर गुन्ह्यांना बळी पाडण्याऱ्यांची संख्या साडे तीन करोड पेक्षा जास्त आहे.
इंटरनेट वर फसवणुकीचे १० प्रकार (या १० चुकांमुळे इंटरनेटवर तुम्ही लुटले जाऊ शकता)
थोडासा जागरुकपणा दाखवून आपण सायबर गुन्हेगारांपासून आपला बचाव करू शकतो. आज आपण इंटरनेटवर अधिक प्रमाणात घडणाऱ्या १० गुन्ह्यांबद्दल जाणून घेऊ. तुम्ही हा लेख वाचून स्वतःचे संरक्षण तर कराच पण आपल्या मित्र-परिचितांना ह्या लेखाची लिंक पाठवून त्यांना देखील ह्याविषयी जागृत करा.
ईमेल फिशिंग
तुम्ही अनेक वेबसाईट्स किंवा एप्स वर तुमचे खाते उघडले असेल. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला किंवा तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस बँकेत देखील तुमच्या खात्याशी जोडला असेल. अनेकदा काही वेबसाईट हॅक झाल्यामुळे त्या वेबसाईटवर असलेल्या सर्व सदस्यांची संवेदनशील माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचते. हॅकर्स त्या सर्व ईमेल पत्त्यांवर बनावट ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ ऍमेझॉन कडून ईमेल आला असल्याचे भासवून तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड विचारला जातो किंवा तुम्ही ह्या लिंक वर क्लिक केले नाहीत तर तुमचे बँक खाते बंद केले जाईल असा इ-मेल सुद्धा बँकेकडून आला आहे असे दाखवतात. तुम्ही जर जीमेल सारख्या सुविधा वापरत असाल तर गुगल स्वतःहून असेल इमेल स्पॅम यादीमध्ये टाकते (काही वेळा खरोखर महत्वाचे ईमेल सुद्धा स्पॅम यादीत चुकून टाकले जातात). थोडक्यात एखादी बँक, महत्वाची वेबसाईट किंवा ऍप असल्याचे भासवून तुमची अजून माहिती घेतली जाते किंवा ईमेल मधील एखाद्या लिंक वर क्लिक केले तर तुमच्या संगणकात किंवा मोबाईलमध्ये व्हायरस सोडून तुमची खासगी माहिती चोरली जाते.
ईमेल फिशिंग पासून बचाव कसा कराल?
- कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका, गुगल वर शोध घेऊन समोरच्याचा ईमेल पत्ता अधिकृत आहे का हे बघा.
- कोणीही पाठवलेल्या ईमेल उत्तर देताना कोणत्याही प्रकारची खासगी / आर्थिक माहिती ईमेल द्वारे पाठवू नका.
- एखादा ईमेल संशयास्पद वाटत असेल तर तो ज्या कंपनीकड़ून आला आहे त्यांना फोन करून खात्री करून घ्या.
- अँटीव्हायरस विकत घ्या, तुमचा संगणक, त्यातील सर्व सॉफ्टवेयर्स सतत अपडेटेड ठेवा, अनावश्यक सॉफ्टवेयर्स डाउनलोड करू नका.
- एखाद्या कंपनीने किंवा बँकेने माहिती मागितल्यास बँकेला किंवा कंपनीच्या अधिकृत नंबर वर थेट फोन करून खात्री करून घ्या.
तोतया (Fake) ऍप्लिकेशन्स

तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ऍप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करत असाल आणि जर ऍपलचा फोन वापरत असाल तर ऍपलचे ऍप स्टोअर वापरत असाल. दोन्ही ठिकाणी कोणाला स्वतःचे ऍप उपलब्ध करून द्यायचे असेल तर गुगल आणि ऍपल दोन्ही कंपन्यांचे नियम अत्यंत कडक आहेत त्यामुळे नेहेमी ऍप डाउनलोड करण्यासाठी अधिकृत स्टोअर्सचा वापर करा. कोणत्याही वेबसाईट वरून एप्लिकेशन्सची फाईल डाऊनलोड करून ऍप इन्स्टॉल केले तर अशी ऍप्लिकेशन्स तुमची खासगी माहिती चोरू शकतात कारण अशा परिस्थितीत गुगल किंवा ऍपलचे त्यावर नियंत्रण नसते. काही वेळा फ्री नेटफ्लिक्स किंवा इतर एप्लिकेशनचे आमिष दाखवून व्हायरस तुमच्या फोन मध्ये डाउनलोड केला जातो. अशा तोतया ऍप्लिकेशन्स मुळे खासगी माहिती चोरीला जाण्याची खूप जास्त शक्यता असते.
तोतया ऍप्लिकेशन्स पासून बचाव कसा कराल?
- नेहेमी अधिकृत स्टोअर्स मधूनच ऍप्स डाउनलोड करा.
- फ्री नेटफ्लिक्स किंवा फ्री रिचार्ज सारख्या आमिषांना बळी पडू नका.
- इतरांकडून ब्लूटूथ, शेयरइट सारख्या माध्यमातून ऍप्स घेणे टाळा.
- नको असलेले ऍप्स अजिबात डाउनलोड करू नका.
- कोणत्याही ऍपला अनावश्यक परवानग्या देऊ नका.
सवलत दाखवून चोरी (इंटरनेट द्वारे)
दिवाळी, दसरा, ईद अश्या सणांच्या वेळी किंवा इतर महत्वाच्या प्रसंगी ऍमेझॉन किंवा इतर मोठमोठ्या वेबसाईट्सचे नाव लावून किंवा इतर नाव लावून भरपूर सवलत (डिस्काउंट) आहे असे भासवले जाते. १०,००० रुपयांचे घड्याळ आज १,००० रुपयांना देत आहोत त्वरा करा अशा जाहिराती देऊन १,००० रुपये ऑनलाईन मागितले जातात आणि प्रत्यक्षात कोणतेही सामान पाठवले जात नाही. काही वेळा विदेशात जाण्यासाठी स्वस्तात सहली आहेत असे भासवून अनामत रक्कम भरायला लावली जाते पण नंतर कोणताही संपर्क होत नाही.
सवलत दाखवून चोरी करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- नेहेमी अधिकृत वेबसाईट वरून व्यवहार करा. इतरत्र सवलत दिसत असल्यास अधिकृत नंबर वर फोन करून माहिती घ्या.
- कोणतीही सवलत असल्यास थेट अधिकृत वेबसाईट किंवा एप्लिकेशन वर त्याची माहिती उपलब्ध असेल ती पहा.
- जाहिरात संशयास्पद वाटल्यास कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा आणि डिलिव्हरी आल्यावर वस्तू तपासून मगच पैसे द्या.
सिनेमा, वेब सिरीज, टीव्ही मालिका किंवा गाण्यांच्या नावाखाली चोरी

अनेकदा ज्या कलाकृतीला जास्त मागणी आहे अशा कलाकृतीचे नाव वापरून लूट केली जाते. उदाहरणार्थ – एखादा चित्रपट सिनेमागृहात किंवा OTT प्लॅटफॉर्म आजच प्रदर्शित झाला असेल तर तो फुकट पाहण्यासाठी अनेक जण इंटरनेट वर शोध घेतात. काही वेबसाईट्स HD मध्ये हा चित्रपट पहा किंवा डाउनलोड करा अशी जाहिरात करतात, अनेक लोक अशा लिंक्स वर क्लिक करतात. प्रत्यक्षात चित्रपट दाखवला जात नाहीच, या उलट क्लिक करणाऱ्याच्या संगणकात व्हायरस सोडला जातो ज्यातून त्याची वैयक्तिक माहिती चोरली जाते आणि तिचा दुरुपयोग केला जातो.
कलाकृतीच्या नावाने चोरी करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- नेहेमी अधिकृत मागार्नेच चित्रपट, मालिका, वेब सिरीज पहा किंवा गाणी ऐका.
- पायरेटेड चित्रपट, गाणी डाउनलोड करणे टाळा, त्यातून व्हायरस शिरू शकतो.
- सर्व्हे किंवा इतर कारण देऊन वैयक्तिक माहिती मागितल्यास अजिबात देऊ नका.
फोन, टेक्स्ट मेसेजेस किंवा ईमेल पाठवून चोरी
नमस्कार, आम्ही अमक्या तमक्या बँकेतून बोलत आहोत किंवा आम्ही इनकम टॅक्स विभागातून बोलत आहोत तुम्हाला टॅक्स रिफन्ड द्यायचा आहे त्यासाठी तुमची माहिती तपासायची आहे. किंवा तुम्हाला व्हाट्सअप कडून लॉटरी लागली आहे आणि बँकेत पैसे जमा करायच्या आधी तुमची माहिती व्हेरिफाय करायची आहे असे कोणतेही कारण सांगून तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते. कोणतीही बँक किंवा संस्था अशा पद्धतीने वैयक्तिक माहिती मागत नाही. तुम्हाला अशा वेळी थोडा जरी संशय आला तरी वेळ घेऊन सखोल तपास करा.
फोन, टेक्स्ट मेसेजेस किंवा ईमेल पाठवून चोरी करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- कोणतीही माहिती देताना अधिकृत क्रमांकावर संपर्क करून आधी खात्री करून घ्या. ह्यासाठी वेळ गेला तरी चालेल.
- कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका आणि इतरांना तो मेसेज किंवा ई-मेल पाठवू नका. रिप्लाय देखील करू नका.
- तुमच्या ई-मेल किंवा फोन मध्ये स्पॅम सुविधा सुरु करा म्हणजे संशयास्पद ईमेल्स किंवा फोन आपोआप लपवले जातील.
खोटे नंबर पसरवून चोरी (इंटरनेट द्वारे)
या यादीमध्ये वर बघितलेल्या अनेक प्रकरणांमध्ये समोरून आपल्याला संपर्क केला जातो आणि माहिती किंवा पैसे चोरले जातात पण ह्या प्रकरणामध्ये चोरांकडून इंटरनेटचा प्रभावी वापर केला जातो. चोरांकडून एखाद्या बँकेचा कस्टमर केयर नंबर आहे असे सांगून अनेक ठिकाणी तो पोस्ट केला जातो ह्यामुळे ज्यांना त्या बँकेला संपर्क करायचा आहे ते लोक त्या बँकेचा नंबर इंटरनेट वर शोधतात आणि जर चोरांनी पसरवलेल्या नंबर वर त्यांनी फोन केला तर चोरांना आयतीच शिकार मिळते. अशा वेळी लोकांनी स्वतः नंबर शोधून संपर्क केल्यामुळे लोकांना कोणताही संशय येत नाही आणि बँकेतच फोन लागला आहे असे समजून समोरचा व्यक्ती मागेल ती माहिती देऊन टाकतात. अनेकदा गुगल सारख्या ठिकाणी सुद्धा खोटे नंबर पोस्ट केले जातात.
खोटे नंबर पसरवून चोरी करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- बँकेच्या किंवा इतर कोणत्याही संस्थेला फोन करताना तुमच्याकडे असलेल्या कागदपत्रांवर दिलेल्या नंबर वर फोन करा. उदा – पासबुक
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखाला देखील तुमची वैयक्तिक माहिती मागण्याचा अधिकार नाही त्यामुळे कोणालाही गोपनीय माहिती देऊ नका.
- शक्य असल्यास बँकेच्या किंवा संस्थेच्या कार्यालयात जाऊन अधिकृत संपर्क क्रमांक आणि ईमेल घेऊन या आणि पुढे नेहेमी त्याचा वापर करा.
- गुगल किंवा इतर कुठल्याही संकेतस्थळावर सापडलेल्या नंबर वर फोन करू नका, अधिकृत संकेतस्थळावरील नंबर वर संपर्क करा.
- अधिकृत नंबर वर किंवा ईमेल वर देखील पासवर्ड, ओटीपी नंबर, डेबिट कार्ड नंबर देऊ नका ती माहिती अत्यंत गोपनीय ठेवा.
भीम ऍप , पेटीएम, गुगल -पे, फोन-पे इत्यादी ऍप्सच्या नावाखाली चोरी

पैसे देण्या-घेण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी आज अनेक ॲप्लिकेशन्स उपलब्ध होत आहेत पण अशा ॲप्लिकेशनचा गैरवापर करणारे देखील कमी नाहीत. तुम्हाला जर पैसे स्वीकारायचे असतील तर फक्त तुमचा फोन नंबर किंवा यु.पी.आय आयडी इतरांना द्यावा लागतो. काही वेळेला समोरचा व्यक्ती तुमच्याकडे वेरिफिकेशन किंवा इतर कोणतेही कारण देऊन एक रुपया किंमत दहा रुपये अशी शुल्लक रक्कम पाठवण्यासाठी विनंती करेल. तुम्ही देखील इतरांना पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा यूपीआय आयडी मागून घ्या या आणि त्याद्वारेच पेमेंट करा याशिवाय तुम्ही क्यू.आर कोड देखील स्कॅन करू शकता परंतु ऑनलाइन जर तुम्हाला कोणी क्यू आर कोड पाठवला तर क्यू आर कोड वापरून पैसे पाठवू नका. अनेकदा तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवली जाते आणि आणि व्हेरिफिकेशन च्या नावाखाली पैसे पाठवायला सांगितले जातात परंतु असे करताना तुमच्या खात्याचा एक्सेस देखील समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो ज्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेऊ शकते त्यामुळे तुम्हाला जेव्हा पैसे स्वीकारायचे असतील तेव्हा कोणत्याही परिस्थितीत व्हेरिफिकेशन किंवा इतर गोष्टी करू नका. आपण जेव्हा कोणत्याही दुकानात QR कोड स्कॅन करून पैसे पाठवतो तेव्हा पैसे घेणारी व्यक्ती समोरच असते त्यामुळे तिथे अशा पद्धतीने चोरी होण्याची शक्यता नसते.
पेमेंट ऍप्सच्या नावाखाली चोरी करणाऱ्यांपासून पासून बचाव कसा कराल?
- ऑनलाईन व्यवहार करताना समोरील व्यक्ती QR कोड स्कॅन करायला सांगत असेल तर करू नका. UPI आयडी किंवा फोन नंबर मागा.
- समोरून तुम्हाला जर पैसे येणार असतील तर फक्त तुमचा मोबाईल नंबर किंवा UPI आयडी आणि कुठल्या एप मध्ये खाते आहे ते सांगा.
- समोरून आलेली पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका कोणत्याही परिस्थितीत एक रुपया देखील पाठवू नका अशा पद्धतीने पाठवू नका.
- पासवर्ड, ओटीपी कोणत्याही व्यक्तीला सांगू नका, कारण चोराला तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेण्यासाठी एवढं पुरेसे आहे.
- अधिकृत नंबर वर किंवा ईमेल वर देखील पासवर्ड, ओटीपी नंबर, डेबिट कार्ड नंबर देऊ नका ती माहिती अत्यंत गोपनीय ठेवा.
(इंटरनेट द्वारे) लॉटरीचे बक्षिस देण्याच्या नावाखाली फसवणूक
सगळ्यात जुनी पद्धत असली तरी दुर्दैवाने आजही अनेक लोक ह्या फसवणुकीला बळी पडतात. तुम्हाला आमच्या आमच्या बँकेकडून किंवा लकी ड्रॉ मध्ये लॉटरी लागली आहे आणि तुम्ही ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये स्वीकारू शकता यासाठी तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशन करावे लागेल आणि त्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती तसेच प्रोसेसिंग फी म्हणून इतके रुपये आम्हाला पाठवावे लागतील असे सांगून तुम्हाला तुमची माहिती तसेच पैसे मागितले जातात. सुरुवातीला हि रक्कम कमी असते पण हळू हळू वेगवेगळे चार्जेस आहेत असे सांगून तुम्हाला अजून पैसे भरायला सांगितले जाते. जेव्हा लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येत नाही तोपर्यत लोक पैसे पाठवत राहतात आणि चोरांना अजून लोकांना फसवण्याचा संधी मिळते.
लॉटरीचे बक्षिस देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- तुम्ही जर कोणत्या लॉटरी मध्ये भागच घेतला नसेल तर तुमचा नंबर येण्याचा प्रश्नच येणार नाही तेव्हा आमिषांना बळी पडू नका.
- तुम्हाला पैसे मिळणार असतील तर बक्षिसातूनच पैसे कमी करून उर्वरित रक्कम मागा पण एकही रुपया खिशातून भरू नका.
(इंटरनेट द्वारे) मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या नावाखाली फसवणूक

अनेकदा फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांवर एखाद्याचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक ह्यांच्या नावाने बनावट खाते उघडले जाते आणि त्या व्यक्तीकडे इमर्जन्सी असल्याची बतावणी करून घाईघाईत पैसे मागितले जातात. आपलाच मित्र किंवा मैत्रीण पैसे मागत आहे असे समजून समोरील व्यक्ती पैसे पाठवते पण अशा वेळी हे पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यावर जातात आणि मग ज्याने पैसे पाठवले आहेत त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते.
मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- अगदी ओळखीचा व्यक्ती देखील पैसे मागत असेल तरी व्हिडियो कॉल करून खात्री करून घ्या.
- ओळखीच्या व्यक्तीकडून एखादा संशयास्पद मेसेज आला किंवा पोस्ट आली तरी तात्काळ त्या व्यक्तीला कळवा.
- अशा अकाउंट वरून आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नका.
(इंटरनेट द्वारे) नोकरी किंवा घरी बसून काम करण्याच्या नावाखाली फसवणूक
कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेक जण घरी बसून कोणते काम करता येईल का अशा संधींच्या शोधात आहेत. घरी बसून काम करा किंवा वर्क फ्रॉम होम, हमखास नोकरी अशा अनेक जाहिराती ऑफलाईन आणि ऑनलाईन पोस्ट केल्या जातात. एखाद्याने त्यांना संपर्क केला कि रजिस्ट्रेशन किंवा डिपॉजीटच्या नावाखाली पैसे मागितले जातात आणि नंतर काम दिले जात नाही. या चुकांमुळे इंटरनेटवर तुम्ही लुटले जाऊ शकता
काम देण्याच्यानावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव कसा कराल?
- जर कोणी हमखास उत्पन्न, नोकरी किंवा काम देत असेल तर कायदेशीर करार करा.
- नंतर तुम्हाला दाद मागण्यासाठी कोणतेही पैसे भरायच्या अगोदर करार करणे आवश्यक आहे.
- कोणत्याही कंपनीबद्दल काम करायच्या आधी इंटरनेट आणि इतर माध्यमातून माहिती मिळवा.
इंटरनेट वापरताना थोडक्यात पण महत्वाचे
हळूहळू भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होत आहेत आणि फसवणूक करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद आहे. ह्याशिवाय भारताचे अनेक देशांशी गुन्हेगार हस्तांतरण करार झाले आहेत त्यामुळे फसवणूक झाली तर गुन्हेगाराला शोधून शिक्षा देता येते व पैसे परत मिळवता येतात पण सजग नागरिक म्हणून आधीच काळजी घेतलेली कधीही चांगले. माहित नसलेली कोणतीही गोष्ट करताना इंटरनेट किंवा जाणकारांकडून जास्तीत जास्त माहिती मिळवून मग ती गोष्ट करावी. तुमच्या मित्रपरिवाराला ह्या लेखाची लिंक अवश्य पाठवा आणि स्वतः देखील काळजी घ्या, सुरक्षित रहा. कोणत्याही कारणासाठी तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका.