इंटरनेटचा शोध हा सैन्याला त्यांच्या कामांमध्ये मदत व्हावी यासाठी लागला होता, कालांतराने वैज्ञानिक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करू लागले. खरंतर माणसाचा वेळ वाचावा यासाठी इंटरनेटचा शोध लावला होता असे म्हणता येईल पण आजची परिस्थिती बघितली तर इंटरनेटमुळे माणसाचा वेळ वाचतो का वाया जातो हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. एका बाजूला इंटरनेटचा योग्य वापर करून मनोरंजन तसेच ज्ञानामध्ये वाढ करून घेणारे आहेत तर दुसर्या बाजूला तासन् तास इंटरनेटवर वेळ वाया घालवणारे देखील आहेत. तुम्ही काय करता? आज आपण इंटरनेटवर वेगवेगळी कौशल्य कशी आत्मसात करायची याबद्दल माहिती घेऊयात.
कौशल्य आत्मसात करण्याची गरज काय ?
कोणती व्यक्ती जन्माला येताना कौशल्य घेऊन जन्माला येत नाही ती आत्मसात करावी लागतात. कौशल्य आपल्याला नवीन समस्यांवर जलदपणे समाधान शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, स्पॅनिश भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे (इंग्रजीचा क्रमांक तिसरा आहे). एखाद्या व्यक्तीला इंग्रजीच्या बरोबरीने स्पॅनिश भाषा आत्मसात असेल तर ती व्यक्ती केवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या देशातच नाही तर जगातील 28 पेक्षा जास्त देशांमध्ये संपर्क करू शकते आणि नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा पर्यटन अथवा मनोरंजनासाठी नवनवीन संधींचा वापर करून घेऊ शकते. केवळ भाषा बद्दलच नाहीतर इतर अनेक कौशल्यांचे देखील हेच महत्त्व आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात टिकून राहायचे असल्यास नवनवीन कौशल्य सतत आत्मसात करत राहण्याची गरज आहे.
कौशल्य आत्मसात करण्याचे पारंपरिक मार्ग कोणते ?
कोणते कौशल्य आत्मसात करण्याचे पारंपारिक मार्ग म्हणजे घरातूनच ते मिळवणे. उदाहरणार्थ, एखादा लोहार आपल्या पुढील पिढीला लोखंडावर काम करण्याचे कौशल्य ज्ञात किंवा अज्ञात पण शिकवत असतो. इतर पद्धतीने कौशल्य आत्मसात करणे म्हणजे नोकरी अथवा उद्योग धंदा करता करता स्वतः मेहनत घेऊन, येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवातून ते आत्मसात करणे होय.
इंटरनेटवरून कौशल्य आत्मसात करण्याचे मार्ग कोणते ?
जग वेगाने बदलते आहे त्याचबरोबरीने नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे, संपर्काची नवंनवीन माध्यम आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. इंटरनेटचा वापर करून आपण बहुतांश कौशल्य आत्मसात करू शकतो. आजच्या लेखात आपण अशाच काही पद्धतींबद्दल पाहुयात याचा वापर करून आपल्याला हवी ती कौशल्य आत्मसात करता येतील.
यशस्वी होण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे
हा लेख वाचला नसेल तर अवश्य वाचा.

इंटरनेटवरुन कौशल्य आत्मसात करण्याचे मार्ग खालीलप्रमाणे.
१. वेबसाईट किंवा ब्लॉगचा वापर करून,
तुम्हाला जे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्याविषयी इंटरनेटवर अनेक वेबसाईट, ब्लॉग अस्तित्वात आहेत. वेबसाईट म्हणजे जिथे सदर कौशल्यात बद्दल माहिती आणि ते कसे आत्मसात करावे याविषयी देखील माहिती उपलब्ध असते. ब्लॉग म्हणजे सदर कौशल्य आत्मसात करण्यासाठी नवनवीन सूचना आणि पद्धती ठराविक कालांतराने दिल्या जातात. तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉग चे वाचन करून या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर दिलेली माहिती वापरून ते आत्मसात करू शकता. उदाहरणार्थ आईस्क्रीम तयार करण्याचे कौशल्य जर तुम्हाला आत्मसात करायचे असेल तर आईस्क्रीम निर्मात्यांचे ब्लॉग किंवा त्याविषयी माहिती असलेल्या वेबसाइट्सचे नियमित वाचन करा आणि त्यात दिलेल्या सूचना आणि मार्गांचा अभ्यास करून स्वतः आईस्क्रीम तयार करण्याचा प्रयत्न करा.
२. प्रश्नोत्तरांच्या वेबसाईट वर प्रश्न विचारून,
एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला माहिती असलेली ठरावीक माहिती कोणत्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर उपलब्ध असेलच असे नाही पण त्याविषयी माहिती असलेले अनेक लोक इंटरनेटचा वापर करत असतात. अशावेळी तुम्ही तुमचे प्रश्न प्रश्नोत्तरांच्या एखाद्या प्रसिद्ध असलेल्या वेबसाईटवर सदर तज्ञांना विचारू शकता, तुम्हाला अडलेला प्रश्न देखील अनेक लोकांना अडलेला असू शकतो त्यामुळे तुम्ही दिलेले उत्तर त्यांना देखील उपयोगाचे असू शकते अथवा ज्यांनी त्याच प्रश्नावर समाधान शोधले आहे असे लोक तुम्हाला उत्तर देऊन तुमची समस्या दूर करू शकतात ज्यामुळे तुम्हाला ते कौशल्य आत्मसात करता येईल.
३. युट्युब द्वारे माहिती घेऊन,
अनेक तज्ञ त्यांना असलेले ज्ञान इंटरनेटवर आणि खास करून युट्युबवर इतरांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतात. तुम्हाला आत्मसात करायचे असलेले कौशल्य इंटरनेटवर नक्कीच कोणीतरी शिकवत असेल अशा तज्ञांचे चॅनल सबस्क्राईब करून त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा तसेच ते आत्मसात करण्यासाठी त्या तज्ञांचे अधिकाधिक व्हिडिओ लक्षपूर्वक पाहून त्यानुसार आचरण करा. उदाहरणार्थ तुम्हाला जर भाषा शिकायची असेल तर स्पॅनिश भाषा विनामूल्य शिकवणारे युट्युब वर असंख्य शिक्षक उपलब्ध आहेत जे स्वतः केवळ इंग्रजी, हिंदी सारख्या भाषांमधूनच नव्हे तर मराठी भाषेमधून देखील स्पॅनिश भाषा शिकवतात. तुम्हाला आत्मसात करायचे असलेले कौशल्य शिकवणारे तज्ञ इंग्रजी किंवा हिंदी भाषेत निश्चितच उपलब्ध असतील पण मराठीत देखील विनामूल्य माहिती देणाऱ्यांची संख्या यू-ट्यूबवर वाढत आहे. तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा कौशल्य आत्मसात करण्यासाठी करून घेऊ शकता.
४. पैसे देऊन कौशल्य विषयक कोर्स करून,
अनेक तज्ञांना युट्युब वर विनामूल्य माहिती देऊन समाधान मिळत असलेले तरी अनेक जणांची उपजीविका अशी माहिती देऊन चालत असते त्यामुळे बहुतेकांना विनामूल्य माहिती देणे परवडत नाही. अशा वेळी सदर तज्ञ मेहनत घेऊन एखादा कोर्स तयार करतात ज्याची ठराविक किंमत ठरवलेली असते. तुम्हाला जर सदर कौशल्य शिकायचे असेल तर तुम्ही पैसे देऊन असे कोर्स विकत घेऊ शकता, Udemy, Coursera सारख्या वेबसाईट्सवर अशा पद्धतीने कोर्स उपलब्ध आहेत. कोणताही कोर्स विकत घेण्याच्या आधी त्या कोर्स विषयी संपूर्ण माहिती घ्या तसेच तो कोर्स आधी ज्यांनी केला आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हेदेखील अवश्य पहा. प्रत्येक वेळी पैसे देऊन केलेला कोण हात सर्वोत्तम असतो असे नाही, त्यापेक्षा अधिक ज्ञान तुम्हाला कदाचित इंटरनेटवर विनामूल्य देखील मिळू शकते पण काही वेळेला पैसे देऊन केलेला कोर्स हा इंटरनेटवर कुठेही मिळणार नाही अशी माहिती देत असतो त्यामुळे पैसे देण्याच्या आधी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

५. तज्ज्ञांचे अनुकरण करून,
काही प्रकारची कौशल्य आत्मसात करताना तुम्ही त्यातल्या तज्ञांचे अनुकरण करून त्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात करू शकता. सर्वात आधी वापरलेल्या शब्दाप्रमाणे, हा मार्ग काही जणांना शक्य आहे पण काही कौशल्य आत्मसात करताना अशा पद्धतीने तज्ञांचे अनुकरण करणे हे अत्यंत धोक्याचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या नर्तकाचा सर्वोत्तम नाच तुम्ही इंटरनेटवर पाहून स्वतः तसे नाचण्याचा प्रयत्न करू शकता, काही वेळेला नर्तक इंटरनेटवर स्वतःहून एकेक पायरी शिकवत संपूर्ण नाच बसवतात, त्याचा लाभ ज्यांना नाच शिकायचा आहे असे लोक घेऊ शकतात. जर तुम्हाला विद्युत उपकरण दुरुस्त करण्याचे कौशल्य शिकायचे असल्यास इंटरनेटवर अशा प्रकारच्या अनुकरण करणे धोक्याचे असू शकते आणि त्याने जीवाचे बरे वाईट होण्याची देखील हानी संभवते. विद्युत उपकरण दुरुस्त करण्याचे कौशल्य किंवा अशाच प्रकारचे अनेक इतर कौशल्य ज्यांच्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे तेव्हा तज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
६. थेट मार्गदर्शन घेऊन,
आधी बघितलेल्या मार्ग प्रमाणे, तज्ञांचे अनुकरण करून कौशल्य आत्मसात करणे शक्य आहे पण काही वेळेला तज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. इंटरनेटच्या युगात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला माणूस जगातील दुसऱ्या कोपऱ्यात संपर्क करू शकतो. तुम्हाला हवे असलेले कौशल्य जरी इंटरनेटवर शिकवणारा कोणताही तज्ञ उपलब्ध नसला तरी तुम्ही संबंधित विषयातील तज्ञांचा शोध घेऊन त्यांना व्हिडिओ कॉल अथवा ऑनलाईन मीटिंग करून थेट मार्गदर्शन घेऊ शकता. अगदी स्पॅनिशचे उदाहरण घेतले तर, स्पॅनिश शिकवणारे अनेक तज्ञ ऑनलाईन शिकवणी देखील घेतात त्यामुळे तुम्ही स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी अशा पद्धतीची शिकवणी सुरू केलीत तर संबंधित विषयातील तज्ञ तुम्हाला ऑनलाईन मीटिंग द्वारे ठराविक कालांतराने कौशल्य शिकण्यास मदत करू शकतात.
७. समाज माध्यमांचा वापर करून,
समाज माध्यम अर्थात सोशल मीडिया तुम्ही कशासाठी वापरता? तुम्ही जर कुत्रे आणि मांजरी चे व्हिडिओ बघण्यात वेळ घालवत असाल तर आजच सावध व्हा कारण संपूर्ण प्रणाली अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे की की एकदा माणूस त्यात शिरला की पुन्हा त्याला तेच तेच दाखवण्यात येते त्यामुळे बाहेर पडणे अवघड होते. सोशल मीडियावर तुम्हाला हवे असलेले कौशल्य शिकवणारे अनेक समूह आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना व्यावसायिक कारणांसाठी देखील समाज माध्यमांपासून दूर जाता येत नाही अशावेळी जिथे तुम्हाला हवी असलेली कौशल्ये शिकवली जातात अशा समूहांना जोडले जाऊन वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो. पुन्हा एकदा स्पॅनिश भाषेचे उदाहरण घ्यायचे झाल्यास फेसबुक वर ‘Learning Spanish’ असेच सर्च करा आणि ‘समूह’ म्हणजेच Communities वर क्लिक केल्यावर तुम्हाला अनेक समूह दिसतील ज्यात तुम्ही विनामूल्य सभासद होऊन स्पॅनिश भाषेचे धडे घेऊ शकता.
८. कौशल्य सादर करून,
तुम्हाला जर थोडेबहुत कौशल्य आत्मसात असेल तर तुम्ही त्या कौशल्याचे प्रदर्शन करून तज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला जर थोडे जरी गाणे येत असेल तर गाण्याचा एखादा छोटा व्हिडिओ करून तुम्ही इंटरनेटवर पोस्ट केलात आणि इतर गायकांना त्याची लिंक पाठवलीत तर ते गायक तुम्हाला तुमचे गाणे अधिक कसे योग्य होईल याविषयी निश्चितच मार्गदर्शन करतील. अशा मार्गाने कौशल्य आत्मसात करताना किंवा असलेले कौशल्य विकसित करताना नकारात्मक लोक देखील भेटतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा संयम तुमच्याकडे असायला हवा. इतरांच्या कामाची चेष्टा करणे किंवा त्या व्यक्तीला ट्रोल करणे हे इंटरनेट ला लागलेली कीड आहे त्यामुळे सार्वजनिक रित्या इंटरनेटवर कोणते कौशल्य किंवा कला सादर करताना दुर्लक्ष करण्याचे कसब देखील अंगी असावे लागते. तुम्हाला संबंधित विषयातील तज्ञ अवश्य मार्गदर्शन करतील या शिवाय तुमचे हितचिंतक सुद्धा तुमच्या सादरीकरणावर निरोगी टीका करतील त्यातील सकारात्मक बाजू लक्षात घेऊन तुम्ही तुमचे कौशल्य अधिक विकसित करू शकता किंवा नवीन कौशल्य आत्मसात करू शकता.

९. संबंधित कौश्यल्याची पदवी घेऊन,
पदवी महत्त्वाची आहे, कौशल्य महत्त्वाचे आहे का दोन्ही महत्त्वाचे आहेत हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. काही वेळेला तुम्हाला नोकरीसाठी अथवा व्यवसायासाठी संबंधित कौशल्याची पदवी घेणे अत्यावश्यक असते. सार्वजनिक हिताचा मुद्दा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या काही नियमांनुसार तुम्हाला डॉक्टर व्हायचे असेल किंवा इंजिनिअर व्हायचे असेल तर पदवी घेणे नक्कीच आवश्यक आहे जी सर्वसाधारणपणे तुम्हाला हवी असल्यास पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. काही कौशल्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही नामांकित मान्यताप्राप्त संस्थेद्वारे अथवा विद्यापीठाद्वारे ऑनलाईन पदवी घेऊ शकता. परदेशातील अनेक विद्यापीठे आपल्याला ऑनलाईन पदवी घेण्याची सोय उपलब्ध करून देतात ज्याचा खर्च प्रत्यक्ष त्या विद्यापीठांमध्ये जाऊन पदवी घेण्याच्या खर्चापेक्षा भरपूर कमी असतो. तुम्ही संबंधित कौशल्याची पदवी अशा पद्धतीने ऑनलाइन घेऊ शकता जिथे पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला मान्यताप्राप्त संस्था अथवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र देखील मिळेल.
१०. विनामूल्य काम करून,
कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्ही स्वतः पैसे किंवा वेळ खर्च करून मेहनत घेऊ शकता. काही वेळेला तुम्ही संबंधित तज्ञांशी संपर्क करून जे त्या कौशल्याचा वापर करून व्यवसाय करत आहेत अशांसाठी विनामूल्य काम करू शकता. उदाहरणार्थ – इंटरंशिप प्रोग्रम म्हणजे संपूर्ण किंवा काहीही कौशल्य नसलेल्या व्यक्तीला नोकरीवर ठेवून कमी पगार अथवा कोणताही आर्थिक मोबदला न देता संबंधित व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य शिकवून त्यांच्याकडून काम करून घेणे होय. उदाहरणार्थ – तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी काही माहिती नसल्यास तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सीजना संपर्क करून इंटर्नशिप प्रोग्राम बाबत चौकशी करू शकता. इंटरनेटवर देखील प्रोग्राम बद्दल माहिती देणारी असंख्य वेबसाइट्स उपलब्ध आहेत. काही वेळेला अत्यंत पगारामध्ये तुम्हाला इंटर म्हणून घेतले जाईल किंवा काही वेळेला विनामोबदला काम करावे लागेल, या बदल्यात तुम्हाला त्या कामाविषयी माहिती मिळू शकेल आणि संबंधित कौशल्य आत्मसात करण्यासाठी देखील रोज मार्गदर्शन केले जाईल. इंटर्नशिप केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कामासाठी आवश्यक असणारे व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल नॉलेज) मिळते. भारतात अनेक कंपन्या ऑनलाईन इंटरंशिप प्रोग्राम उपलब्ध करून देतात ज्यामुळे तुम्ही भारतात कुठेही असाल तरी आपल्या घरात बसून इंटरंशिप करू शकता आणि त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व्हिडिओ कॉल अथवा मीटिंग वेळोवेळी केले जाते.
११. भागीदारीत काम करून,
जेव्हा तुम्हाला एखाद्या कौशल्याविषयी काही माहिती नसते तेव्हा इंटर्नशिप करण्याचा मार्ग योग्य आहे पण जर तुमच्याकडे थोडे जरी कौशल्य असेल तरी तुम्ही भागीदारीत काम करून ते विकसित करू शकता अथवा नवीन कौशल्य आत्मसात करू शकता. उदाहरणार्थ – तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन उत्तम करता येत असेल तर तुम्ही एखाद्या प्रिंटिंग व्यवसायातील उद्योजकाची संपर्क करून भागीदारीत काम करण्यासाठी प्रस्ताव मांडू शकता यामुळे प्रिंटिंग व्यवसायातील उद्योजकाला ग्राफिक डिझाईन करणारा व्यक्ती मिळेल आणि तुम्हाला देखील प्रिंटिंग व्यवसायाबद्दल कौशल्य आत्मसात करता येतील. तुम्ही जर पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केलात तर ग्राफिक डिझाईन शिवाय तुमचे प्रिंटिंग व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्य देखील आत्मसात झालेले असेल. इंटरनेटचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने भागीदारी करू शकता जिथे तुमच्यात शहरातील इतर उद्योजकांना संपर्क करून तुम्ही भागीदारीच्या नवीन संधी शोधू शकता याशिवाय काही उद्योगांमध्ये भारतभरातील उद्योजकांबरोबर तुम्ही तुमच्या घरातूनच ऑनलाईन काम करू शकता. काही वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तुम्ही भागीदारीच्या संधी शोधू शकता ज्यामुळे तुम्हाला नवीन कौशल्य आत्मसात करता येईल.
१२. ऑनलाईन व्यवसाय करून,
व्यवसाय करणे शिकण्यासाठी जरी ‘ एम.बी.ए’ सारखे अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष व्यवसाय करण्यासाठी सतत नवनवीन कौशल्य शिकणे अत्यावश्यक आहे. एखादा उद्योजक व्यवसाय करता करताच नवीन कौशल्य आत्मसात करू शकतो. उद्योजकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांना आनंदी ठेवणे. ग्राहक हेच उद्योग वाढीसाठी सर्वोत्तम सूचना करत असतात. उदाहरणार्थ, एखादा चहावाला जर खूप गोड चहा करत असेल तर त्याचे ग्राहक त्याला येऊन ‘चहा खूप गोड आहे, थोडा कमी गोड चहा करत जा’ असे सूचना देतात त्यामुळे आपोआप चहा वाला कमी गोड असलेल्या चहा करतो त्यामुळे त्याचे चहा बनवण्याचे कौशल्य विकसित होत जाते. ऑनलाइन व्यवसाय करताना भारतभरातून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना मिळण्याची शक्यता आहे त्याचे पालन करायचे की नाही हा तुमचा निर्णय असला तरी तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी त्यातल्या बर्याच या सूचना उपयुक्त असू शकतात.
आपण काय पाहिले ?
इंटरनेटवरून कौशल्य शिकण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. खूप कमी वेळेला तुम्हाला तुमचे पैसे गुंतवून नवीन कौशल्य आत्मसात करावे लागते पण अनेकदा तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावून नवनवीन कौशल्य आत्मसात करू शकता. त्याच्या फायदा तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी होऊ शकतो अथवा दैनंदिन आयुष्यात देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो ज्याने अनेक समस्यांचे समाधान शोधण्यात तुमची मदत होईल. इंटरनेट हे एका चक्रव्युहाप्रमाणे प्रमाणे आहे, तुम्ही तुमचा वेळ तुमच्या या पद्धतीनुसार कसा वापराल हे जर ठरवले नाही तर इंटरनेट वर असलेल्या अनेक कंपन्यांनी आपल्याला भुलवण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे ज्यामुळे एकदा फोन हातात घेतला की दोन ते तीन तास कसे निघून जातात हे आपल्याला कळत देखील नाही. या चक्रव्यूहाला भेदून इंटरनेटचा वापर करून कौशल्य आत्मसात करून स्वतःचा विकास करून घेणे हेच आपल्या उत्कर्षासाठी योग्य आहे. तुम्ही ह्या लेखाची लिंक आपल्या मित्रपरिवाराला अवश्य पाठवा तसेच या लेखाविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये देखील कळवा.
इंग्रजी भाषा शिकण्याचे ७ सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत ? | Marathi.Plus
ऑक्टोबर 8, 2020 at 3:41 pm[…] इंटरनेटवरून कौशल्य आत्मसात करण्याचे … […]