विपश्यना ध्यान म्हणजे काय ?

विपश्यना म्हणजे काय तर स्वतःच्या आत डोकावून शरीरातील इंद्रियांना होणाऱ्या वेगवेगळ्या संवेदनांचा अनुभव घेणे. विपश्यना हा ध्यान साधनेचा प्रकार अति प्राचीन असला तरी साधारण २,५०० वर्षांपूर्वी ह्याचा पुन्हा शोध घेऊन गौतम बुद्धांनीच तो प्रचलित केला असे मानले जाते. विपश्यना श्रीलंका तसेच आग्नेय आशियामधील देशांमध्ये बौद्ध धर्मियांकडून नियमित केली जाणारी ध्यान साधना आहे. बुद्धकाळानंतर विपश्यनेचे मूळ स्वरूप कालांतराने भेसळयुक्त होत गेले. आज आपण जे अनुभव घेतो ते शुद्ध स्वरूपात घेत नाही (उदाहरण द्यायचे झाले तर टीव्ही बघता बघता जेवण करताना जेवणाची चव लक्षात येत नाही कारण संपूर्ण लक्ष टीव्ही कडे असते). विपश्यनेचा साधा सरळ अर्थ म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशीच पहाणे आणि समजून घेणे.

अध्यात्मिक प्रवास (ध्यान)

विपश्यना म्हणजे अंतर्मनाचा आढावा घेऊन आत्म परिवर्तन करण्याचे एक माध्यम आहे. आपले शरीर आणि मन ह्यांच्यात खोलवर असणाऱ्या आंतरिक संबंधांवर लक्ष केंद्रित करून शरीराला जाणवणाऱ्या भौतिक संवेदनाचा अनुभव घेतला जाऊ शकतो. माणसाला अंतर्मनात डोकवायला लावून मानसिक अशुद्धता दूर करणारी हा एक अध्यात्मिक प्रवास आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

विपश्यनेचा प्रसार (ध्यान)

बुद्धानंतर ५ शतकांमध्येच हि विद्या भारतातून नामशेष झाली पण भारताशेजारीच असलेल्या बर्मा म्हणजेच म्यानमार ह्या देशात हि साधना मूळ स्वरूपात गुरु-शिष्य परंपरेने २ हजार वर्ष जपली गेली आणि पुढे जगभर तिचा प्रसार झाला. आधी हि विद्या फक्त भिक्षूंपुरतीच मर्यादित होती पण नंतर मात्र Ven Ledi Sayadaw ह्यांनी हि विद्या जनसामान्यांमध्ये प्रचलित केली. भारतातच नाही तर जगातील ८० देशांमध्ये आज आपण तिचा उपयोग केला जात आहे ह्याचे श्रेय श्री. सत्य नारायण गोएन्का ह्यांना देखील जाते.

विपश्यना ध्यान म्हणजे काय
श्री. सत्य नारायण गोएन्का

श्री. गोएन्का हे १९६९ पासून भारतात स्थायिक झाले आणि त्यांनी हि ध्यानसाधना शिकवायला सुरुवात केली. पुढे ११ वर्ष जगातील अनेक देशांतील अनेक लोकांना हि विद्या शिकवल्यावर १९८२ मध्ये त्यांनी मदतीसाठी मदतनीस घेऊन विद्या शिकवण्याचे काम सुरु ठेवले. आज ९४ देशांमध्ये 341 ठिकाणी विपश्यना विनामूल्य शिकवली जाते (साधकांना दान करायचे असल्यास ते करू शकतात).

विपश्यना साधना (ध्यान)

विपश्यना साधना म्हणजे धम्माच्या तत्वांचे पालन करणे. धम्म म्हणजे निसर्गाचे सार्वत्रिक नियम ह्यात ८ उद्दात्त मार्गांवरून चालण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. हे आठ मार्ग ३ मुख्य भागात विभागलेले आहेत सिला (नैतिकता), समाधी (एकाग्रता), पन्ना (अंतर्ज्ञान).

विपश्यना विद्या शिकण्यासाठी किमान १० दिवसांच्या विनामूल्य निवासी शिबीरात उपस्थित रहाणे आवश्यक आहे जिथे अनुभवी आणि पात्र शिक्षकांकडून हि विद्या शिकवली जाते. हि शिबिरं विपश्यना सेंटर्स मध्ये आयोजित केली जातात. सदर शिबिरात भाग घेतल्यावर बाह्य जगाशी कोणताही संपर्क होऊ दिला जात नाही. शिबिराच्या १० दिवसांमध्ये लिहिणे, वाचणे किंवा इतर अध्यामिक साधना करण्यासाठी देखील परवानगी नाही. शिबिराच्या कालावधीत इतर विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी परवानगी नसते पण साधनेसंदर्भात काही प्रश्न असल्यास ते शिक्षकांना विचारता येतात ह्याशिवाय कोणत्या इतर समस्या असतील तर स्वयंसेवकांशी बोलण्याची परवानगी असते.

विपश्यना साधना शिकण्याच्या प्रक्रियेच्या ३ पायऱ्या आहेत

१. सिला (नैतिकता)

साधक सिला (किंवा शील) म्हणजे नैतिकतेचा सराव करतात. ज्यात इजा पोहोचते अशा क्रियांपासून दूर होणे. ह्यात मुख्यत्वे ५ नैतिक गोष्टींचा समावेश होतो. सजीवांचा जीव न घेणे, चोरी न करणे, लैंगिक गैरवर्तन न करणे, खोटे न बोलणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. ह्या आज्ञांचे पालन केल्यामुळे मन स्थिर होते आणि साधनेच्या पुढील क्रियेकडे सहजरित्या जाता येते.

२. समाधी (एकाग्रता)

साधना शिबिराचे पहिले साडेतीन दिवस साधक अनापना ध्यानसाधना (Anapana meditation) म्हणजेच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिकतात. ह्या साधनेमुळे समाधी (एकाग्रता) वाढण्यास मदत होतेच पण मनावर ताबा मिळवण्यासाठी देखील उपयोग होतो.

वर पाहिलेल्या पहिल्या दोन पायऱ्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी उपयोगाच्या आणि गरजेच्या असल्या तरी तिसऱ्या पायरीवर गेल्याशिवाय त्या अपूर्णच आहेत. तिसरी पायरी म्हणजॆ मानसिक अशुद्धी दूर करून मन शुद्ध करणे.

३. पन्ना (अंतर्ज्ञान)

तिसरी पायरी नंतरच्या साडे-सहा दिवसांमध्ये शिकवली जाते आणि हीच खरी विपश्यना होय.साधक ह्यात शारीरिक आणि मानसिक बाबींबद्दल अधिक स्पष्ट होत जातो आणि स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश करतो आणि अंतर्ज्ञान प्राप्त करतो.

विपश्यना साधना शिबिराचे स्वरूप

साधकाला पद्धतशीरपणे ध्यान साधना करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिवसातून वेळोवेळी केल्या जातात, ह्याशिवाय श्री. गोएंका ह्यांचे १० दिवसांचे रेकॉर्ड केलेले प्रवचन दररोज १ दिवस ह्याप्रमाणे संध्याकाळी दाखवले जाते. शिबिरात सुरुवातीचे ९ दिवस संपूर्ण शांतता अनुभवायला मिळते, दहाव्या दिवशी साधक मौन सोडून पुन्हा बोलायला सुरु करतात आणि आपल्या जुन्या जीवशैलीकडे परत वळतात. शिबीर ११ व्या दिवशी सकाळी मेत्ता-भावना (सगळ्यांप्रती प्रेम आणि ममत्व) प्रकारच्या ध्यान साधनेनी पूर्ण होते.

विपश्यना साधना शिबिरात भाग कसा घ्यायचा?

विपश्यना साधना शिबिर विनामूल्य असून साधकांना ऐच्छिक देणगी देण्याची सोय आहे. विपश्यना साधना शिबिर अनेक ठिकाणी होत असते पण कोरोना महामारीच्या काळात काही शिबिरे रद्द करण्यात आली. तुम्हाला विपश्यना साधना शिबिरात सहभाग घ्यायचा असल्यास Vipassana Meditation ह्या संकेतस्थळावर भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेले ठिकाण तसेच भाषा निवडा. तुमच्या जागेनुसार आणि भाषेनुसार जेव्हा कधी शिबीर असेल त्याची तारीख आणि माहिती दाखवली जाईल. तिथे तुम्ही अर्ज करून शिबिरात सहभागी होऊ शकता. साधना शिबिरासाठी अनेक साधक काही महिने वाट पाहत असतात त्यामुळे ज्या दिवशी फॉर्म उपलब्ध होईल त्याच दिवशी फॉर्म भरलात तर शिबिरात तुमची जागा आरक्षित केली जाईल. अनेकदा वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध झाल्या झाल्या काही वेळातच शिबिराची साधक संख्या पूर्ण होते आणि उरलेल्यांना पुढील शिबिरासाठी वाट पाहावी लागते.

https://www.dhamma.org/mr/

अधिक माहितीसाठी ह्या वेबसाईट वर भेट द्या.

विपश्यना म्हणजे काय हे आपण जाणून घेतले, विपश्यनेविषयी आणि ह्या लेखाविषयी आपले काय मत आहे हे नक्की कळवा आणि ह्या लेखाची लिंक आपल्या परिचितांना पाठवायला विसरू नका.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

आपली टिप्पणी द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.*