कॅमेरा बनवणारी जगातील सर्वात मोठी कोडॅक कंपनी अयशस्वी का ठरली ?

कॅमेरा

दररोज जगामध्ये अनेक नवीन कंपन्या स्थापन केल्या जातात आणि नवीन उद्योजक आपापल्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकी काहींनाच जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवता येते, कॅमेरा बनवणारी कंपनी हे अशीच जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये एक होती पण अशा कोणत्या चुका झाल्या ज्यामुळे ही कंपनी अयशस्वी ठरली हे आज आपण पाहुयात.

दररोज जगामध्ये अनेक नवीन कंपन्या स्थापन केल्या जातात आणि नवीन उद्योजक आपापल्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकी काहींनाच जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवता येते, कॅमेरा बनवणारी कंपनी हे अशीच जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये एक होती पण अशा कोणत्या चुका झाल्या ज्यामुळे ही कंपनी बुडाली हे आज आपण पाहुयात.

कोडॅकची पार्श्वभूमी

जॉर्ज इस्टमन (George Eastman) ह्यांनी १८८८ मध्ये कोडॅक कंपनीची स्थापना केली. कोडॅक कंपनीने स्थापनेनंतर १९७० पर्यंत प्रकाशचित्रण म्हणजेच फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला.

कोडॅकची पार्श्वभूमी
फोटो सौजन्य : Reddit

सुरुवातीला केवळ काही लोकांची मक्तेदारी असलेल्या प्रकाशचित्रणाला कोडॅक कंपनीने जनसामान्यांमध्ये लोकप्रिय केले. आपणही फोटो काढू शकतो आणि त्यासाठी भरपूर तांत्रिक माहिती असण्याची गरज नाही हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी देखील या कंपनीच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला. फोटो काढायचा असेल तर ‘तुम्ही फक्त बटन दाबा, बाकीचं सगळं काम आमचा कॅमेरा करेल’ इतके सोपे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे कोडॅक कंपनी लोकप्रिय झाली.

व्यवसायाचे स्वरूप

कंपनीचे संस्थापक इस्टमन हे फोटो काढण्याच्या पद्धतीमध्ये जरा बदल करून हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यायला हवे या मताचे होते. त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांना सहजपणे फोटो काढता यायला लागला.

कोडॅक कंपनीचे विक्री करण्याची पद्धत एकदम साधी होती. एक गोष्ट कमी किमतीमध्ये किंवा जवळपास फुकटच द्यायची आणि त्याच्याशी निगडीत इतर गोष्टींची विक्री आपोआप वाढते हे गणित त्यामागे होते. उदाहरणार्थ, एखादी इंटरनेट सेवा देणारी कंपनी सुरुवातीला आवश्यक असणारे राऊटर स्वस्तामध्ये किंवा अगदी फुकट सुद्धा देते आणि ते सुरु ठेवण्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला इंटरनेट सेवा घेणे अनिवार्य असते त्यामुळे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीची विक्री आपोआप वाढते.

कोडॅकची पद्धत देखील हीच होती, ग्राहकांना आपल्या कॅमेरा द्वारे फोटो काढून द्यायचे पण ते फोटो पाहण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आवश्यक होते. ग्राहकांना घरी प्रिंट कशी काढावी याबद्दल माहिती नसल्याने ते कॅमेरा घेऊन कोडॅक कडे द्यायचे आणि प्रिंट काढून घ्यायचे. त्यामुळे कोडॅकचा मुख्य उद्योगधंदा हा कॅमेरा विकणे नसून कॅमेरा साठी आवश्यक असणारा रोल तयार करणे आणि ग्राहकांच्या कॅमेरा मधील फोटोजची प्रिंट काढणे होता.

कोडॅकच्या अपयशामागील घटना

जवळपास 74 वर्ष सुरू असलेल्या कोडॅकच्या कोडॅक्रोम ह्या कॅमेराचे उत्पादन २००६ मध्ये कंपनीने बंद केले. दीर्घकाळ सुरू असलेले हो उत्पादन बंद होणे म्हणजे कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट होती. कंपनी अपयशी होण्यामागे कोण कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या हे आपण सविस्तर पाहुयात.

व्हिडीओ सौजन्य : डॉ. विवेक बिंद्रा

१. डिजिटल युगाचा उदय

साधारण 1980 च्या दशकात प्रकाशचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डिजिटल तंत्रज्ञानाकडे वळण्याची सुरुवात झाली होती. कोडॅकने देखील हे लक्षात घेऊन आपल्या उत्पादनांमध्ये आणि विक्रीच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची सुरुवात केली. कोडॅकने प्रिंटिंग क्षेत्रामध्ये उडी मारली. जेव्हा या कंपनीचे प्रतिस्पर्धी प्रिंटिंग साठी आवश्यक असणारी शाई महागड्या किमतीत विकून पैसे मिळवत होते तेव्हा कोडॅकने महागडे प्रिंटर्स बाजारात आणले आणि आणि त्या प्रिंटर साठी आवश्यक असणारी शाई कमी किमतीत विकायला सुरु केली.

२. सोशल मीडिया

फोटोग्राफी हळूहळू फक्त डिजिटल न राहता सोशल मीडियाकडे वळू लागली. बाजारात येणारे नवीन स्मार्टफोन अधिकाधिक चांगल्या कॅमेरा सह येऊ लागले त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांची, कधीही फोटो काढून सोशल मीडियावर मित्रांना पाठवण्याची सोय झाली. लोकं फोटो प्रिंट न करता सोशल मीडियावर शेअर करू लागले त्यामुळे फोटो प्रिंटिंगचा उद्योग देखील कमी होऊ लागला. खरंतर २००१ मध्येच कोडॅकने इंटरनेटवर फोटो शेअर करू देणारी ओफोटो ही वेबसाईट विकत घेतली पण दुर्दैव असं की आजच्या इंस्टाग्राम प्रमाणे वापरकर्त्यांना फोटो शेअर करू देण्याऐवजी कंपनीने प्रिंटिंग उद्योग कसा वाढेल याकडे लक्ष दिले आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना फोटो प्रिंट करण्याच्या दिशेने प्रवृत्त केले.

कोडॅकच्या अपयशामागील कारणे

व्हिडीओ सौजन्य : डॉ. विवेक बिंद्रा

100 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असणारी इतकी मोठी कंपनी अयशस्वी ठरली यामागे कोणती कारणं आहेत हे बघूयात.

१. काळानुरूप पावलं न टाकणे

आपला उद्योग कुठल्या दिशेने जातो आहे आणि त्यासाठी आपला उद्योग कशा पद्धतीने बदलायला हवा याचा प्रत्येक कंपनीला थोडातरी अंदाज असतोच. सध्याच्या या पद्धतीमध्ये हवे ते बदल लवकरात लवकर करून नवीन पद्धती आत्मसात करणे, हवेची दिशा बघून त्या दिशेला मार्गक्रमण करणे या गोष्टी ज्या कंपन्या करतात त्यांची बाजारात टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. जगातील पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या मध्ये कोडॅक कंपनीचे नाव येते, याशिवाय आता पुढील काळामध्ये लोकं आपले फोटो ऑनलाईन एकमेकांना पाठवण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन कोडॅकने देखील ओफोटो ही वेबसाइट विकत घेतली पण तरीदेखील व्यवसाय वाढवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित करायचे सोडून स्वतःचा प्रिंटिंगचा उद्योग वाढवण्याच्या मागे लक्ष दिले. ऑनलाइन व्यवसाय करण्याची शक्यता लक्षात न घेता आहे तोच व्यवसाय पुढे रेटण्याच्या हट्टामुळे कोडॅक कंपनी मागे पडली.

२. समाधानी वृत्ती बाळगणे

शंभर वर्षांपेक्षा अधिक असणारा अनुभव हा नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि त्या अमलांत आणण्याच्या मध्ये येत होता. जे चाललंय ते चांगलं चाललंय अजून काही करण्याची गरज नाही असा विचार कंपनीच्या प्रगतीच्या अंगलट आला. साधारण 1980 च्या दशकात कंपनीचे प्रतिस्पर्धी कमी दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून देखील चांगल्या प्रतीचे कॅमेरे उपलब्ध करून देत होते. सध्या बाजारामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी आपल्याला काय करता येईल या भानगडीतच न पडल्यामुळे कंपनीचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आणि नंतर काळ बदलला तसा कंपनीच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता.

३. चपळतेचा अभाव

कोणताही निर्णय घेण्यासाठी चपळता आवश्यक असते. योग्य वेळेला निर्णय घेणे हे वेळ निघून गेल्यावर घेतलेल्या योग्य निर्णयापेक्षा अनेकदा उपयुक्त ठरते. कोडॅक कंपनीमध्ये याच गोष्टीचा अभाव दिसून आला. संपूर्ण बाजार डिजिटलच्या दिशेने वळलेला असताना आपला पारंपारिक व्यवसाय वाढवण्याच्या मागे लागल्यामुळे कंपनीचे गणित चुकले. काही वेळेला काही जोखमीचे निर्णय घेणे अत्यावश्यक होते पण ते घेतले न गेल्यामुळे कंपनी मागे पडली.

कोडॅक कंपनीकडून आपण काय शिकू शकतो?

अनेक वर्षांचा वारसा असून देखील कंपनीला स्वतःचे अस्तित्व टिकवताना धडपडावे लागते आहे आणि ह्या कोडॅक कंपनीच्या प्रवासावरून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात आणि त्या गोष्टी सविस्तरपणे पाहुयात.

१. बदल स्वीकारणे

जगामध्ये दर सेकंदाला कुठली ना कुठली तरी गोष्ट बदलत असते, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रांमधील देखील हे बदल होत असतात. आपल्याला जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल आणि प्रगती करायची असेल तर या बदलांना हेरून त्यानुसार आपली रणनीती आखणे आवश्यक आहे. जो कोणी भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तो यशस्वी होतो, जो कोणी बदल घडत असताना स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तो टिकून राहतो आणि जो कोणी बदल झाल्यावर त्या बदलांची जुळवून घेऊ पाहतो तो मागे पडतो. दररोज होणारे वेगवेगळे बदल लक्षात घेऊन आपल्याला पुढील योजना ठरवावी लागेल हा धडा कोडॅक कंपनीच्या प्रवासाकडे पाहून शिकता येतो.

२. असमाधानी असणे

आपण संपूर्णपणे परिपूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात जरी समाधानी असलो तरी व्यावसायिक आयुष्यात असमाधानी असणे म्हणजे प्रगतीचे लक्षण आहे. कोडॅक कंपनी संपूर्णपणे समाधानी होती त्यामुळे कंपनीने नवीन गोष्टींमध्ये रस घेतला नाही ज्याचा परिणाम तिच्या क्षमतेवर झाला. असमाधानी असणे म्हणजे सतत परिपूर्णतेचा ध्यास घेऊन प्रयत्न करत राहणे आणि प्रगती करत राहणे.

यशस्वी होण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे

हा लेख वाचला का?

३. चपळ असणे

तुम्ही जर चपळ असाल तर विपरीत परिस्थिती मध्ये घेतलेला चुकीचा निर्णय देखील तुमच्या बाजूने वळवू शकता पण जर निर्णय घेण्यासाठी चपळताच नसेल तर योग्य वेळी देखील तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. कोडॅक कंपनीने देखील काही निर्णय घेतले पण तेव्हा पर्यंत बराच उशीर झाला होता. उदाहरणच द्यायचे झाले तर २००१ मध्येच म्हणजे ऑर्कुट येण्याच्या आधी आपल्याला इंस्टाग्राम सारखे एक सोशल नेटवर्क मिळाले असते. कोडॅकने असा विचार न करता जे वापरकर्ते आहेत त्यांच्याकडे फोटो प्रिंटिंग करण्यासाठीचे ग्राहक म्हणून बघितले त्यामुळे ती योजनादेखील धुळीस मिळाली. कंपनीने अनेक निर्णय चपळपणे न घेतल्यामुळे त्यांचे नुकसान झाले.

आपण काय पाहिलं ?

जॉर्ज इस्टमन यांनी १८८८ मध्ये स्थापन केलेली कोडॅक कंपनी हि त्यावेळी प्रकाशचित्रण म्हणजेच फोटोग्राफीमध्ये जगातील एक सर्वोत्तम कंपन्यांमध्ये एक होती. पुढच्या पन्नास ते शंभर वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये म्हणावेत असे मोठे बदल झाले नाहीत आणि जे बदल झाले त्यांच्याशी कंपनीने जुळवून घेतले. १९८० नंतर मात्र जोग हळूहळू डिजिटल फोटोग्राफी कडे वळत होतं पण शंभर वर्षांचा वारसा असल्यामुळे कंपनीला स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक वाटले नाही किंवा होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्यात कंपनी अयशस्वी ठरली.

२००१ मध्ये कंपनीने ऑनलाईन फोटो शेअर करणारी ओफोटो हि वेबसाइट विकत घेतली पण ऑनलाइन फोटो शेअर करण्याची सुविधा देऊन त्याच्या अनुषंगाने व्यवसायाची नवीन पद्धत उभी करण्यात कंपनीने स्वारस्य दाखवले नाही आणि त्या वेबसाइटच्या वापरकर्त्यांना देखील प्रिंटिंग उद्योगासाठी असलेले ग्राहक म्हणून बघितले गेले. काळानुरुप पावलं टाकणं, समाधानी वृत्ती बाळगणं, निर्णय घेण्यासाठी चपळतेचा अभाव असणं हि कंपनीच्या अपयशाचे मागची काही कारणं आहेत. ज्या कंपनीचा एकंदर प्रवास लक्षात घेतला तर अस्तित्व टिकवून प्रगती करण्यासाठी बदल स्वीकारणे, असमाधानी असणे आणि चपळ असणे या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि तुमच्या मते कोडॅक कंपनी वाचवण्यासाठी कोण कोणते उपाय करता आले असते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्र परिवाराला ह्या लेखाची लिंक पाठवायला विसरू नका.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*